११ हजार प्रकरणे निकाली
By Admin | Updated: December 13, 2015 02:55 IST2015-12-13T02:55:16+5:302015-12-13T02:55:16+5:30
राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी...

११ हजार प्रकरणे निकाली
राष्ट्रीय लोक अदालत : राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा पुढाकार
नागपूर : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १० हजार ९७४ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आली.
लोक अदालतीपुढे २१ हजार ५३७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११ हजार ४१४ प्रलंबित आणि १० हजार २३ प्रकरणे वाद दाखलपूर्व होती. त्यापैकी १० हजार ९७४ प्रकरणे निकाली निघाली. यात ८ हजार १५३ प्रलंबित आणि २ हजार ८२१ दाखलपूर्व प्रकरणे आहेत. विशेष मोहिमेंतर्गत ६ हजार ९१७ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
मोटार अपघात दावा प्रकरणांमधील तडजोड रक्कम १० कोटी २५ लाख ४४ हजार ५१० रुपये होती. केवळ दंड म्हणून १ कोटी १ लाख ७५ हजार ५७१ रुपये वसूल करण्यात आले. भूसंपादन, मोटार अपघात दावे, धनादेश अनादर प्रकरण, दाखलपूर्व वसुली दावे आणि दंड, अशी ४६ कोटी ७७ लाख २० हजार ८३० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. मोटार अपघात दाव्याच्या लता बिसेन विरुद्ध सेवकराम आणि श्रीराम जनरल इन्श्युरन्स या प्रकरणात ६० लाखांची नुकसान भरपाई तडजोडीने ५८ लाख रुपये झाली होती. अॅड. पी. एस. मिराचे आणि मोनाली पठाडे यांनी हे प्रकरण हाताळले.
ही संपूर्ण प्रकरणे हाताळण्यासाठी २७ पॅनल तयार करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी सर्व पॅनल्सना भेटी दिल्या होत्या.
न्यायिक अधिकारी पी. एस. तरारे, व्ही. टी. सूर्यवंशी, एम. एस. आझमी, व्ही. सी. बरडे, एम. टी. आसिम, डी. डी. कोचे, कुणाल जाधव, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे, डीबीएचे अध्यक्ष प्रकाश जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रेशीमगाठी जुळल्या, सात दाम्पत्य लागले संसाराला
केवळ मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून कधी काळी तुटलेल्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्या. ही किमया कौटुंबिक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झाली. अदालतीसमोर आलेल्या एकूण १०१ दाव्यांपैकी सात दाम्पत्य (१४ पक्षकार) हे पुन्हा आपापल्या संसाराला लागले. आई-वडिलाविना भकास आयुष्य जगणाऱ्या मुलांना त्यांचे आई-बाबा मिळाले. त्यामुळे या सर्वांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत असलेला आनंद हा नि:शब्द होता.काही दाव्यांमध्ये खावटीची तडजोड होऊन सामंजस्याने निपटारा करण्यात आला. खावटीचे एकूण सहा दावे निकाली निघाले. येथील लोक अदालतीच्या चार पॅनलवर न्यायाधीश पलक जमादार, प्रशांत अग्निहोत्री, निवृत्त न्यायाधीश पी. ए. मार्कंडेयवार, बी. पी. ठाकर, अॅड. रश्मी खापर्डे, अॅड. स्मिता देशपांडे, अॅड. अनुराग भलोटिया, अॅड. सोनल राऊत, समुपदेशक शंकर पांडे, डॉ. मंजूषा कानडे, आर. आर. कोतवाल, संगीता पांडे, झरिना मेहंदी रयानी, एस. डी. भावे, अजय मार्डीकर, डॉ. नंदश्री भुरे आदी होते. कौटुंबिक न्यायालयाच्या ठिकाणी प्रभारी प्रधान न्यायाधीश सुभाष काफरे, न्यायाधीश धवस, एस. व्ही. थोडगे आणि विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव उपस्थित होते. व्यवस्थापक रसिका कस्तुरे यांचे आयोजन उत्तम होते.