कोव्हॅक्सिन लसीचे मिळाले १० हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:36 IST2021-04-10T00:34:57+5:302021-04-10T00:36:05+5:30
covaxin vaccine कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा पडल्याने गुरुवारी मेडिकलमधील लसीकरण बंद करण्याची वेळ आली. शुक्रवारी नागपूर जिल्ह्याला पुणे आरोग्य विभागाकडून १० हजार डोस उपलब्ध झाले.

कोव्हॅक्सिन लसीचे मिळाले १० हजार डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा पडल्याने गुरुवारी मेडिकलमधील लसीकरण बंद करण्याची वेळ आली. शुक्रवारी नागपूर जिल्ह्याला पुणे आरोग्य विभागाकडून १० हजार डोस उपलब्ध झाले. यातील शहराला ३ हजार तर ग्रामीणला ७ हजार डोस मिळाले. यामुळे बंद केंद्र शुक्रवारी दुपारी १२ वाजेनंतर पुन्हा सुरू झाले; परंतु शहरात रोज कोव्हॅक्सिनचे जवळपास हजारावर डोस लागत असल्याने पुढील तीन दिवसांनंतर काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे शहरात कोविशिल्डचा दोन दिवस पुरेल एवढाच साठा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शहरात कोव्हॅक्सिनची सहा लसीकरण केंद्रे होती; परंतु शनिवारपासून लसीचा तुटवडा पडल्याने यातील चार सेंटर त्याच दिवशी बंद करण्यात आले. मेडिकलमध्ये दोन केंद्रे सुरू होती. गुरुवारी दुपारी १ वाजेनंतर लस संपल्याने दोन्ही सेंटर बंद झाले. शुक्रवारी उपसंचालक आरोग्य विभागाकडून १० हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस मिळाले. यातून ग्रामीणला ७ हजार तर शहराला ३ हजार डोस देण्यात आले. अधिकाऱ्यांनुसार, कोविशिल्ड लसीचा साठा साधारण १५ एप्रिलपर्यंत येणार आहे. सध्या शहरात सुमारे २५ ते ३० हजार डोस शिल्लक असल्याची माहिती आहे.
शहरात १५,६६८ तर ग्रामीणमध्ये १४,४१५ लाभार्थ्यांचे लसीकरण
शहर व ग्रामीणमध्ये धडाक्यात लसीकरण सुरू आहे. शुक्रवारी शहरात १५,६६८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये ५४ आरोग्य कर्मचारी, ३०६ फ्रंट लाइन वर्कर, ४५ वर्षांवरील ७३६१, गंभीर आजार असलेले २९३२ तर ६० वर्षांवरील ३९५२ ज्येष्ठांचा समावेश होता. तर, ग्रामीणमध्ये सर्व मिळून १४,४१५ लाभार्थ्यांनी पहिला व दुसरा डोस घेतला.