लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूरकरांनो, आपल्या वाहनांची सुरक्षितता आणि कायदेशीर ओळख आता आणखी मजबूत करण्याची वेळ आली आहे. वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी लावण्यासाठी नागपूर महानगरात तब्बल ११४ केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांची दररोज एकूण ५६४५ वाहनांना एच.एस.आर.पी. बसविण्याची क्षमता आहे, माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये तसेच १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात डिसेंबर २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.
नागपूर शहरामध्ये या नंबर प्लेट बसविण्यासाठी शासनाद्वारे में. रोझमर्टा सेफ्टी सिस्टीम्स लि. या कंपनीला प्राधिकृत करण्यात आले आहे. सुमारे ६० टक्के वाहनधारकांनी अद्याप एच.एस.आर.पी. बुकिंग प्रक्रिया केलेली नसल्याने संपूर्ण वाहनांना नंबर प्लेट लावण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. वाहनधारकांना ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यात अथवा प्रत्यक्ष केंद्रावर नंबर प्लेट बसविताना येणाऱ्या अडचणीबाबत कंपनीला कळविण्यात आले असून या अनुषंगाने आवश्यकतेनुसार केंद्रांची संख्या वाढविण्याचीही सूचना करण्यात आल्याचे बिडकर यांनी सांगितले.
बुकिंग केलेल्यांविरुद्ध कारवाई होणार नाहीराज्यभरातील नागरिकांना नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी लागणारा अपेक्षित कालावधी व यातील अडचणींबाबत वरिष्ठ कार्यालयास अवगत करण्यात आलेले आहे. ज्या वाहनाधारकांनी एच. एस.आर. पी. बुकिंग प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तरी सर्व वाहनधारकांनी गोंधळून न जाता https://transport.maharashtra.g ov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया पूर्ण करावी व दिलेल्या अपॉइंटमेंटनुसार वाहनाला एचएसआरपी प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
४० टक्के वाहनांची एचएसआरपी प्रक्रिया पूर्ण
- नागपूर शहरात दिनांक ०१ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी वैध असणारी एकूण ८,७२,४७३ वाहने असून यापैकी ३,४०,४९९ म्हणजे सुमारे ४० टक्के वाहनांची एचएसआरपी बसविण्यासाठी संबंधित कंपनीकडे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
- तसेच सुमारे २७ टक्के वाहनांना २ प्रत्यक्ष एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. अन्य वाहनांना अपॉइंटमेंट देण्याची व प्लेट बसविण्याची कार्यवाही संबंधित कंपनीद्वारे करण्यात येत आहे.