अन्सारी विरोधात १२ फौजदारी प्रकरणे
By Admin | Updated: August 13, 2016 02:10 IST2016-08-13T02:10:17+5:302016-08-13T02:10:17+5:30
रेती माफिया लतिफ अन्सारीविरुद्ध भादंविच्या ३०२, ३०७, ३५३, ३९४, ३७९ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

अन्सारी विरोधात १२ फौजदारी प्रकरणे
नागपूर : रेती माफिया लतिफ अन्सारीविरुद्ध भादंविच्या ३०२, ३०७, ३५३, ३९४, ३७९ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध १२ फौजदारी प्रकरणे आहेत. नुकताच त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
लतिफ अन्सारी हा अन्य एका गुन्ह्यात अटकेत होता. कारागृहात असताना १० आॅगस्ट रोजी त्याला अटकपूर्व जामीन आदेशानुसार सकाळी ११ वाजता मोठ्या गडबडीने सोडण्यात आले. हा नियमबाह्य प्रकार नियमानुसारच आहे, हे दाखवण्यासाठी त्याच्यासोबतच अन्य गुन्ह्यातील आरोपींनाही सोडण्यात आले. कारागृहाच्या ‘रिहाई रजिस्टरवर’ सकाळी ११ वाजता लतिफ अन्सारी याला सोडण्यात आल्याची नोंद आहे.
उल्लेखनीय म्हणजे अन्सारी हा १० रोजी कारागृहाबाहेर पडल्यानंतर ११ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाने त्याचा मकोका अंतर्गतचा जामीन आदेश फेटाळलेला आहे. आणखी एक मजेदार बाब म्हणजे १० आॅगस्ट रोजी लतिफ अन्सारी हा नियमानुसार दुपारी १ वाजता कारागृहाबाहेर पडेल म्हणून पोलीस पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर दबा धरून होते. परंतु त्याला ११ वाजताच सोडण्यात आल्याचे समजताच पथकाला माघारी परत जावे लागले. आता अन्सारी सहजरीत्या पोलिसांच्या हाती लागणे मुश्कील आहे. अन्सारीला दोन तास आधीच सोडण्यामागे मोठ्या गैरव्यवहाराची शंका व्यक्त केली जात आहे.
लतिफ मोहम्मद हाफिज अन्सारी हा मूळचा खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी खदान येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
त्याच्यासोबतच मोहम्मद लईक मोहम्मद हाफिज अन्सारी, संजय भगत, प्रसाद वर्मा आणि प्रमोद खोजरे हे आरोपी आहेत. उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील एस. जे. कडू तर आरोपीच्या वतीने अॅड. आर. के. तिवारी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
‘तो नियमभंग नव्हे, तरीही चौकशी’
लतिफ अन्सारी याला दोन तास आधीच कारागृहातून सोडण्याचा प्रकार हा नियमभंग नव्हे, तरीही नेमके काय घडले याबाबत चौकशी केली जाईल, असे कारागृह अधीक्षक योगेश देसाई हे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले. देसाई हे गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाशावर आहेत. त्यांच्या गैरहजेरीत हा प्रकार घडलेला आहे.