संसार त्यागणारा मोह
By Admin | Updated: August 6, 2015 13:38 IST2015-08-06T13:38:18+5:302015-08-06T13:38:18+5:30
साधूंच्या जगात साध्वी होणं सोपं नाही. ‘बाई’ असल्यानं नाना प्रकारचे किटाळ, त्यापाठोपाठचा मनस्ताप आणि अवहेलना त्यांच्या वाट्याला अनेकदा येते. आजही अनेक साधूंना महिलांनी आपल्या जगात शिरणं मान्य नाही. एखादे साधूबाबा बोलता बोलता सहज म्हणतात, ‘जो खुद माया है, वो मोहमाया कैसे त्याग कर पाएगी?’

संसार त्यागणारा मोह
>..प्रतिष्ठेच्या लढाया लढणा:या साधूंच्या जगात आता साध्वीही आपले हक्क मागायला निघाल्या आहेत!
मेघना ढोके
साधू असतात,
मग साध्वी नसतात का?
की साधू समाजात महिलांना काही स्थानच नसतं?
- हे प्रश्न मलाही पडत होतेच. आखाडय़ाचा, खालशाचा प्रमुख कुणीतरी साधू महंतच असतो. शाहीस्नानं, त्यासाठीच्या मिरवणुका, मानापमान या सा:यांत महिला कुठंच नसतात हे नेहमी दिसणारं चित्र. त्यावर विसंबलं तर वाटतं, की महिलांना या साधू समाजातही दुय्यमच स्थान असतं! पण गेल्या कुंभमेळ्याच्या काळात साधुग्राममधून फिरताना जे चित्र उलगडत गेलं, ते मात्र वेगळं होतं!
समान हक्क आणि सबलीकरणाच्या ना:यापेक्षा वेगळं आणि खरं सांगायचं तर खूप त्रसदायकही.
कुठल्याही बडय़ा आखाडय़ात, खालशात भगव्या-पांढ:या कफनीतल्या महिला दिसल्या की ‘या साध्वी असतील का?’ असा प्रश्न पडायचा. मग त्यांना गाठून ‘बात करनी है’ म्हणत मिन्नतवा:या करणं सुरू व्हायचं.
नाशिक-त्र्यंबकेश्वरी जी आखाडय़ांची स्थानं आहेत, तिथं महिला साध्वी अपवादानंसुद्धा भेटल्या नाहीत. त्र्यंबकेश्वरात तर डोंगरांच्या पोटात असलेल्या आखाडय़ांत म्हातारे झालेले, एकेकटे, दूरस्थ शैव साधू भेटले. (शैव साधू म्हणजे नागा साधू नव्हेत, सगळे शैव साधू ‘नागा’ नसतात. साधू समाजातही अनेक भेद, पोटभेद आणि आराध्यभेद-भक्तिभेद आहेत आणि ते आपल्या समाजातल्या जातीपातीइतकेच किंवा त्याहूनही जास्त टोकाचे आहेत.) मुळात या आखाडय़ांची आर्थिक ऐपत बेतासबात, त्यात साधूंचे कठोर नियम. त्यामुळे महिला साधक, साध्वी काही या आडवाटांवर भेटल्या नाहीत.
त्या भेटल्या थेट कुंभमेळा सुरू झाल्यावर! अनेक बडय़ाबडय़ा श्रीमंत खालशांमधे!
उत्सुकता तीच की, या महिला साध्वी कशा झाल्या? आखाडय़ांत आणि या साधूव्यवस्थेत त्यांचं स्थान काय? ज्या खालशांमधून या साध्वी आलेल्या असत त्यांच्या महंतांना, मुख्य बाबाजींना विचारलं की त्यांच्यातले काही तर थेट गार्गी, मैत्रेयीपासून पुराणातल्या महातेजस्वी, महाग्यानी, महाप्रतापी महिलांचे दाखले देऊ लागत. चालू वर्तमानकाळातल्या या साध्वींच्या जगण्याविषयी मात्र काहीतरी थातुरमातुर सांगून समजूत घातल्यासारखं करत.
काही खालशांत मात्र अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट सांगणारेही महाराज होतेच. हातचं काहीही राखून न ठेवता ते सांगून टाकत सगळं खरं खरं! त्यात रोज जाऊन जाऊन अनेक खालशांतल्या साध्वींशी जसजशी ओळख वाढली, तसतसं हळूहळू ‘पर्सनल’ बोलणं सुरू झालं.
