तारक्कासह ११ जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले!

By संजय तिपाले | Updated: January 1, 2025 20:08 IST2025-01-01T20:08:22+5:302025-01-01T20:08:43+5:30

आत्मसमर्पण: एका कोटींचे होते बक्षीस, मुख्यमंत्री म्हणाले, संविधान हाच खरा प्रगतीचा मार्ग

11 fierce Naxalites including Taraka laid down their arms and took up the constitution | तारक्कासह ११ जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले!

तारक्कासह ११ जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले!

संजय तिपाले/गडचिरोली : तब्बल ३८ वर्षे नक्षल चळवळीत राहून सदस्य ते दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य अशी वाटचाल करत ६६ गुन्हे दाखल असलेल्या जहाल महिला माओवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य  भूपती याची पत्नी विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ ताराक्का हिच्यासह ११ जणांनी १ जानेवारीला शस्त्र खाली ठेवले व संविधान हाती घेऊन सन्मानाने जीवन जगण्याचा प्रण केला.  तीन विभागीय समिती सदस्य, दोन एरिया समिती सदस्य, एक उपकमांडर व चार दलम सदस्य यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांचे आत्मसमर्पण झाले.

तारक्कासह विभागीय समिती सदस्य सुरेश बैसागी उउईके उर्फ चैतू उर्फ बोटी, कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी, अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश, एरिया  कमिटी सदस्य वनिता सुकलु धुर्वे उर्फ सुशीला ,  सम्मी पांडु मट्टामी उर्फ बंडी, उपकमांडर निशा बोडका हेडो उर्फ शांती, दलम सदस्य  श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना,  शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती, सोनी सुक्कु मट्टामी,आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते यांचा आत्समर्पण करणाऱ्यांत समावेश आहे. या सर्वांवर सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे बक्षीस होते. आता आत्मसमर्पणानंतर या सर्वांचे शासनाकडून पुनर्वसन होणार आहे. त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांना संविधान देऊन सन्मानाने जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पोलिस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलचे ‍लोकार्पण करण्याचे आले. तसेच येथील पोलीस दलाच्या नूतन हेलिकॉप्टर हॅंगर चे उद्घाटनही करण्यात आले.  विविध नक्षल चकमकींमध्ये शौर्य दाखविणाऱ्या सी-६० च्या   जवानांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलिस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे उपस्थित होते. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. संचालन उपनिरीक्षक शिवराज लोखंडे यांनी केले तर आभार अपर अधीक्षक बी. रमेश यांनी मानले.

माओवादी विचारसरणीला थारा नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरत्या वर्षात उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या ४ वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादी चळवळीत सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. ११ गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे.   न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. विकासात जिल्हा जसाजसा पुढे जात आहे तसा माओवाद पिछाडीवर जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: 11 fierce Naxalites including Taraka laid down their arms and took up the constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.