जिन्दगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें...
By Admin | Updated: January 23, 2016 14:50 IST2016-01-23T14:50:56+5:302016-01-23T14:50:56+5:30
बज्म.. हा अडीच अक्षरी शब्द उच्चारताच एक रुणझुणता नाद हिंदळतो ना ओठांवर? हो.. हिंदळतच असणार. कारण, नादाचे हजारो प्रतिध्वनी एकसंध होतात तेव्हाच तर बज्म अर्थवाही होते. बज्म म्हणजे सजलेली मैफल. सं

जिन्दगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें...
बज्म.. हा अडीच अक्षरी शब्द उच्चारताच एक रुणझुणता नाद हिंदळतो ना ओठांवर?
हो.. हिंदळतच असणार. कारण, नादाचे हजारो प्रतिध्वनी एकसंध होतात तेव्हाच तर बज्म अर्थवाही होते. बज्म म्हणजे सजलेली मैफल. संधीकाळाचा उंबरठा ओलांडून सांझ जेव्हा चोरपावलांनी पुढे सरकते तेव्हा रातराणीच्या मधाळ गंधाला भाळून एकामागून एक उतरतात शब्दांचे कसिदे अन् ही बज्म आणखी रंगीन व्हायला लागते. तेव्हा शहरयार या ब•मला शब्दात कसे बांधतात बघा..
जिन्दगी जब भी तेरी
बज्म में लाती है हमें
ये जमीं चाँद से बेहतर
नजर आती है हमें
सूर्ख फूलों से महक
उठती हैं दिल की राहें
दिन ढले यूँ तेरी
आवाज बुलाती है हमें
अशा या सजलेल्या बज्ममध्ये तसे तर पाहायला हजारो देखणो चेहरे असतात़ पण, त्या हजारोंच्या गर्दीतही एक चेहरा असा असतो की ज्याच्या आरसपानी सौंदर्याच्या तेजाने या मैफलीला ‘चार चाँंद’ लागलेले असतात़ ही मैफल ऐन रंगात येत असताना तोच ‘चाँंद’ अचानक स्वत:हून ढगांची चादर पांघरू पाहतो अन् निसारच्या तोंडून हे शब्द अगदी अलगद बाहेर पडतात..
ये तुम्हारे ही दम से हैं बज्म-ए-तरब
अभी जाओ तुम न करो ये गजब
कोई बैठ के लुत्फ उठाएगा क्या
की जो रौनक-ए-बज्म तुम ही न रहें?
विषय बज्मचा असेल आणि साकीची चर्चा होणार नाही, हे कसे शक्य आहे? कारण, कुठल्याही बज्मची यशस्वीताच मुळात साकीच्या हातातील जामवर अवलंबून असत़े साकी जितका आपला हात सैल सोडेल तितकी ही बज्म तरुण होत जात़े म्हणूनच सुदर्शन फाकिर साकीला ‘जुस्तजू’ करताना म्हणतात.
ढल गया आफताब ऐ साकी
ला पिला दे शराब ऐ साकी
तेरी बज्म छोड़ कर कहाँ जाऊँ
है जमाना खराब ऐ साकी..
पण, प्रत्येकवेळी ही बज्म आपल्या मनासारखीच सजेल, प्रत्येकवेळी साकी आपल्या शेजारी असेल असे होत नाही़ बहरलेली ही मैफल अचानक वैराग्य धारण करते तेव्हा ही बज्म सोडताना हेच शब्द ओठी येतात.
याद की बज्म सजी
दिल में सितारों की तरह
फिर से महसूस खलिश दिल ने की
खारो की तरह
दूर वो हो गया अब हम से दरारों की तरह
उससे मुश्किल है मुलाकात किनारों की तरह..
- शफी पठाण
(लेखक ख्यातनाम शायर आणि ‘लोकमत’च्या
नागपूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक आहेत)
shafi.pathan@lokmat.com