आजचे विद्यादेवीचे उपासक

By Admin | Updated: August 16, 2014 22:41 IST2014-08-16T22:41:32+5:302014-08-16T22:41:32+5:30

पदव्यांची भलीमोठी रांग नावापुढे लावणारे खरोखरीच हुशार असतील असे नाही. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशीच बहुतेक नवपदवीधरांची अवस्था असते. नोकरीसाठी मुलाखतीला जाताना काहीएक तयारी करून जावे, इतकेही त्यांच्या गावी नसते. अशाच काही उमेदवारांची कथा.

Worshipers of today's goddess | आजचे विद्यादेवीचे उपासक

आजचे विद्यादेवीचे उपासक

- प्रा़ डॉ. द. ता. भोसले

 
मी ज्या शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम केले, त्या रयत शिक्षण संस्थेत नोकरीला असताना आलेला हा अनुभव आहे. त्यालाही सुमारे दोन दशकांचा काळ गेला असावा; पण त्या वेळचा अनुभव आजही कमी-अधिक प्रमाणात पाहावयास मिळतो. खरे तर अधिक प्रमाणातच तो मिळतो आहे, म्हणून तो कथन करावासा वाटतो.
साधारणत: जूनचा पहिला आठवडा असावा. संस्थेच्या काही महाविद्यालयांत नव्याने मराठी विषयाच्या जागा भरावयाच्या होत्या. त्या वेळी आणि आजही संस्थेत होणारी शिक्षकांची निवड ही शैक्षणिक गुणवत्ता, त्याची मौखिक परीक्षा, त्याचा सामाजिक आणि आर्थिक स्तर आणि संस्थेशी असणारे सेवामय नाते या कसोटय़ांवर होत असते. आज रूढ झालेली आणि प्रतिष्ठाही पावलेली नोकरीची पदे विकत घेण्याची प्रथा त्या काळी अस्तित्वात नव्हती. आज शिपायाच्या जागेपासून प्राचार्यपदाच्या जागेर्पयतचे दर ठरलेले आहेत आणि त्यातही दरसाल महागाई आणि टंचाई यांमुळे वाढच होत चाललेली आहे. अशा या पाश्र्वभूमीवर संस्था त्या-त्या विषयातील गुणवत्ताधारक विद्याथ्र्याची गुणानुक्रमे यादी तयार करते आणि त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यातूनच निवड केली जाते.
मराठी विषयाच्या प्राध्यापकांची निवड करावयाच्या समितीमध्ये एक सदस्य म्हणून काम करण्याचा जो मी अनुभव घेतला, त्या वेळचा हा प्रसंग आहे. चांगली गुणवत्ता असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्याच्या समितीत विद्यापीठाचा एखादा प्रतिनिधी असतो. शासनाचा प्रतिनिधी असतो. त्या विषयातील एखादा तज्ज्ञ निमंत्रित केलेला असतो आणि संस्थेचे दोन पदाधिकारी, दोन-तीन प्राचार्य व प्राध्यापक असे एकूण आठ-दहा जण त्या समितीत असतात. मुलाखतीला बोलावलेल्या उमेदवाराची गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे पाहून झाल्यावर संस्थेचे पदाधिकारी त्याचे नावगाव विचारायचे. घरची माहिती घ्यायचे. कुठे शिकला, कुणाच्या हाताखाली शिकला, अशी जुजबी माहिती विचारून त्याला जरा मोकळे करायचे म्हणजे त्याची भीती कमी करायची आणि मग त्याच्या विषयातील सदस्यांना त्या विषयातील प्रश्न विचारायला सांगायचे. आमच्या चेअरमननी मी आधी काही प्रश्न विचारावेत, असा आदेश दिला. माङया मनात आले, की आधी काही सोपे प्रश्न विचारावेत आणि मग थोडेसे त्याच्या आवडीच्या विषयावरील प्रश्नाकडे वळावे. म्हणून मी समोरच्या उमेदवाराला विचारले, ‘‘तुम्हाला बी.ए.ला प्रथम श्रेणी मिळाली आहे. बी.एड.देखील प्रथम श्रेणीत पास झालात आणि विशेष म्हणजे एम.ए. मराठीतदेखील तुम्ही प्रथम श्रेणी संपादन केली आहे. या सा:या अभ्यासक्रमात तुम्हाला कोणकोणत्या संतांचा अभ्यास करावा लागला?’’ तो म्हणाला, ‘‘आम्हाला बी.ए.-एम.ए.च्या अभ्यासात ज्ञानेश्वरीचे अध्याय पाठय़पुस्तक म्हणून नेमले होते. त्यांचा मी अभ्यास केला.’’ मी म्हणालो, ‘‘तीन वर्षे तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता आहात; तर मग मला ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव तुम्ही सांगावे आणि ज्ञानेश्वरीचे मूळ नाव कोणते, त्याचे मूळ शीर्षक कोणते तेही सांगून टाकावे.’’ माझा हा प्रश्न ऐकताच तो थोडासा गोंधळला. अस्वस्थ झाला. मनातल्या मनात, पण थोडेसे पुटपुटत ‘‘ज्ञानेश्वरांचे नाव, ज्ञानेश्वरांचे नाव.. काय बरं ज्ञानेश्वरांचे नाव?’’ असं म्हणू लागला. आठवण्यासाठी एकदा तो पंख्याकडे बघायचा, एकदा खाली फरशीकडे बघायचा, कधी डोळे मिटायचा, तर कधी डोळे बारीक करीत आठवण्याचा प्रयत्न करायचा. त्याला प्रयत्न करूनही उत्तर सांगता आले नाही. विद्यापीठाचे विषयतज्ज्ञ सदस्य नाराजीने म्हणाले, ‘‘महाशय, तुम्ही तीन वर्षे ज्ञानेश्वरी अभ्यासली, प्रथम श्रेणीत पास झाला याचे खरोखर आश्चर्य वाटते आहे. बरे ते राहू द्या. 
