दीपिकाचा तो चॉइस मग आमचं काय?
By Admin | Updated: April 12, 2015 18:53 IST2015-04-12T18:53:27+5:302015-04-12T18:53:27+5:30
ओरडून विकणा-याचे कुळीथही विकले जातात ही झाली जुनी म्हण; आता या म्हणीला एक नवीन जोड द्यायला पाहिजे, ‘कोण ओरडतंय, कुठं ओरडतंय आणि कसं ओरडतंय’ हे महत्त्वाचं!

दीपिकाचा तो चॉइस मग आमचं काय?
अनन्या भारद्वाज
ओरडून विकणा-याचे कुळीथही विकले जातात ही झाली जुनी म्हण; आता या म्हणीला एक नवीन जोड द्यायला पाहिजे, ‘कोण ओरडतंय, कुठं ओरडतंय आणि कसं ओरडतंय’ हे महत्त्वाचं! हे गणित जमलं तर तुम्ही काय वाटेल ते विकू शकता, तेही समाजसुधारणोचा अत्यंत आक्रमक आणि पुढारलेला चेहरा घेऊन! सरळसाध्या आणि निव्वळ व्यापारी कारणासाठी केलेला एखादा व्हिडीओ इंटरनेटवर टाकून वैचारिक वगैरे लोकांना ‘गि:हाईक’ बनवू शकता, त्यांच्यात मोठीच वैचारिक झुंज लावून देऊ शकता आणि मुख्य म्हणजे आपल्या ‘ब्रॅण्ड’चे ढोल पिटण्यासाठी केलेली एखादी जाहिरात समाजातल्या बदलत्या चित्रचं कसं उत्तम प्रतिनिधित्व करते अशी पुरोगामी झूलही वरून मिरवू शकता.
या नव्या चतुर तंत्रचं भलतंच गाजलेलं उदाहरण म्हणजे ख्यातनाम अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘माय चॉइस’ हा व्हिडीओ.
खरंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरल्या एका आघाडीच्या फॅशन मॅगङिानने केलेली ती ‘ब्रॅण्डिंग’ची कॅम्पेन! त्यात दीपिकाबरोबर इतरही क्षेत्रतल्या आघाडीच्या शंभरेक स्त्रियांचे चेहरे दिसतात. जाहिरात अत्यंत आक्रमक, सडेतोड आणि खरंतर उद्धटही होती!
त्यात दीपिका म्हणते,
मी स्त्री आहे. मी हवे ते कपडे घालीन. घालणार नाही. लग्न करीन, करणार नाही. मुलांना जन्म देईन, देणार नाही.. माय चॉइस!
मी लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवीन, लग्नाच्या नात्यात ठेवीन, लग्नाबाहेरही ठेवीन. पुरुषाबरोबर ठेवीन, नाहीतर स्त्रीबरोबर ठेवीन. माय चॉइस!
- स्त्री म्हणून मी काय काय करीन अगर करणार नाही, याची ही यादी भली लांबलचक आहे. प्रत्येक वाक्याच्या शेवटी पालुपद तेच : माय चॉइस!
मला वाटतं म्हणून मी मला वाटतं ते करीन (मला विचारणारे तुम्ही कोण टिकोजीराव?) - असा अत्यंत उद्धट, टोकाचा आणि (पुरुषांबरोबरच विचारी स्त्रियांनाही) सलणारा हट्टाग्रह मांडणारं हे प्रकरण नव्या भाषेत सांगायचं तर तत्काळ ‘व्हायरल’ झालं आणि सर्वत्र पसरलं.
कुणीतरी चक्कर डोक्याने अशी काहीतरी भलती आयडिया लढवून एखादा व्हिडीओ शूट करावा आणि यूटय़ूबच्या कृपेने तो जगभरात बघितला जावा, त्याला मागे खेचणारा नवा कुणी बाजारात येईर्पयत चर्चेत राहावा, हे काही आता नवीन नाही.
नवीन होता तो दीपिकाचा अॅटिटय़ूड आणि ‘माय चॉइस’चा हट्ट मोठय़ा कौतुकाने मिरवणारा एकारलेला, टोकाचा स्त्रीवाद!
