सौरविमानाची विश्वभरारी
By Admin | Updated: March 8, 2015 17:25 IST2015-03-08T17:25:36+5:302015-03-08T17:25:36+5:30
ना कुठलं इंधन, ना त्यावर कुठला खर्च, ना प्रदूषण. स्वच्छ आणि पर्यायी ऊर्जावापराचा संदेश देत, दिवस-रात्रीचा प्रवास करत जगातलं पहिलं सौरविमान लवकरच अवकाशात झेपावणार आहे..

सौरविमानाची विश्वभरारी
>मयूर पठाडे
ना कुठलं इंधन, ना त्यावर कुठला खर्च, ना प्रदूषण. स्वच्छ आणि पर्यायी ऊर्जावापराचा
संदेश देत, दिवस-रात्रीचा प्रवास करत जगातलं पहिलं सौरविमान लवकरच अवकाशात झेपावणार आहे..
----------------
इंधनाचा एक थेंबही वापरायचा नाही, त्यावर एक पैशाचाही खर्च करायचा नाही, दिवसा आणि अंधार्या रात्रीही हवेतून प्रवास करायचा, प्रदूषण जवळजवळ नाहीच आणि तरीही विश्वप्रदक्षिणा करायची; तीही विमानातून!. कल्पना वेडगळ वाटेल, पण हे सत्य आहे! स्वित्झर्लंडच्या ‘सोलर इम्पल्स’ या कंपनीनं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा चंग बांधला आहे आणि येत्या काही दिवसांत सौरऊर्जेवर चालणारं हे विमान विश्वप्रदक्षिणेसाठी अवकाशात भरारी घेईल! त्यासाठीचा ध्यासही थोडाथोडका नव्हे, तब्बल एक तपापासून यावर संशोधन सुरू आहे आणि हा ध्यास प्रत्यक्षात आणणारे दोन वेडे वीर आहेत डॉ. बट्र्रांड पिकार्ड आणि आंद्रे बॉशबर्ग ! दोघेही पायलट आहेत आणि पर्यायी, स्वच्छ ऊर्जेच्या ध्यासानं त्यांना पछाडलेलं आहे.
त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. ‘राईट बंधूंनी विमान उडवण्याचा चंग बांधला, त्यावेळीही सगळ्यांनी त्यांना वेड्यातच काढलं होतं. पण हवाईउड्डाण ही आता इतकी नियमित बाब झाली आहे की विमानाशिवाय प्रवासाचा आपण विचारही करू शकत नाही. प्रदूषणानं आज जग नष्ट होण्याची वेळ आलेली असतानाही आपण पर्यायी, स्वच्छ ऊर्जेचा वापर न करणं, त्यात संशोधन न करणं म्हणजे करंटेपणा आहे. आमचंही उद्दिष्ट काही लगेच सौरऊर्जेवरचं प्रवासी विमान तयार करणं नाही. त्याला वेळ लागेल, पण तेही शक्य आहे. सौरऊर्जेचा वापर जर हवाई उड्डाणासाठी करता येत असेल, तर मग रस्ते वाहतुकीसाठी सौरऊर्जेचा वापर करणं तुलनेनं अगदीच सोपं, सहज, सुरक्षित आणि कमी धोकेदायक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरातल्या तरुणाईला पर्यायी ऊर्जेसाठी प्रेरित करणं आणि ‘हो, हे घडू शकतं, मीदेखील हे करू शकतो’ असा विश्वास जगातल्या प्रत्येकाच्या मनात जागवणं एवढंच आमचं माफक ध्येय आहे तेच आम्ही करतोय!’
‘वेडा’ डॉक्टर
स्वीस संशोधक बट्र्रांड पिकार्ड यांचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे, इंधनाशिवाय हवाई प्रवास करायचा! त्याची प्रत्यक्ष सुरुवात झाली १९९९ मध्ये. त्यांनी पहिला जगप्रवास केला तो बलूनमधून. त्यासाठी त्यांना लागलेला कालावधी होता १९ दिवस आणि ५५ मिनिटे. या जगभ्रमणासाठी त्यांना ३.६ टन प्रोपेन वायू लागला होता. याच प्रवासात सौरऊर्जेवर चालणार्या विमानाची कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यानंतर मग त्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहूनच घेतलं. बट्र्रांड पिकार्ड हे डॉक्टर, मनोविकारतज्ज्ञ, वैमानिक, संशोधक आणि या कल्पनेचे प्रणेता आहेत.
