Yavatmal's new prisoners in jail | यवतमाळच्या कारागृहातील महिलांचे नवे अस्तित्व
यवतमाळच्या कारागृहातील महिलांचे नवे अस्तित्व

रुपेश उत्तरवार
कारागृहात बंदी असलेल्या महिलांच्या आयुष्यालाही नवी दिशा मिळू शकते. त्याकरिता अस्तित्व फाउंडेशनच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत. ही चळवळ कारागृहातील बंदी महिलांचे भविष्य बदलून टाकणारी आहे. कारागृहातून सुटका होताच त्यांना आत्मनिर्भर होता यावे म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे. ड्रेस डिझायनिंग, ब्यूटीपार्लर असे कोर्स कारागृहातील महिलांना शिकविले जात आहे. यासोबतच त्यांची विचारसरणीही सकारात्मक व्हावी म्हणून योगाचे प्रशिक्षण आणि ध्यानही शिकविले जात आहे. त्यातून या महिलांमध्ये वैचारिक परिवर्तनाला सुरूवात झाली आहे.
कळत नकळत घडलेल्या गुन्ह्यात, खोट्या आरोपात गोवलेल्या महिला कारागृहात बंदी आहेत. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्यांना कारागृहातच राहावे लागणार आहे. अशावेळी त्यांचे वैचारिक संतुलन ढासळू शकते. या महिला न्यायालयातून निर्दोष ठरून कारागृहाबाहेर पडल्या तरी अनेकदा त्यांना घरात घेतले जात नाही. कुठले कामही मिळत नाही. अशा महिलांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. असा प्रकार घडू नये म्हणून अस्तित्व फाउंडेशनच्या नेतृत्वात महिलांनी एक व्यापक चळवळ उभारली आहे. या चळवळीतील प्रत्येक महिला संघर्षातून उभी झाली आहे. त्यांनी स्वत:च्या कुटुंबाला सावरले आहे. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, कारागृहातील बंदी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अस्तित्व फाउंडेशनच्या महिला झटत आहेत.
यवतमाळ कारागृहात १२ महिला बंदिवासात आहेत. यापूर्वी त्यांनी १५ महिलांना प्रशिक्षण दिले. आता कारागृहात असलेल्या कच्च्या कैदी महिलांना ड्रेस डिझायनिंग आणि ब्यूटीपार्लरचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये ड्रेस, ब्लाऊज, पेटीकोट, फ्रॉकचे शिवणकाम शिकविण्यात आले. ब्यूटीपार्लरच्या माध्यमातूनही महिला आर्थिक सक्षम होऊ शकतात. ब्लिचिंग, फेशियल, मेकअप, हेअरस्टाईल, साडी नेसण्याचे प्रकार, लग्नातील मेकअप, मेहंदी आणि इतरही प्रकार बंदी महिलांना शिकविण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातच नव्हेतर शहरात जाऊनही त्या चांगला रोजगार मिळवू शकतात. या प्रशिक्षणाला कारागृहातील महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून कारागृहातच त्यांना भविष्याची नवी दिशा मिळाली आहे.
मानसिक संतुलनासाठी योगा
कारागृहातील बंदी महिलांचे मानसिक आरोग्य उत्तम राहत नाही. त्यामुळे त्या नकारात्मक विचाराने क्रोधीत असतात. यामुळे त्यांच्या करिअरचे मोठे नुकसान होत. बंदी महिलांच्या डोक्यात उत्तम विचारांना स्थान मिळावे, मनावर संतुलन मिळावे म्हणून त्यांना योगाचे धडे दिले जात आहे. यामुळे पोट, वात विकार, गुडघ्यांचे आजार पाठीचे आजार दूर होण्यास मदत झाली आहे. कारागृहात सुधारगृहाचे चित्र निर्माण होण्यास मदत होत आहे.
सामान्य महिलांची उत्तम कामगिरी
या मोहिमेचे नेतृत्व अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा अलका विनोद कोथळे करीत आहेत. त्या सेंट ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षिका आहेत. यासोबतच त्या जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव आणि वीज ग्राहक संघटनेच्या सहसचिव आहेत. त्यांनी कारागृहात पार्लरचे प्रशिक्षण दिले. माणिक अविनाश पांडे यांनी हेअरस्टाईलचे प्रशिक्षण दिले. करुणा धनेवार घरी कपडे शिवण्याचे काम करतात. त्यांनी ड्रेस डिझायनिंगचे प्रशिक्षण बंदी महिलांना दिले आहे. डॉ. कविता बोरकर आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्यांनी कारागृहातील महिलांना योगाचे प्रशिक्षण दिले.
कारागृहातील महिला कच्च्या कैदी आहेत. त्यांची कधीही सुटका होऊ शकते. कारागृहातून बाहेर पडताच त्यांना रोजगाराचे साधन हवे असते. त्याकरिता ड्रेस डिझायनिंग आणि ब्यूटीपार्लर हे शॉर्ट कोर्स आहेत. या माध्यमातून कच्या कैदी महिलांना त्यांच्या भविष्याची दिशा मिळाली आहे. त्यांच्यात सकारात्मक बदल दिसून आले आहेत. आत्मविश्वासही वाढला आहे.
- कीर्ती चिंतामणी, कारागृह अधीक्षक, यवतमाळ
पैशापेक्षा माणूसकी महत्त्वाची आहे. कारागृहातील महिलांनाही सन्मान मिळावा म्हणून फाउंडेशनने काम हाती घेतले आहे. भविष्यात हे काम आणखी पुढे नेले जाणार आहे. या कामात कारागृह अधीक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा राहिला आहे. यामुळे एका चांगल्या विचाराला पुढे नेता आले.
- अलका कोथळे, अध्यक्ष, अस्तित्व फाउंडेशन, यवतमाळ

Web Title: Yavatmal's new prisoners in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.