प्रारंभ - डेव्हिड एलकबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:01 AM2020-06-14T06:01:00+5:302020-06-14T06:05:01+5:30

मी मूळचा इस्रायलचा; पण भविष्याचा शोध घेण्यासाठी  अमेरिकेला जाण्याचा निर्णय मी फार पूर्वीच घेतला होता.   अचानक झालेल्या एका अपघातानं माझी स्वप्नं धुळीला मिळाली. त्यातून सावरण्यासाठी भारतात बहिणीकडे आलो. एका संध्याकाळी, रस्त्याच्या कडेला बसलेल्या  एका फाटक्या माणसाच्या हातातील बासरीच्या स्वरांनी  एकदम माझे लक्ष वेधून घेतले आणि मी  त्या रस्त्यावरच खिळून राहिलो..!  त्यानंतर स्वरांनी माझे बोट घट्ट धरून  मला आपल्याबरोबर कुठे कुठे फिरवून आणले.

In the world of foreign seekers who sell their lives for classical Indian music.. The memories of great Sitar player David Elkabir | प्रारंभ - डेव्हिड एलकबीर

प्रारंभ - डेव्हिड एलकबीर

Next
ठळक मुद्देअभिजात भारतीय संगीतासाठी  जीव वेचणार्‍या  परदेशी साधकांच्या दुनियेत