तुम्हाला कोणती कादंबरी विशेष आवडते?’’ कोंडवाडय़ात अडकलेल्या कोकराने दार उघडे करताच चपळाईने बाहेर धावावे, त्या चपळाईने ते भावी प्राध्यापक म्हणाले, ‘‘मला रणजित देसाईंची स्वामी कादंबरी खूप आवडते. दोनदा वाचली मी!’’ त्यावर मी लगेच त्यांना विचारले, ‘‘ही कादंबरी तुम्हाला का आवडली याची चार कारणो सांगा. म्हणजे चार वाक्यांत चार वैशिष्टय़े सांगा.’’ त्यावर जराही विचार न करता मोठय़ा आवेशात आणि उजव्या हाताने हातवारे करीत ते महाशय म्हणाले, ‘‘फार ग्रेट कादंबरी आहे ही! ग्रेट म्हणजे अगदीच ग्रेट़ अशी ग्रेट कादंबरी दुसरी सांगता येणार नाही. कोणत्याही ग्रेट कादंबरीचे मोठेपण अशा चार वाक्यांत सांगता येणार नाही. म्हणून मी सांगत नाही.’’ त्याचे हे उत्तर ऐकून सारेच सदस्य गालातल्या गालात हसायला लागले. आमच्या संस्थेच्या चेअरमनना राहवले नाही. ते म्हणाले, ‘‘आपण दिलेले उत्तरही ग्रेट आहे आणि आपणही मराठीतले ग्रेटच आहात. या तुम्ही. यथावकाश समितीचा निर्णय कळेल आपणाला.’’
नंतर दुसरे महाशय मुलाखतीसाठी आले. त्यांना एका सदस्याने विचारले, ‘‘तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय करून द्या.’’ त्यावर ते आत्मविश्वासाने सांगू लागले, ‘‘माझं परीक्षेतलं यश तर तुम्ही पाहिलेलं आहेच. मी यापूर्वी एका कॉलेजमध्ये अर्धवेळ म्हणजे पार्टटाइम नोकरीला होतो. कारण कळले नाही; पण त्यांनी मला वर्ष संपताच काढून टाकलं. माङो आतार्पयत पाच-सहा दैनिकांत लेख प्रसिद्ध झाले आहेत. म. फुल्यांचे चरित्र यावर मी लेखन केले आहे. तुकाराम बीजेवेळी मी संत तुकारामांवर लिहिले आहे. आगरकरांचा एक धडा पाठय़पुस्तकांत आहे. त्याची ओळख मी लेखातून करून दिली आणि कुसुमाग्रजांच्या कवितेवरही माझा एक लेख एका साप्ताहिकात आला आहे.’’ आमच्या चेअरमन साहेबांनी हाताने थांब-थांब म्हटल्यावर तो एकदाचा थांबला. मराठीचे ब:यापैकी वाचन असलेल्या एका प्राचार्यानी विचारले, ‘‘कुसुमाग्रजांच्या कवितेची बलस्थाने सांगता का आम्हाला?’’ क्षणभर विचार करून ते महाशय म्हणाले, ‘‘कुसुमाग्रजांची कविता म्हणजे आग आहे, आग! काय सांगावं तुम्हाला? कविता वाचताना आपणाला चटके बसतात. ही साधीसुधी आग नाही. पेटलेल्या शब्दांची आग आहे. ती विझता विझत नाही. कुणालाच विझवता येणार नाही.’’ असे तो तावातावाने बडबडत होता. ‘‘ही आग आपल्या कॉलेजला लागू नये म्हणूनच याआधीच्या कॉलेजने तुम्हाला मुक्त केलेले दिसते. ही आग थोडी शांत होऊ द्या. नंतर आम्ही तुमचा विचार करू,’’ असे अध्यक्षांनी सांगून मराठीच्या या अभ्यासकाला परत पाठविले.
नंतरच्या एका उमेदवाराला एका सदस्याने विचारले, ‘‘तुम्ही मला सतराचा पाढा बिनचूक म्हणून दाखवा.’’ दुस:याने विचारले, ‘‘चांगल्या शिक्षणाचे प्राणभूत घटक कोणते?’’ तिस:या एकाने आणखी एका उमेदवाराला विचारले, ‘‘सप्तमी विभक्तीचे प्रत्यय सांगा?’’ मुलाखतीला आलेल्या जवळ-जवळ एकाही उमेदवाराला अचूक आणि समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. थोडय़ाशा निराश शब्दांत चेअरमन म्हणाले, ‘‘देशप्रेम, मानवता, चारित्र्याची जडण-घडण, स्वत:च्या कर्तव्याचे ज्ञान, मनाची श्रीमंती आणि संस्कारांची पेरणी ही स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे या अवस्थेत कशी साकार होतील देव जाणो! भिजलेल्या वातीला पेटवून प्रकाशवाटा दिसतील, असे वाटत नाही. या मुलांच्या मोठमोठय़ा पदव्या म्हणजे वांझ गाईच्या गळ्यात दुधासाठी बांधलेल्या न वाजणा:या घंटा वाटतात. दुर्दैव समाजाचे आणि शिक्षणाचे.’’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व 
निवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: Worshipers of today's goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.