तेव्हा कस्तुरबा समजली...

By Admin | Updated: August 30, 2014 15:01 IST2014-08-30T14:55:45+5:302014-08-30T15:01:23+5:30

रिचर्ड अँटनबरो यांच्या ‘गांधी’मध्ये कस्तुरबांची भूमिका करणार्‍या अभिनेत्रीने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

When Kasturba realized ... | तेव्हा कस्तुरबा समजली...

तेव्हा कस्तुरबा समजली...

 रोहिणी हट्टंगडी

 
'गांधी’ चित्रपटकरण्याची मला संधी मिळाली तो १९८0 चा काळ असावा. भूमिका मिळावी म्हणून रिचर्ड अँटनबरो यांना भेटायला जाताना माझ्यावर दडपण होते. कस्तुरबा गांधींची भूमिका, त्या भूमिकेसाठी तेआपल्याला पडताळून पाहणारेत, एक ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक आणि तोही ब्रिटिश! मनावर तणाव घेऊनच मी त्यांना सामोरी गेले! ही पहिली भेट कायम लक्षात राहिली. करारी तरीही सौम्य, कर्तबगार तरीही ऋजू, बुद्धिमान तरीही कुठलाही अभिनिवेश नाही असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते! आपल्या ब्रिटिश पार्श्‍वभूमीचे कुठलेही दडपण भारतीय कलाकारावर येऊ नये, या त्यांनी सहज घेतलेल्या दक्षतेमुळे मी भारून गेले! त्यांनी गप्पा मारता-मारता मला बोलतं केलं. मी थिएटर करते हे जाणून ते संतुष्ट झाले असावेत. प्रसन्न वातावरणातून मी बाहेर पडले. मनाशी विचार केला, कस्तुरबांचा रोल मिळो, न मिळो; पण रिचर्ड अँटनबरोंशी अविस्मरणीय भेट तर झाली !
काही दिवसांनी मला त्यांनी लंडनला स्क्रीन टेस्टसाठी भेटायला बोलावल्याचे समजले. माझ्यासाठी हा आश्‍चर्याचा सुखद धक्का होता! एक महिन्याने मी लंडनला पोहोचले. त्यांची स्क्रीन टेस्ट म्हणजेकस्तुरबा गांधीचा पूर्ण गेट-अप करून एका संपूर्ण सीनचे चित्रण होते. तीन मिनिटांच्या दृश्यासाठी त्यांनी इतके परिश्रम घेतले. काम संपल्यानंतर तिसर्‍या दिवशी ते शूट केलेली फिल्म पाहणार होते. त्यांच्याशी भेट झाल्यावर मी विचारलं, Can i see it Sir?  त्यांनी Yes, off- course.. म्हणत संमती दिली. पाहून झाल्यावर मंद स्मित करत त्यांनी म्हटलं, You did well! You don’t have to act! पिसासारखी हलकी-फुलकी होऊन मी आले.
ठरल्या तारखेला त्यांचे युनिट भारतात डेरेदाखल झाले.  माझे शूटिंग २५ आठवडे चालले. त्यांना गांधीजी, त्यांचे चरित्र, त्यांच्याशी निगडित इतिहास, व्यक्ती, सनावळी सगळेच मुखोद्गत होते. सेटवर रिचर्ड सर सगळ्यांशी सौम्यपणे वागत, कुठेही दिग्दर्शकीय तोरा नाही! कलाकार-निर्माता-दिग्दर्शक-तंत्रज्ञ सगळ्यांना सारखी वागणूक! कलाकाराला ते पूर्ण स्वातंत्र्य देत. सूचना नम्रपणे देत असत.मी त्यांना कुणावरही चिडलेले, रागावून बोललेले पाहिले नाही! मनाची श्रीमंती असलेल्या तेजपुंज रिचर्ड सरांना या काळात अनुभवता आलं. कस्तुरबांच्या अखेरच्या दिवसाचे चित्रण करताना माझी अंगकाठी कृश, अशक्त दिसावी, असं त्यांनी सुचवलं. ते काही दिवस मी फक्त चहावर घालवलेत!
 गांधी सिनेमा बनवताना ते कर्जबाजारी झाले; पण गांधींवरील सिनेमास न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे, अनेक पातळ्यांवर संघर्ष केला! प्रसंग असाही घडला, पैशांअभावी त्यांच्या हातातून गांधी अन्य प्रॉडक्शनकडे गेला! आणि अवघं जीवन ज्या सिनेमाच्या ध्यासात गेले, त्या सिनेमाचे स्क्रिप्ट या महानुभावाने पुन्हा दामदुप्पट किमतीने विकत घेतले! स्वत: लिहिलेले स्क्रिप्टचे बाड विकत घेणारे सर रिचर्ड हेच माझ्या दृष्टीने महात्मा ठरलेत!
(लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आहेत.)
शब्दांकन-पूजा सामंत
 

Web Title: When Kasturba realized ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.