- डेव्हिड एलकबीर

नियती किंवा योगायोग अशा भाकड गोष्टींना धुडकावून लावत स्वत:च्या र्मजीने आयुष्य जगू बघणार्‍या आणि त्यासाठी 25 वर्षांपूर्वी अमेरिकेला निघालेल्या एका तरुणाची ही गोष्ट. म्हणजे माझीच!!
पाठीवरच्या एका सॅकमध्ये आपला सगळा वर्तमानकाळ भरून भविष्याचा शोध घेण्यासाठी अमेरिकेला जायचे हा निर्णय लष्करी सेवेत असतानाच मी घेतला होता. इस्रायलमध्ये, म्हणजे माझ्या देशात प्रत्येक धडधाकट तरुणासाठी दोन वर्षाची लष्करी सेवा सक्तीची. शिस्तीच्या धारेवर चालणारे ते आयुष्य जगता-जगता पुढच्या मुक्त आयुष्याची माझी स्वप्नं अमेरिकेशी जोडलेली होती. पण एका मोठय़ा अपघातात जायबंदी झालो आणि अमेरिका नावाचे गारुड शब्दश: धुळीला मिळाले. 
अपघाताच्या दु:स्वप्नातून बाहेर पडण्यासाठी बदल हवा होता, मग अमेरिकेसाठी भरलेली सॅक पाठीवर टाकून बहिणीकडे, भारतात निघालो. डोळ्यापुढे कोणतेही उद्दिष्ट नसलेल्या अशा त्या अगदी निरुद्देश मुक्कामात मनात अखंड विचार होता तो मात्र अमेरिकेचा.! 
एका संध्याकाळी, एका बागेजवळ रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका फाटक्या माणसाच्या हातातील छोट्याशा बासरीतून येणार्‍या स्वरांनी एकदम माझे लक्ष वेधून घेतले आणि कोणीतरी घट्ट बांधून ठेवावे तसा मी त्या रस्त्यावर खिळून राहिलो..! 
एखादे बटण दाबून खटकन भोवतालचा कोलाहल म्युट करून टाकावा तसे काहीसे घडले. ती सगळी वर्दळ आपल्या पोटात घेऊन त्याच्यावर पांढर्‍या ढगाप्रमाणे तरंगत असलेले ते स्वर फक्त मला त्या क्षणी ऐकू येत होते. 
जेव्हा जेव्हा ती संध्याकाळ आठवते तेव्हा जाणवते, माझे आयुष्य बदलून टाकणार्‍या एका मोठय़ा प्रवासाचा तो प्रारंभबिंदू होता. शाळेत असताना पालकांच्या आग्रहाने ज्या अनेक गोष्टी कराव्या लागतात त्या रेट्यामुळे मी गिटार वाजवायला शिकलो होतो. पण मला ती कधीच माझी वाटली नाही आणि त्यानंतर माझ्या देशात कानावर पडणार्‍या संगीताने कधी फारसे लक्ष वेधून घेतले नव्हते.
त्या संध्याकाळी ते स्वर ऐकताना वाटले, संगीत असे असते? इतके शांत करणारे? त्यानंतर स्वरांनी माझे बोट घट्ट धरून मला आपल्याबरोबर कुठे कुठे फिरवून आणले. उस्ताद विलायत खांसाहेबांच्या सतारीच्या स्वरांची अद्भुत कमाल आणि मग उस्ताद बहाउद्दीन डागर यांच्या रुद्रविणेमधून झरणारे संथ, गंभीर स्वर याच भटकंतीत कानावर आले. रंगीबेरंगी जत्रेत प्रथमच आलेल्या मुलाने भोवताली दिसणार्‍या हलत्या-झुलत्या-गात्या जगात विरघळून जावे तशी माझी अवस्था झाली होती.
आत खोलवर जाणीव होऊ लागली होती माझ्या जगण्याच्या वेगळ्या, आजवर कधीच न दिसलेल्या वाटेची. त्या वाटेवर दोनच नावे पुन्हा पुन्हा ऐकू येत होती, विलायत खां आणि झिया मोइनुद्दिन डागर. या नावांपलीकडे त्यांच्याबद्दल मला काहीही ठाऊक नव्हते. मी त्यांच्या शोधार्थ वाराणसीला निघालो. 
वाराणसी. गंगेची अखंड, निर्मळ खळखळ आणि अनेक वाद्यांचे-तालांचे-घुंगरांचे स्वर याच्यासह अष्टौप्रहर जागे राहणारे शहर. इथे मला संगीत शिकवणारा गुरु भेटायला वेळ नाही लागला.
ते सतार शिकवणारे एक शिक्षक होते. त्यांच्या छोट्याशा घरात अनेक विद्यार्थ्यांच्या घोळक्यात बसून मी वाट बघत राहायचो, गुरुजींच्या एका कटाक्षाची. त्यांनी मला सतार नावाच्या वाद्याची ओळख करून दिली आणि भारतीय रागसंगीत नावाच्या अफाट विश्वाचे दरवाजे त्यामुळे किलकिले झाले. 
एखाद्या गुहेत शिरावे आणि तिचा अंत न दिसत चालत राहावे अशी काहीशी होती ही ओळख. इथे मला पाय रोवून तरी उभे राहता येईल? मी स्वत:ला विचारू लागलो. पण तरी जे चालले होते ते सोडून माघारी जाण्याचा विचार एकदाही मनात आलं नाही. 
या दोलायमान काळात मला भेटला श्यामसुद्दिन फारीदी नावाचा कलाकार मित्र. त्याच्याच बरोबर प्रथम ऐकली रुद्रवीणा. धरमशालाच्या एका छोट्याशा हिरव्या घरात त्या संध्याकाळी बहाउद्दीन डागर यांच्या रुद्रविणेने समोर बसलेल्या दोनशे र्शोत्यांना तीन तास जागेवरून हलू दिले नव्हते.! 
मनातील अमेरिकेच्या स्वप्नाचे फिके झालेले रंग तेव्हा प्रथमच स्पष्टपणे दिसले.  गुरु-शिष्य परंपरेत गुरुच्या सतत सहवासात कलाकार म्हणून जगण्याचे शिक्षण आणि दृष्टी मिळवण्यासाठी जे जे वाट्याला येईल ते आनंदाने स्वीकारण्यास मी आता तयार होतो.
