पिढ्यानपिढ्या नदीकाठावर होणारे अंत्यसंस्कार थांबणार कधी ?
By गणेश हुड | Updated: June 14, 2023 16:47 IST2023-06-14T16:46:29+5:302023-06-14T16:47:06+5:30
जिल्ह्यातील १२३ गावात स्मशानभूमी नाही

पिढ्यानपिढ्या नदीकाठावर होणारे अंत्यसंस्कार थांबणार कधी ?
नागपूर : शहरांचा विकास होत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात अजूनही मुलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणीपुरवठा, गटर लाईन, पथदिवे अशा मुलभूत सुविधा नाही. एवढेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील १२३ गावांमध्ये स्मशानभूमी, दहन शेड नाही. यासाठी शेकडो कोटींचा निधी लागणार नाही. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील स्मशानभूमीची समस्या अजूनही कायम आहे.
स्मशानभूमी नसल्याने तेथील रहिवाशांना उघड्यावर, नदी काठावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. काही गावातील लोक नजिकच्या गावात अंत्ययात्रा नेवून अंत्यसंस्कार करतात. माहितीनुसार जी जागा वनविभागाची आहे. अशा जागी वनहक्क कायदा कलम ३/१नुसार निस्तार हक्क प्रमाणे मुकर्रर केल्या जाऊ शकते. तीन पिढ्यांपेक्षा जास्त काळ त्याच ठिकाणी दहन विधी होत असेल तर अशी गावची जागा दहनविधीसाठी निस्तार हक्काप्रमाणे मुकर्रर करता येते. या ठिकाणी स्मशान भूमीचे बांधकाम शक्य आहे.
इच्छाश्क्तीचा अभाव
जिल्ह्यातील १२३ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्था नाही. यातील काही गावांमध्ये जागा उपलब्ध आहे. तर काही ठिकाणी जागा उपलब्ध नाही. तर कुठे जागा उपलब्ध असून ती झुडपी जंगलाची जागा आहे. स्मशानभूमीसाठी शासकीय जागा असणे आवश्यक आहे. परंतु अशी जागा उपलब्ध नसल्यास जन सुविधा निधीतून जमीन खरेदी करण्यासाठी त्या गावाला एकदा २० लाखाचे अर्थसहाय्य देण्यात येते. करावयाचेच असेल तर पर्याय निघतात. परंतु इच्छा शक्तीचाच अभाव दिसतो.
स्मशानभूमी नसलेली गावे
तालुका - गावांची संख्या
नागपूर - १०
कामठी - २
हिंगणा - १२
काटोल - १७
नरखेड - ११
सावनेर - ७
कळमेश्वर - ११
रामटेक - १२
पारशिवणी - ९
मौदा - ५
उमरेड - ७
भिवापूर - ९
कुही - ११