अंधारातील स्त्रिया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 06:00 AM2021-01-31T06:00:00+5:302021-01-31T06:00:07+5:30

निदिध्यासी, संगीताला सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि गुरूला परमेश्वर मानणाऱ्या अनेक त्यागी स्त्रियाआजपर्यंत होऊन गेल्या, पण या स्त्रिया संगीताच्या इतिहासात कधीच कोणाच्या अभ्यासाच्या विषय झाल्या नाहीत.

Women who sacrificed everything for music, but they remained in the dark | अंधारातील स्त्रिया..

अंधारातील स्त्रिया..

googlenewsNext
ठळक मुद्देहिराबाई बडोदेकर स्त्री कलाकारांचा मैफलीचा मार्ग प्रशस्त करीत असताना त्यांचे ‘शालीन वागणे आणि वावरणे’ एवढेच नोंदवणे इतिहासकारांना महत्त्वाचे वाटले..! कधी होणार आम्हाला या स्त्रियांचे कृतज्ञ स्मरण?

- वंदना अत्रे

कौशिकी चक्रवर्ती यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘सखी’चा नृत्यातून अभिनित होत असलेल्या बंदिशीचा दिमाखदार कार्यक्रम समोर सुरू होता. एखाद्या राजदरबारात बसल्याचा भास व्हावा, अशी रंगमंच सजावट. तजेलदार रंगाचे लोड आणि बिछायत, जागोजागी उजळलेले उंच पितळी दिवे, सुगंधी फुले. रंगमंचावर कौशिकीसह सगळ्या तरुण कलाकार. फक्त स्त्री कलाकारांना घेऊन असा चाकोरीबाहेरचा, शास्त्रीय बैठक असलेला कार्यक्रम करण्याची कल्पना सुचली कशी? कौशिकीने या प्रश्नाचे दिलेले उत्तर ऐकताना मला आठवण येत होती, ती गानतपस्विनी मोगुबाई कुर्डूकर यांनी लिहिलेल्या एका घटनेची. कोणत्याही संवेदनशील रसिकाने व्यथित व्हावे अशी ही आठवण. त्यांनी लिहिले आहे, ‘एका कार्यक्रमासाठी कुर्पा नावाच्या गोव्यातील छोट्याशा गावातून आमंत्रण आले. मानधन फक्त पन्नास रुपये, पण कार्यक्रम गोव्यातल्या गोव्यात होता, प्रवासाचा खर्च नव्हता, म्हणून हो म्हटले. साथीदारांना घेऊन गावात पोचले तर कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळी सामसूम. ज्यांनी आमंत्रण दिले त्यांच्याकडे जाऊन अंगणात त्यांची वाट बघत उभी राहिले. कुणीतरी यजमानांना जाऊन सांगितले, “मोगू आलीय..” मोगू? हा एकेरी उल्लेख अगदी जिव्हारी लागला. पण गप्प राहिले. ओसरीवर येत यजमानांनी विचारले, “चहा घेणार की कॉफी?” म्हटले “तुम्ही द्याल ते” पाच मिनिटांनी एका नारळाच्या करवंटीमधून कोमट चहा समोर आला! संतापाने कानशिले गरम व्हावी असेच ते ‘स्वागत’ होते! मी त्या करवंटीला शांतपणे नमस्कार करीत चहा परत पाठवून दिला आणि अंगणाच्या बाहेर जाऊन उभी राहिले.’ देवदासीपणाच्या शापातून बाहेर येत संगीताची उपासना करीत सन्मानाचे जीवन जगू बघणाऱ्या या स्त्रियांना अंगणात उभे करून करवंटीमधून चहा देणारा, मोगू, केशर, तारा असे त्यांना एकेरी नावाने संबोधणारा समाज. त्याबद्दलचा सात्विक संताप आणि दुःख या मुलाखतीत फुटताना दिसते. आपल्या उत्तरात कौशिकी मला सांगत होती, मोगलांच्या आक्रमणाच्या पायाखाली कदाचित जे अभिजात संगीत चिरडून गेले असते, मातीला मिळाले असते ते सांभाळून ठेवणाऱ्या अनेक अनाम स्त्रियांबद्दलचे कृतज्ञ स्मरण? करावे या कल्पनेतून जन्म झाला ‘सखी’चा! अठराव्या-एकोणीसाव्या शतकात झालेल्या सामाजिक उलथापालथीत गाणे सांभाळून ठेवणाऱ्या या स्त्रियांना इतिहासाने डावलल्याची वेदना ‘सखी’मध्ये थेट शब्दांमध्ये फारशी मुखर होत नाही, पण त्याची जाणीव एकविसाव्या शतकातील एका कलाकार स्त्रीला व्हावी हे केवढे दिलासा देणारे..! अन्यथा या स्त्रियांच्या वाट्याला आली ती फक्त उपेक्षा.! एखाद्या व्रताप्रमाणे संगीताची कठोर साधना करणाऱ्या आणि अनेकदा उस्तादांना आपल्या तयारीने आव्हान देणाऱ्या या स्त्रिया. इतिहासाच्या पानांमध्ये मात्र त्यांच्या नावाच्या नोंदी मोठ्या मुश्किलीने आढळतात. शास्त्रीय संगीत शिकणारी पहिली गोमंतक कलाकार सरस्वतीबाई बांदोडेकर केवळ शिक्षण घेऊन थांबल्या नाहीत. गिरिजाबाई केळेकर, केशरबाई बांदोडेकर, ज्योत्स्ना भोळे अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. हे इतिहासाला कधी दिसले कसे नाही? गाण्यासाठी संसाराचा त्याग करून ब्रह्मचारिणी राहण्याचे व्रत मान्य असलेल्या बाबलीबाई साळगावकर रोज अठरा तास रियाझ करीत, एवढी जुजबी माहिती इतिहासात आढळते.

यामध्ये पुढे लिहिले आहे, बडोदा रियासतीत गाण्याचे आमंत्रण मिळाले तेव्हा त्या रात्रभर गात होत्या.! संगीताबरोबर संस्कृत,उर्दू, हिंदी यावर त्यांचे प्रभुत्व होते. नोनाबाई, शामाबाई आणि उमाबाई या काकोडकर भगिनींचा आवाज इतका सारखा की एकीचा दमसास सुटला की दुसरी तो स्वर पकडत असे आणि श्रोत्यांना समजतसुद्धा नसे! टप्पा, ठुमरी, गझल याचा डोळस अभ्यास करणाऱ्या, मुंबईमध्ये होणाऱ्या संगीत जलशांमध्ये हजेरी लावणाऱ्या या स्त्रियांबद्दल केलेली एक त्रोटक नोंद फारच बोलकी आहे. ती लिहिणारे विलायत हुसेन आग्रेवाले म्हणतात, निदिध्यासी, संगीताला सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि गुरूला परमेश्वर मानणाऱ्या गोमंतकीय स्त्रियांसारख्या त्यागी स्त्रिया अन्यत्र आढळल्या नाहीत. या स्त्रिया संगीताच्या इतिहासात कधीच कोणाच्या अभ्यासाच्या विषय झाल्या नाहीत. आणि हिराबाई बडोदेकर स्त्री कलाकारांचा मैफलीचा मार्ग प्रशस्त करीत असताना त्यांचे ‘शालीन वागणे आणि वावरणे’ एवढेच नोंदवणे इतिहासकारांना महत्त्वाचे वाटले..! कधी होणार आम्हाला या स्त्रियांचे कृतज्ञ स्मरण?

vratre@gmail.com

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: Women who sacrificed everything for music, but they remained in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.