नागपुरात १२ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास
By योगेश पांडे | Updated: March 7, 2024 20:19 IST2024-03-07T20:18:47+5:302024-03-07T20:19:23+5:30
परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नागपुरात १२ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एका १२ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
निशिला संजय बागडे (१२, जोशीवाडी, गोपालनगर, दुसरा बसस्टॉपजवळ) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सहाव्या वर्गात शिकत होती. तिचे वडील मेकॅनिक असून आई शिक्षिका आहे. तिला लहान भाऊदेखील आहे. गुरुवारी सकाळी निशिका साडेअकरा वाजताच्या सुमारास शाळेतून परतली. तिचे आईवडील कामावर गेले होते. लहान भाऊदेखील शाळेत गेला. त्यानंतर तिने साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. दुपारी दोन वाजता तिची आजी घरी आली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. तिने टोकाचे पाऊल का उचलले याचीच संपूर्ण परिसरात चर्चा सुरू होती. तिच्या कुटुंबियांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.