मनाची लढाई जिंकलेल्यांच्या हातांनी फुलल्या १२०० राख्या
By सुमेध वाघमार | Updated: August 2, 2025 19:59 IST2025-08-02T19:58:42+5:302025-08-02T19:59:10+5:30
Nagpur : प्रादेशिक मनोरुग्णालयातील कलाकारांची कलाकृती

1200 Rakhis blossomed from the hands of those who won the battle of the mind
सुमेध वाघमारे
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या भिंतींमध्ये एक अनोखी गोष्ट घडत आहे. ज्या रुग्णांनी मानसिक आजारांवर मात केली आहे, ते आता आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. या रुग्णांनी मोठ्या हिंमतीने तब्बल १२०० राख्या तयार केल्या आहेत. ह्या राख्या फक्त दोºयांनी आणि मण्यांनी बनलेल्या नाहीत, तर त्यात त्यांच्या वेदना, त्यांची जिद्द आणि समाजात पुन्हा सामावून जाण्याची त्यांची तीव्र इच्छा दडलेली आहे.
या रुग्णांना आत्मविश्वासाने जगता यावं, यासाठी मनोरुग्णालयाने 'उड़ान प्रकल्प' सुरु केला आहे. येथे त्यांना विविध गोष्टी शिकवल्या जातात, जसे की शिवणकाम, झाडू, तोरण, पणत्या आणि बुटिक ज्वेलरी बनवणे. ह्या गोष्टी शिकून ते स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमधील नागरिक त्यांच्या या प्रयत्नांना पाठिंबा देत आहेत. या राख्यांची विक्री झाली, आणि त्यातून मिळालेले पैसे या रुग्णांच्या खात्यात जमा होणार आहेत. हे पैसे त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येतील, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे, डॉ. रीना खुरपुडे आणि उडान प्रकल्प समन्वयक प्रिया सोनावणे यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्ण समाजाचा एक भाग बनत आहेत.
राख्या विकत घेऊन रुग्णांना द्या प्रोत्साहन
या राख्या विकत घेऊन नागरिक या रुग्णांना मदत करत आहेत. प्रत्येक राख्या त्यांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करत आहे. ५ ते ८ आॅगस्ट २०२५ दरम्यान उप-संचालक, आरोग्य सेवा कार्यालय, नागपूर येथे राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या उपक्रमात सहभागी होऊन या रुग्णांना प्रोत्साहन द्या, असे आवाहन प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे यांनी केले आहे.