आरोपी युवकास अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईनागपूर : चंद्रपूरला दारूची तस्करी वाढली आहे. शुक्रवारी लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका युवकास जीटी एक्स्प्रेसने चंद्रपूरला दारूच्या १०० बाटल्या घेऊन जाताना रंगेहाथ अटक केली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सहा हजार रुपये आहे. लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र चौधरी, जितेंद्र लोखंडे, अरविंद शाह, संदीप लहासे, नरेश खरगबन, बबलू ठाकूर हे शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालीत होते. तेवढ्यात या प्लॅटफार्मवर आलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२६१६ जीटी एक्स्प्रेसच्या मागील जनरल कोचची त्यांनी तपासणी केली. यावेळी बल्लारशा येथील बालाजी वॉर्डातील राहुल रवींद्र लाहोरे (१९) याच्यावर त्यांना शंका आली. त्यांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याजवळ असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यात आॅफिसर चॉईस कंपनीच्या ९० मिलिलीटरच्या १०० बाटल्या आढळल्या. त्यांची किंमत ५,७०० रुपये आणि बॅगची किंमत ३०० रुपये असा एकूण सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आपल्याला ही दारू घेऊन जाण्याचे ५०० रुपये मिळणार होते, असे त्यानी सांगितले. त्याची आई सफाई कामगार आहे. ती आजारी असून तिच्या उपचारासाठी दारूची तस्करी करीत असल्याचे त्याने सांगितले. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
जीटी एक्स्प्रेसमधून दारूच्या १०० बाटल्या जप्त
By admin | Updated: September 17, 2016 03:17 IST