लग्नाचा मुहूर्त म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 12:33 PM2023-11-26T12:33:57+5:302023-11-26T12:34:24+5:30

Marriage: विवाह मुहूर्त पाहून केलेले सर्वच विवाह यशस्वी होतात का, विवाह मुहूर्त नसताना जर कार्य केले तर ते अयशस्वी होते का, मुहूर्त नसताना ‘काढीव’ मुहूर्तावर विवाह कार्य करणे योग्य आहे का, असे प्रश्न अनेक जण विचारीत असतात.

What is the marriage Mahurt? | लग्नाचा मुहूर्त म्हणजे काय?

लग्नाचा मुहूर्त म्हणजे काय?

- दा. कृ. सोमण
पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

विवाह मुहूर्त पाहून केलेले सर्वच विवाह यशस्वी होतात का, विवाह मुहूर्त नसताना जर कार्य केले तर ते अयशस्वी होते का, मुहूर्त नसताना ‘काढीव’ मुहूर्तावर विवाह कार्य करणे योग्य आहे का, असे प्रश्न अनेक जण विचारीत असतात. अर्थात पुढे त्या संसारांचे काय होते याविषयी अजून कोणीही संशोधन केलेले नाही. आपल्याकडे विवाह हा एक शुभ संस्कार मानला जातो. विवाहकार्य निर्विघ्नपणे  व्हावे, वधू-वरांचा भावी संसार सुखाचा व्हावा यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाहाच्या वेळी आप्तेष्ट मित्रमंडळी वधू-वरांना शुभाशीर्वाद, शुभेच्छा देत असतात. विवाह मुहूर्तावर विवाह संस्कार करणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो.

विवाह संस्कार
गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमधर्मामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रम धर्माचरणाची योग्यता विवाह संस्कारानेच प्राप्त होते. विवाह विधींमध्ये विवाह होम आणि गृहप्रवेशनीय होम हे दोन प्रमुख विधी सूत्रकारांनी सांगितलेले आहेत. विवाह होमामध्ये होम, पाणिग्रहण, लाजाहोम, अग्निप्रदक्षिणा, अश्मारोहण, सप्तपदी आणि ध्रुवादिदर्शन हे विधी असतात. गृहप्रवेशनीय होमामध्ये गृहप्रवेश, होम, वधूला उपदेश आणि देवता प्रार्थना हे विधी असतात. तसेच पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, मंडपदेवता स्थापन, वाग्दान, सीमांतपूजन, ऐरणीपूजन इत्यादी धार्मिक विधीसंस्कारही केले जातात.

कौटुंबिक आनंद सोहळा
अनेक लोक विवाहाच्या शुभ मुहूर्ताच्या वेळेला खूप महत्त्व देतात. वैदिक पद्धतीने सर्व विवाहाचा विधी अगोदर करून घेतात आणि मंगलाष्टके म्हणून शुभ मुहूर्तावर वधू-वर एकमेकांना माळा घालतात. शेवटी विवाहकार्यात मुहूर्त वेळेबरोबरच हौस- मौज, कुलाचार यांनाही सध्या विशेष महत्त्व दिले जाते. तो कौटुंबिक आनंद सोहळा असतो. 

-‘काल: शुभक्रियायोगी मुहूर्त: इति कथ्यते ।’ म्हणजे शुभ कर्मांना योग्य असा काल म्हणजे मुहूर्त होय. अशी मुहूर्त शब्दाची व्याख्या ‘विद्यामाध’ या प्राचीन ग्रंथात दिलेली आहे. ऋग्वेदात ‘दिवस सुदिन असताना’, असा उल्लेख आढळतो.
- आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतच्या कालाला चातुर्मास म्हणतात. हे दिवस पावसाळ्याचे शेतीच्या कामांचे असतात. प्रवास करणेही कठीण जात असते. चातुर्मासात विवाह मुहूर्त दिलेले नसतात. तसेच, नियमांप्रमाणे विवाहयोग्य शुभ दिवस आणि शुभ वेळ काढली जाते. 
-पंचांगे आणि दिनदर्शिकांमधून विवाह मुहूर्त दिलेले असतात. हल्ली काही ग्रंथांचा आधार घेऊन चातुर्मासातही ‘काढीव मुहूर्त’ वेगळे देण्यात येतात. अडीअडचणींच्या वेळी या काढीव मुहूर्तावर विवाह कार्ये केली जातात.

...आणि शुभ मुहूर्त वेळ चुकते
- आधुनिक कालात कधीकधी काही कार्यात विवाह मुहूर्ताची वेळही पाळली जात नाही. हेही खरे आहे. काही कार्यात वधूला मेकअप करायला, सजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे शुभ मुहूर्ताची वेळ चुकते. 
-काही कार्यात नवरा मुलगा मिरवणुकीने मंगलकार्यात येत असतो. वऱ्हाडी नाचत येत असल्याने मिरवणुकीला उशीर होतो, मुहूर्ताची वेळ टळून जाते. काही कार्यात अंतरपाट दूर होताच माळ घालण्यापूर्वी उत्साही वऱ्हाडी वधू-वरांना उंच उचलतात. कधीकधी रंगाचा बेरंगही होतो. 

Web Title: What is the marriage Mahurt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न