साकव दुरुस्तीसाठी १३,०० कोटीची गरज, अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करणार - रवींद्र चव्हाण
By आनंद डेकाटे | Updated: December 18, 2023 17:44 IST2023-12-18T17:44:12+5:302023-12-18T17:44:37+5:30
सदस्य राजन साळवी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले,

साकव दुरुस्तीसाठी १३,०० कोटीची गरज, अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करणार - रवींद्र चव्हाण
नागपूर: राज्यातील साकव दुरुस्तीसाठी १३०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात येईल. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही साकवांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी दीड कोटी रुपये निधी प्राधान्याने देण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
सदस्य राजन साळवी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले, जामदाखोरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील सावडाव-नेर्ले, मिळंद-हातदे या गावांना जोडणारा लोखंडी साकव सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेला. या परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी नेर्ले येथे ७ ते ८ किलोमीटर अंतराचा वळसा मारून जावे लागत आहे. याशिवाय, वैभववाडी तालुक्यातील नेर्ले व राजापूर तालुक्यातील सावडाव या गावांना जोडणारा वाघोटन नदीवरील साकव आणि राजापूर तालुक्यातील मिळंद-हातदे या दोन गावांना जोडणारा साकव योजना बाह्य रस्त्यावर आहे. या साकवांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल.
दरम्यान, राज्यातील साकवांच्या दुरुस्तीसाठी १३०० कोटी रुपये आवश्यक असून त्यातील ६५० कोटी रुपये केवळ कोकण विभागातील साकवांच्या दुरुस्तीसाठी लागणार आहे. साकव बांधकाम करणे खर्चाची कमाल आर्थिक मर्यादा ६० लाख असून ही मर्यादा वाढविण्याची बाब शासनस्तरावर विचाराधीन असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य शेखर निकम, ॲड. यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, अजय चौधरी आणि ॲड. आशिष जयस्वाल यांनी चर्चेत भाग घेतला.