हिमालयाच्या कुशीत लपलेल्या नंदनवनाची एक सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 03:00 IST2018-07-08T03:00:00+5:302018-07-08T03:00:00+5:30

wondering through unknown terrains in himalaya | हिमालयाच्या कुशीत लपलेल्या नंदनवनाची एक सफर

हिमालयाच्या कुशीत लपलेल्या नंदनवनाची एक सफर

-वसंत वसंत लिमये 

‘‘आनंद, हिमयात्रेला येणार का?’’ - प्रथितयश मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. आनंद नाडकर्णी यांना फोन केला होता.
‘‘बाळ्या मस्तच, मला कधीपासून हिमालयात स्केचिंग करायचंय ! पण काय रे, टॉयलेटचं काय?’’
‘‘टॉयलेट सीट आहे.’’
‘‘मी आलो !’’ - इति आनंद.
हे ‘पिकू’ सिनेमातले डायलॉग नाहीत. आनंदला वयाच्या पाचव्या वर्षापासून एका पायाला त्रास आहे. हिमयात्रेसारख्या सफरीत अशा छोट्या गोष्टीदेखील खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यांची काळजी न घेतल्यास सा-या आनंदावर पाणी फिरू शकतं. आॅक्सिजन सिलिंडर, गाडीतल्या विजेवर चालणारा जॅक आणि पंप, पाणी शुद्धीकरणासाठी भावेअण्णांनी दिलेलं ओझोन उपकरण अशा गोष्टी आम्ही ‘गिरिजे’सोबत घेतल्या होत्या. आपल्या अडचणीचं निराकरण होताच आनंद एका पायावर तयार झाला. आनंद माझा जुना मित्र, त्याच्या घोळ न घालता साहसाला सामोरं जाण्याच्या वृत्तीचं मला कौतुक वाटलं. आनंद शेवटच्या म्हणजेच आठव्या आठवड्यात मनालीमध्ये ‘हिमयात्रेत’ सामील झाला.

 


आठव्या आठवड्यात रोहतांग पास पलीकडे आम्ही लाहौल, स्पिती आणि किन्नौर अशा नवख्या; पण अतिशय रमणीय भागात जाणार होतो. रोहतांगला पर्याय म्हणून सोलंगच्यापुढे धुंडी येथून नऊ किमीचा बोगदा लाहौलमधील सिसूपर्यंत पूर्ण झाला आहे. सध्या बांधकामाचा शेवटचा टप्पा चालू आहे. सोमवारी, आम्ही बोगद्यातून पलीकडे जाण्यासाठी एक निष्फळ प्रयत्न केला. थोडे हिरमुसलो; पण या कामाची व्याप्ती जवळून पाहता आली. या बोगद्यामुळे नागरी आणि आर्मी वाहतुकीत फार मोठा  क्रांतिकारक बदल घडून येणार आहे. रोहतांग पास थंडीत सहा महिने बंद असतो. शिवाय रोहतांगचा रस्ता अतिशय खराब व धोक्याचा असून, त्याची वारंवार दुरु स्ती करावी लागते. धुंडी - सिसू बोगद्यामुळे नवा बारामाही पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.
आम्ही रोहतांग पार करून, ग्राम्फूला उतरून ‘तांदी’ला चंद्रा आणि भागा नद्यांचा संगम पाहायला गेलो. इथून पुढे चंद्रा चंद्रभागा होते, हीच नदी पुढे डोडा पुलापाशी चिनाब होते. रोहतांग पलीकडे लाहौल, स्पिती आणि किन्नौर असे तीन भाग येतात. ‘कुंझुम ला’च्या पश्चिमेला लाहौल तर पूर्वेला स्पिती. ‘सुम्दो’पासून दक्षिणेला किन्नौर सुरू होतो.
सोमवारी आम्ही ग्राम्फूला परत येऊन, कोकसरहून पूर्वेकडे चंद्रभागेच्या काठानं ‘कुंझुम ला’च्या दिशेने निघालो. खडकाळ उंच सखल भागातून काढलेला रस्ता परीक्षा पाहणारा होता. या खो-यात पेट्रोल पंप नाहीत, आर्मीची फारशी वर्दळ नाही, धाबे तुरळकच. ‘छत्रू’पर्यंत आम्हाला एक-दोन ‘बगरवाल’ म्हणजेच मेंढपाळ आणि फक्त पाच-सहा गाड्या भेटल्या. चंद्रा नदीच्या दुतर्फा दिसणारे रौद्र पहाड, चमकदार हिमशिखरं आणि फेसाळत उड्या मारत येणारे ओढे आणि प्रपात यांचं उग्रभीषण सौंदर्य सोबत होतं. पण या खो-यातील एकटेपण अंगावर येणारं आहे. छत्रू येथे ‘पलदन’ म्हातारबुवाच्या ढाब्यावर मुक्काम केला. सुमारे ११,००० फूट उंची. ‘पलदन’ बाबानं खूप प्रेमानं आम्हाला खाऊपिऊ घातलं. आनंद त्याच्या स्केचिंगमध्ये रमला होता. मी फिरत फिरत चंद्रा नदीच्या पुलाकडे जाऊन निवांतपणे एका दगडावर बसलो. पाठीमागे द्वादशीचा चंद्र ढगांच्या पडद्याआडून बाहेर आला होता. पूर्वेकडून दोहोबाजूने काळपट राखाडी उतार नदीकडे कोसळत येत होते. ते उतार हळूहळू शीतल चंद्रप्रकाशात उजळत गेले. चंद्रा नदीची अखंड गाज होती. हवेत छान गारठा होता. निसर्गाच्या त्या अवाढव्य विस्तारात माझ्या क्षुल्लकपणासह मीही हरवून गेलो होतो.
दुस-या दिवशी ‘छोटा दडा’, बातल असं करत आम्ही ‘कुंझुम ला’कडे निघालो. वाटेत दोन नाले पार करायचे होते. त्यातल्या दुस-या नाल्याला ‘पगला नाला’ म्हणतात. दुपारी उशिरा या नाल्याचं पाणी वाढतं. खूप उंचावरून दिवसभराच्या उन्हात हिमनदीचं वितळलेलं पाणी घेऊन येणारा हा नाला उग्र रूप धारण करतो. या नाल्यानं काहीजणांचे बळी घेतले आहेत.अमित अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवत होता. आमचं नशीब चांगलं होतं. त्या दिवशी दोन्ही नाल्यांना फारसं पाणी नव्हतं. आम्ही सुखरूप ‘बातल’ येथे ‘चाचा-चाची’ ढाब्यावर पोहचलो. छोटंसं खोपट असलेला हा ढाबा आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मी या ढाब्यावर सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी एका ब्रिटिश दोस्ताबरोबर राहिलो होतो. दोर्जे चाचांना मी आठवत होतो हे ऐकून खूप बरं वाटलं. चाचाचं वय आता सत्तरीच्या पुढे; पण उत्साह कायम ! खरंच, अशी काळाच्या ओघात पुसट झालेली नाती पुन्हा उजळली की खूप बरं वाटतं !
चंद्राताल हा चंद्रा नदीचा उगम, तिथपर्यंत जाऊन आम्ही नंतर ‘कुंझुम ला’ पार केला. उंची १३,२३१ फूट. आता आम्ही स्पिती नदीच्या खो-यात शिरलो. ‘काझा’पाशी देखणी ‘की’ मोनॅस्ट्री पहिली. ‘पिन पार्वती’ खो-यातील ‘गुलिंग’, नंतर किब्बर या छान गावांना भेट दिली. स्पिती नदीचा खळाळ अखंड सोबतीला होता. ‘कुंझुम ला’ पार करताच हिरवळ लागेल, मग जंगल सुरू होईल अशी माझी अपेक्षा होती. हिमालय तुम्हाला नेहमीच चकित करतो.