ध्येयवादी इंजिनिअर
साहसी कल्पनांचं वेड असणारा बट्र्रांडसारखाच दुसरा एक अवलिया म्हणजे आंद्रे बॉशबर्ग. व्यवसायानं ते इंजिनिअर आहेत. फायटर विमानांबरोबरच व्यावसायिक विमानं आणि हेलिकॉप्टर चालवण्यात त्यांचा हातखंडा आहे. बट्र्रांड आणि आंद्रे या दोघांनी मिळून ‘सोलर इम्पल्स’ ही कंपनी सुरू केली. डॉ. बट्र्रांड पिकार्ड हे या कंपनीचे अध्यक्ष, तर आंद्रे मुख्य कार्यकारी अधिकारी. या दोघांनी मिळून या प्रकल्पावर काम सुरू केलं आणि गेली बारा वर्षे त्यावर ते वेगवेगळे प्रयोग करताहेत. या दोघांनी वेड्या स्वप्नाच्या पूर्तीचा नुसता ध्यासच घेतला नाही, तर या प्रयोगाचे ते सर्वेसर्वा आहेत. इतकंच काय, या विमानाचे पायलटही हे दोघेच आहेत!
कसं आहे हे सोलर विमान?
> सौरऊर्जेवर चालणार्या या विमानाच्या पंखांवर सिलिकॉनचे १२ हजार सोलर सेल्स बसविण्यात आले आहेत.
> हे सेल्स अतिशय सूक्ष्म म्हणजे त्यांची जाडी अगदी केसांइतकी आहे.
> विमानावरील सोलर प्लेट्स हेच या विमानाचं इंधन!
> या प्लेट्स सूर्यप्रकाशानं चार्ज झाल्या की त्या ऊर्जेवर
विमान रात्रीही प्रवास करू शकतं.
> विमानाच्या पंखांच्या वरच्या बाजूला सोलर पॅनल्स बसवलेले आहेत, तर खालचा भाग
अल्ट्रा लाईट फॅब्रिकपासून बनवलेला आहे.
> या विमानात एकावेळी एकच जण बसू शकेल.
> विमानाचं वजन - २७४0 किलो
> विमानाची उंची - ६.४0 मीटर
> विमानाची लांबी - २२.४ मीटर
> पंखांची लांबी - ७१.९ मीटर
> विमानाची एकूण क्षमता - २३00 किलो
> ४0 अंश सेल्सिअस - तापमानातही हवाईउड्डाणाची क्षमता.
> विमानाची हवेत उंच उडण्याची क्षमता
- सर्वसाधारणपणे ८५00 मीटर (२७,९00 फूट). मात्र १२000 मीटरपर्यंतची (३९000 फूट) उंचीही ते गाठू शकतं.
विमानाचा ताशी वेग
- ७0 ते शंभर किलोमीटर.
> या विमानात बसवलेल्या चार इलेक्ट्रॉनिक मोटर्सही सौरऊर्जेवरच चालतात!
> सौरऊर्जेवर आतापर्यंत सर्वाधिक अंतर कापल्याचा विक्रम या विमानाच्या नावावर जमा आहे.
‘सोलर इम्पल्स’चा हवाई इतिहास
२00९ या पहिल्या चाचणीत हे विमान उडालं फक्त एक मीटर उंचीपर्यंंत आणि त्यानं अंतर कापलं केवळ ३५0 मीटर!
२0१0 यावेळी या विमानानं पहिल्यांदाच सलग २६ तास उड्डाण केलं आणि रात्रीच्या अंधारातही त्यानं व्यवस्थित प्रवास केला.
२0१२ डॉ. बट्र्रांड पिकार्ड आणि आंद्रे बॉशबर्ग यांचा उत्साह यामुळे आणखी दुणावला आणि त्यांनी या विमानातून थेट स्वीत्झर्लंंड, स्पेन आणि मोरोक्कोपर्यंंतचा प्रवास केला.
२0१३ अमेरिकेच्या मल्टी स्टेज फ्लाईट सेशनमध्ये या विमानाची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली आणि नासाच्या एम्स सेंटरनंही ‘या विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा शक्य असल्याचं’ प्रमाणपत्र दिलं! याचवेळी वर्षअखेरपर्यंंत ‘सोलर इम्पल्स-२’ हे दुसरं सोलर विमान तयार करण्याचं निश्चित करण्यात आलं.
२0१४ एप्रिल २0१४ मध्ये ‘सोलर इम्पल्स-२’ हे विमान तयार करण्यात येऊन ते जनतेसमोर सादरही करण्यात आलं.
२0१५ हेच ‘सोलर इम्पल्स-२’
विमान आता विश्वभ्रमणासाठी अवकाशात झेपावणार आहे.