महिनाभरात १२ लोकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST2021-09-24T04:08:39+5:302021-09-24T04:08:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात नदी, नाल्यांत बुडून १२ नागरिकांना प्राण गमवावे लागले. जीवित हानीमुळे ...

12 drowned in a month | महिनाभरात १२ लोकांचा बुडून मृत्यू

महिनाभरात १२ लोकांचा बुडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात नदी, नाल्यांत बुडून १२ नागरिकांना प्राण गमवावे लागले. जीवित हानीमुळे आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबीयांचे नुकसान भरून न निघणारे आहे. तरी पूर परिस्थितीत किंवा अतिवृष्टी काळात नद्या नाले दुथडी भरून वाहत असताना नागरिकांनी त्यातून प्रवास करू नये , असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर यांनी केले आहे.

पावसाळा आता शेवटच्या टप्प्यात असून जिल्ह्यातील मोठी धरणे ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात भरलेली आहेत. बहुतांश मध्यम व लघु धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या शक्यतेनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी सातत्याने होत असून जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तरी नागरिकांनी सतर्क रहावे. केवळ सप्टेंबर महिन्यातच बारा व्यक्तींचा नदी, नाल्यांमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. आजदेखील नरखेड तालुक्यातील रामठी गावाजवळील नाल्यामध्ये बैलगाडीसोबत वाहून एका ४० वर्षीय महिलेला आपल्या प्राणाला मुकावे लागले. तेव्हा आपला जीव आपल्या कुटुंबीयांसाठी अती मोलाचा असून त्यानुसार जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक दक्षता व काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.

- यावर संपर्क करा

घडलेल्या घटनेची, आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी.

आवश्यकतेनुसार नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष ०७१२-२५६२६६८ टोल फ्री क्र. १०७७ वर संपर्क करा.

-बॉक्स

- अशी घ्या काळजी

भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरणाबाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेवून सतर्क राहा.

कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका

नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा

मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.

जुन्या मोडकळीस आलेल्या घरात, इमारतीत आश्रय घेऊ नका.

नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.

अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका

धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका

Web Title: 12 drowned in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.