त्या मैफलीनंतर वाराणसी सोडून मी दिल्ली गाठली आणि बहाउद्दीन डागर यांचे शिष्यत्व पत्करले. माझ्या देशातील शिक्षण, माझे कुटुंब, दोन वर्षाचे सैनिकी जीवन, सगळे मी खांद्यावर टाकून आणलेल्या गाठोड्यात बांधून दूर ठेवले. आत्ता मला फक्त हे राग संगीत शिकायचे होते. नव्या देशात आपली मुळे रुजवत, या देशाचे संगीत आणि या संगीताच्या बरोबरीने दिसणारी संस्कृती आपलीशी करायची होती. 
शिष्य म्हणून स्वत:ची ओळख विसरून राहणे सोपे नव्हते. शिवाय गुरुंच्या सहवासात रोजच काहीतरी शिक्षण मिळत नव्हते. पण हळूहळू समजू लागले, या परंपरेत निव्वळ गुरुकडून शिक्षण मिळणे महत्त्वाचे नसते. बरेच काही इतरांचे ऐकून शिकावे लागते. 
बरे-वाईट, सोपे-अनवट असे खूप काही कानावरून सतत जात असताना त्यावर मन आणि बुद्धीची सतत सुरू असलेली प्रक्रिया हेही या शिकण्याचा एक भाग असतो ते त्या वातावरणात वावरताना जाणवू लागले. 
बहाउद्दीन डागर यांच्या शिक्षणात गायनाचा सहभाग अधिक असल्याने ते काही काळ माझ्यापुरते तरी आव्हान होते. धृपद गायकी अंगाने वीणावादन करायचे तर ती गायकी गाऊनच शिष्याला शिकवावे लागणार ना! त्यामुळे आमच्या वर्गात गुरुजी गात आणि विद्यार्थी आपले वाद्य वाजवत हे दृश्य नेहेमीचे. 
या वर्गात कठोर रियाझला पर्याय नव्हता. त्यामुळे गुरुजींनी आठवड्यातून एकदा दोन पलटे शिकवले तरी ते आमच्यासाठी पुरेसे असत! भारत बघण्यासाठी काही दिवसांसाठी म्हणून आलो होतो, आणि आता इथून पाय निघत नव्हता. इतकी भूल पडावी असे काय घडले नेमके? रस्त्यावरच्या त्या बासरीवाल्याने आधी पायात खोडा टाकला आणि मग आपल्या कित्येक शतकांच्या परंपरेसह गुरुजी भेटले.
ज्या विलायतखांच्या सतारीने मला चकित केले होते, त्यांचा वारसा चालवणारा त्यांचा मुलगा, शुजात खां यांनी जेव्हा सतार शिकवण्यासाठी शिष्य म्हणून माझा स्वीकार केला आणि मी पुढची काही वर्षं भारतातून हलणार नाही यावर जणू शिक्कामोर्तब झाले. गायकी अंगाने सतार वाजवणारे माझे सतार गुरु आणि धृपद गायकी वीणेवर वाजवायला शिकवणारे गुरुजी, रोज नव्याने मला भारतीय रागसंगीत समजत होते.. 
भारतीय संगीताने मला आजवरच्या माझ्या जगापेक्षा खूप वेगळे, आजवर अगदी अपरिचित असे विश्व दाखवले. माणसांनी रमावे अशी कोणतीही सुखं तिथे नव्हतीच मुळी..! जुजबी, चटकन संपून जाणारे असे काही माणसांच्या हातावर ठेवावे असा कोणताच इरादा इथे नव्हता. स्वत:ला आणि स्वत:भोवती विणलेल्या छोट्या-छोट्या सुख-दु:खाच्या जाळ्याला ओलांडून पलीकडे असलेली शांतता, निरभ्र आनंदासाठी कोणीही इथे यावे आणि आपल्या कुवतीनुसार आपला ओंजळीत मावेल एवढा आनंद घेऊन जावे एवढेच याचे म्हणणे.
या संगीताने मला परंपरेचे आणि ती सांभाळून ठेवण्याचे महत्त्व शिकवले. नव्या युगाशी समझौता करताना कुठे ठाम नकार द्यायचा तो टप्पा दाखवला आणि त्या टप्प्यावरून पुढे जाण्याची हिम्मत दिली. आणि यासाठी मला दहा वर्षं भारतात मुक्काम ठोकावा लागला..!
माझ्या छोट्याशा देशाने आजवर कधी या संगीताचा आनंदच घेतला नव्हता. सतत अस्थिरतेच्या काट्यावर उभ्या; पण तरीही निधार्राने विकासाचे अनेक पल्ले गाठणार्‍या या देशातील रसिकांनी जेव्हा हे संगीत अनुभवले, दोन तास डोळ्यांची पापणी न हलवता ते संगीत स्वत:मध्ये झिरपू दिले ती शांतता आणि त्यानंतर सहा-सातशे र्शोत्यांची नि:शब्द दाद मला आठवते तेव्हा मला पुन्हा पुन्हा ती रस्त्याच्या कडेची बासरीची सुरावट आठवत राहते.. 

डेव्हिड एलकबीर
डेव्हिड एलकबीर हा इस्रायलमधील कलाकार. गुरु बहाउद्दीन खां यांच्याकडून त्यांनी रुद्रवीणा वादनाचे शिक्षण घेतले त्याच वेळी जगप्रसिद्ध सतारवादक विलायतखां यांचे चिरंजीव शुजात खां यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचे शिक्षण घेतले आहे. गुरु-शिष्य परंपरेत राहून दहा वर्षं शिक्षण घेणार्‍या डेव्हिड यांनी भारतातील अनेक मैफलींमध्ये हजेरी लावली आहे. सध्या ते त्यांच्या देशात ह्या वाद्यांच्या वादनाचे शिक्षण देत आहेत.

मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे 
vratre@gmail.com
(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)

Web Title: In the world of foreign seekers who sell their lives for classical Indian music.. The memories of great Sitar player David Elkabir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.