लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकराच्या तीर्थदर्शन योजनेअंतर्गत २०२४-२५ मध्ये २५ यात्रा झाल्या. या यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने केलेला १ कोटी ८६ लाख ४७ हजार ८७५ रुपयांचा निधी शासनाकडे थकीत असल्याने, २०२५-२६ मध्ये प्राप्त झालेल्या प्रस्तावावर शासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागपुरातून २७ जुलैला १२०० यात्रेकरू नागपुरातून अमरनाथ यात्रेसाठी रवाना होणार होते. त्यासाठी शासनाकडून कुठलीही परवानगी न मिळाल्याने १२०० यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा रद्द करण्याची वेळ आली आहे.
समाजकल्याण विभागांतर्गत तीर्थदर्शन यात्रा योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत राज्यातील सर्वधर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन करविण्यात येत होते. यात्रेच्या नियोजनासाठी रेल्वेच्या आयआरसीटीसी सोबत सामंजस्य करार करण्यात आला होता. आयआरसीटीसी यात्रेकरूंचा प्रवास, नाश्ता, चहा, जेवणाची सोय करीत होती. योजनेअंतर्गत २०२४-२५ मध्ये २५ यात्रा पूर्ण झाल्या. मात्र, शासनाने यात्रेसाठी झालेल्या खर्चाचा निधी आयआरसीटीसीकडे जमा केला नाही. त्यामुळे आयआरसीटीसीने खर्च झालेल्या निधीची मागणी २४ एप्रिल २०२५ रोजी शासनाकडे केली होती.
२००० लाभार्थ्यांचा प्रस्ताव समाज कल्याणकडे२०२५-२६ मध्ये योजनेअंतर्गत ८०० लाभार्थ्यांचा प्रस्ताव अयोध्येसाठी समाज कल्याण विभागाकडे आला आहे. त्याचबरोबर विश्वहिंदू जनसत्ता बहुजन पार्टीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कार्तिक डोके यांचाही १२०० यात्रेकरूंचा अमरनाथ यात्रेचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. येत्या २७ जुलैला अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरू नागपुरातून रवाना होणार होते. परंतु, शासनाकडून मंजुरीच न मिळाल्याने यात्रा रद्द करण्याची वेळ आली आहे.
"या योजनेअंतर्गत अमरनाथ यात्रेसाठी आम्ही ४ महिन्यांपासून मेहनत घेत आहे. यात्रेकरूंची माहिती गोळा केली. प्रवासासाठी आवश्यक त्या परवानगी घेतल्या. यात्रेची तारीख निश्चित झाली. पण अद्यापही शासनाकडे आम्ही पाठविलेल्या प्रस्तावावर निर्णय झाला नाही."- कार्तिक डोके, अध्यक्ष, विश्वहिंदू जनसत्ता बहुजन पार्टी