- आणि मग साध्वींच्या त्या गूढ जगात फक्त डोकावण्यापुरती का होईना जायची संधी मिळाली.
‘मतलब, कैसे पता चला की, अब संसार से दूर जाना है.?’
एकदा विचारलं एका साध्वींना, तर त्या हसल्या.
म्हणाल्या, ‘मैने संसार का त्याग नहीं किया, संसार ने ही मुङो त्याग दिया.’
त्या वाक्याचा अर्थ इतकाच की, या बाईंच्या वाटय़ाला परित्यक्तेचं जीवन आलं. मूल होत नाही म्हणून नव:यानं घराबाहेर काढलं. माहेरच्यांनीही थारा दिला नाही. अनेक अपमान पचवून बाई कुठल्याशा आश्रमात पोहचल्या. तिथंच काम करू लागल्या. सेविका बनल्या. मग साधक झाल्या. आणि ध्यानधारणा, भजन-कीर्तन-प्रवचन असं करत करत आता त्या एका आश्रमातल्या मुख्य साध्वी बनल्या होत्या.
अशा कहाण्या कितीतरी!
हे सारं कळलं की त्या साध्वी मग एकदम ‘बिचा:या’ वाटू शकतात. पण तसं वाटून घेण्याची गल्लत केली तर मग काय कळलं आपल्याला हे साध्वींचं जग? त्या बिचा:या नसतात आणि कुणी आपल्याला ‘बिच्चरं’ म्हणावं असं त्या वागतही नाहीत. संसार सोडता सोडताच त्या खमक्या होत असाव्यात आणि बोलायला तर एकदम तेज-कठोर-कोरडय़ाठाक!!
जिथे जिथे साध्वी दिसल्या, त्या खालशांमधे जाऊन जाऊन लक्षात यायला लागलं होतं की या खालशांमधे तर मुख्य साधूंपेक्षा साध्वींचाच शब्द अंतिम आहे. साध्वींच्या नजरेच्या एका कटाक्षावर सारा खालसा, तिथला तामझाम हलतो. एवढंच कशाला, साधूंचा कुणी शिष्य काही सांगत असेल आणि माताजींनी नुस्ती भुवई उंचवली तरी तो शिष्य गप्प होतो. काही खालशांत तर साधूंच्या बरोबरीचं आसन (म्हणजे बसण्यासाठीचा सोफा-खुच्र्या इ.) या माताजींना मिळालेलं दिसतं! खालसावाले त्यांच्या आज्ञा ङोलतात.
.. हे सारं काय असतं मग?
अनेक साध्वींनी खासगीत सांगितलं की, एकदा आखाडय़ात-आश्रमात आलं की कामांची जबाबदारीही पडते. मुख्य म्हणजे स्वयंपाक, त्यासाठीचं नियोजन, व्यवस्थापन यासह झाडपूस, आल्यागेल्याची व्यवस्था या सगळ्या कामांची जबाबदारी येते.
काहीजणी सांगकाम्या, पोटापुरतं काम करत, मग माळ ओढत, भजनाला-प्रवचनाला जाऊन बसतात. काहीजणी मात्र आखाडय़ांची व्यवस्था, हिशेब, पैशाअडक्याचे व्यवहार यांसह निरूपण, प्रवचन यांतही तरबेज होतात. स्थानिक लोकांशी संपर्क उत्तम राखतात. त्यांना मान मिळू लागतो आणि म्हणता म्हणता माताजी या परिसरात लोकांसाठी सल्ला, मार्गदर्शनाच्या केंद्र बनतात. आणि त्या आखाडय़ात मग त्यांचा शब्द चालतो. महंतही त्यांच्या शब्दांना मान देतात. मात्र फेवरिट शिष्य, उत्तराधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे शिष्य, काही खोडसाळ शिष्य आणि माताजी यांच्यात अनेकदा संघर्षाचे प्रसंगही येतात. आखाडय़ातल्या राजकारणाचा, चारित्र्यावर शिंतोडे उडवणा:या आरोपांचाही मग सामना करावा लागतो. अनेक साध्वी अत्यंत खासगीत अशा ब:याच कहाण्या सांगत.