ख-या अर्थानं जंगलाची सुरुवात सुम्दो नंतर किन्नौरमध्ये झाली. वाटेतील अविस्मरणीय मुक्काम म्हणजे ‘दनखर’ इथला. ‘दन’ म्हणजे कडा, तर ‘खर’ म्हणजे प्रासाद. एका उंच टेकडीवर एक छोटी मोनॅस्ट्री आणि प्रासाद, कातरकातर कडे आजूबाजूला महिरप म्हणून लावलेले. पेन्सिलला टोक करताना                        निघणा-याकातरलेल्या सालपटांप्रमाणे दिसणारे. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त अफलातून दिसतो. इथेच एका खिंडीत, नव्यानंच सुरू झालेलं ‘यांगझोर’ होमस्टे आहे. तिथलं तान्झीन दांपत्य फारच प्रेमळ होतं. छोपाल आणि युरलो यांचा दोन वर्षांचा ‘गिंडून’ नावाचा मुलगा फारच गोड होता. आनंदशी त्याची विशेष गट्टी जमली. आनंद बरोबर तो मस्त हसत खेळत होता. आनंदच्या स्केचेसमध्ये त्याला विशेष रस होता. आनंद माझा चाळीस वर्षांपासूनचा मित्र. मी पुण्याला आल्यापासून संपर्क कमी झालेला. या सा-या प्रवासात उदंड गप्पा, हास्यविनोद यामुळे धमाल होती. काळाच्या ओघात पुसट झालेल्या आमच्या नात्याला पुन्हा उजाळा मिळाला याचा एक विशेष आनंद होता. ‘हिमयात्रे’त हिमालय होता, सोबत अनेक मित्र होते. अनेक जुन्या नात्यांना नवी झळाळी मिळाली !
किन्नौरमध्ये कल्पा येथून किन्नौर कैलाश शिखर समूह दिसला. भीमा काली मंदिराला जात असताना, गाडीतून हात लांब करून खुडता येतील असा सफरचंदाचा बहर, १९८१ साली ‘गीयू’ येथे सापडलेली एका लामाची ममी, बास्पा नदीचा खळाळता आवेग, टुमदार छोटीशी गावं आणि तिथलं हसरं प्रेमळ आदरातिथ्य, अशा अनेक आठवणींचा कॅलिडोस्कोप.
लाहौल, स्पिती आणि किन्नौर, मी इथे पहिल्यांदाच येत होतो. मी तर चक्क या भागाच्या प्रेमात पडलो आहे. या ‘हिमयात्रे’त मला गवसलेलं हे एक लपलेलं नंदनवन होतं !

(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

vasantlimaye@gmail.com

 

Web Title: wondering through unknown terrains in himalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.