- अर्थात, हे असं शक्तिशाली बनणं सगळ्याच साध्वींना जमत नाही. काही फक्त आश्रयापुरत्या या व्यवस्थेला चिकटून राहतात. या सा:या गर्दीत आणि जेमतेम साधूंच्या भाऊगर्दीत काही अत्यंत विचारी, स्पष्टवक्त्या आणि अभ्यासू साध्वीही भेटल्या. डोक्यावरच्या जटा सावरत इंग्रजी साहित्याचा अभ्यास करणा:या साध्वी गेल्या कुंभमेळ्यात एका ओरिसाच्या खालशात भेटल्या होत्या. आणि अनंतनागहून आलेल्या खालशातल्या साध्वी त्यांनी तर वकिलीचं शिक्षण पूर्ण करून आता पुढील शिक्षणाची तयारी सुरू केली होती.
पण साधूंच्या जगात साध्वी होणं सोपं नाही. ‘बाई’ असल्यानं नाना प्रकारचे किटाळ, त्यापाठोपाठचा मनस्ताप आणि अवहेलना त्यांच्या वाटेला अनेकदा येते. कुंभमेळा आणि शाहीस्नान हा सारा साधूंच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे आजही अनेक साधूंना महिलांनी (साध्वी आणि संन्याशी का असेना) आपल्या जगात शिरणं मान्य नाही. मुळात अध्यात्म आणि भक्ती या दोन गोष्टी महिलांना जमतील असं आजही साधूतल्याही पुरुषी वृत्तींना मान्य नाही, पटतही नाही! कुणी इतकं स्पष्ट बोलत नसलं, तरी बोलता बोलता एखादे साधूबाबा म्हणून जातातच, ‘जो खुद माया है, वो मोहमाया कैसे त्याग कर पाएगी? बोलना एक बात है, साधूता और बात है.’
- अशा जगात आता साध्वीही आपले हक्क मागायला निघाल्या आहेत.
ते मिळतीलही, म्हणजे साध्वींना वेगळा आखाडा म्हणून मान्यता मिळेल, शाहीस्नानाची स्वतंत्र वेळ आणि त्यांच्या आखाडय़ाला आखाडा परिषदेची मान्यताही मिळेल; पण म्हणजे साध्वींना साधू समाजात स्थान मिळेल? त्यातून जगण्याची लढाई संपत नसते.
एक साध्वी एकदा सहज बोलून गेल्या ते अजून स्पष्ट आठवतं, ‘औरत चाहे जो बन जाए, दुनिया छोड दे, दुनिया उसे नहीं ‘छोडती’!’ आणि ही दुनिया म्हणजे कोण?
इतकं सोपं नाही या प्रश्नाचं उत्तर..
..अशा कितीजणी
नव:यानं टाकलेल्या, घरातल्यांनी छळलेल्या, विधवा आणि अविवाहितही महिला कशाबशा आधार शोधत या आखाडय़ात, आश्रमार्पयत पोहचलेल्या. काहीजणी अपवादानं सारं स्वत: त्यागून भक्तिमार्गाला लागलेल्या. मुलंबाळं, पसारा सारं सोडून प्रापंचिक गोष्टींपलीकडचं काही शोधायचं म्हणून बाहेर पडलेल्या. काहीजणी स्वेच्छेने संन्यास घेतलेल्या, काही सेवाभावातून साध्वी झालेल्या, काही रामायणाचं निरूपण करता करता संसार सोडून संन्यस्त झालेल्या, तर काही केवळ भक्तिमार्ग दिसला म्हणून साध्वींचा चोला लेवून घरदार सोडून निघालेल्या.
मात्र साधूंच्या तुलनेत त्यांची संख्या कमीच!
जी बेचैनी, जे अपयश, जी मानसिक अस्वस्थता पुरुषांना छळते, सब छोडछाडके घर-माणसं सोडून पळवत राहते, पळायला भागच पाडते ते सारं महिलांच्या वाटय़ाला नसेल का येत?
की मान्यच नाही आपल्या समाजात बाईनं उंबरा ओलांडून असा मनाबिनाचा विचार करणं?
की मुलाबाळांशी जुळलेली नाळ काही केल्या तुटतच नाही बाईची?
(लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत)
meghana.dhoke@lokmat.com