या व्हिडीओतली ही ‘बाई’ जे बोलते तेच तमाम भारतीय बायकांचं मत आहे असं मानण्याइतकं दुधखुळं आता कुणीच उरलेलं नाही! मात्र तरीही या व्हिडीओकडे निव्वळ एक ‘ब्रॅण्डिंग’चा प्रयत्न किंवा एक ‘जाहिरात’ म्हणून पाहिलं गेलं नाही.
‘जेंडर सेन्सिटिव्हिटी’ची गंभीर चर्चा घडवत असल्याचा आणि पुरुषांना ‘सेन्सटाइज’ म्हणजेच ‘संवेदनशील’ बनवत असल्याचाही आव आणणारी ही जाहिरात कडवट टीकेचं लक्ष्य झाली.
ही टीका मूळ व्हिडीओएवढीच ‘क्रिएटिव्ह’ होती आणि मूळ व्हिडीओपेक्षाही खोल विचार करणारी, ‘जेण्डर सेन्सिटिव्ह’ होती.
इतके दिवस आपल्याकडे तावातावानं चर्चा होते, ती जाहिरातीतल्या स्त्री प्रतिमांची, स्त्री देहाच्या वस्तूकरणाची! टुथपेस्टपासून पुरुषांच्या अंतर्वस्त्रर्पयत ज्यात त्यात कशाला स्त्री देह दाखवायला हवा, स्त्री ही काही वस्तू (कमोडिटी) आहे का असे सवाल वृत्तपत्रतूनच नाही तर थेट सेमिनारमधून विचारले जात; आजही जातात.
जाहिराती बनवणा:या पुरुषी वृत्तीवर कायम बोट ठेवणारी ही टीका अधिकाधिक बोचरी होत असताना समाजातला एक मुख्य घटक कायम गप्पच होता!
-पुरुष त्याचं नाव!
पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांवर केलेल्या अन्यायाचा अपराधगंड मनात असल्यासारखे कायम गप्पच होते पुरुष!
दीपिकाच्या ‘माय चॉइस’ व्हिडीओचं प्रकरण मात्र जाहिरातीच्या क्षेत्रतल्या चतुर (पुरुष) डोक्यांबरोबरच सर्वसामान्य पुरुषांनाही भलतंच झोंबलं असावं.
‘मला वाटेल ते मी करीन’ असं बजावणारी स्त्री वरवर पाहता ‘माय चॉइस’चं आधुनिक ‘मुक्त’ लेबल मिरवत असली, तरी हे बेजबाबदार स्वातंत्र्य कुणाही विचारी समाजात मान्य होण्यासारखं नाही असं बजवायला इंटरनेटवर पुढे आलेल्या पुरुषांमध्ये स्पर्धाच लागल्यासारखी गर्दी उसळली.
‘माय चॉईस’चे ‘मेल व्हजर्न’ पटापट इंटरनेटवरून व्हायरल होऊ लागले.
ऐकून घेतोय म्हणून किती बोलाल?- असं ठणकावून विचारणा:या या प्रतिक्रिया वरवर गंमतीच्या होत्या ख:या, पण त्यातले मुद्दे मात्र विचारात पाडणारे होते हे नक्की!
गेल्या आठवडाभर ‘माय चॉईस’चे कितीतरी प्रकारचे ‘मेल व्हर्जन‘ इंटरनेटवर धूमाकूळ घालत आहेत!
‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’ च्या कथा आजवर ज्या समाजानं ऐकल्या त्याच समाजात आता ‘पुरुष जन्मा तुझी कहाणी’ असं सांगणा:या कहाण्या हे अनेक सामान्य पुरुष आपापल्या ‘अमॅच्युअर’ व्हीडीओतून सांगत आहेत. पुरुष म्हणून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला, सतत होत असलेल्या हल्लयांना आणि पुरुष सगळेच छळकुटे-विकृत असतात या सरसकटीकरणाला चोप देणा:या व्हिडीओकथा इंटरनेटवर अनेकांनी स्वयंस्फूर्तीनं अपलोड केल्या आहेत!
एकीकडे या व्हिीडीओची राजकीय - सामाजिक विडंबनं होत आहेत, फिल्मी गाण्याच्या मेरी मर्जी म्हणणा:या पॅरोडी सुरू आहेत आणि दुसरीकडे पुरुषांनी अपलोड केलेले व्हिडिओज सांगताहेत की, सगळे पुरुष ‘नालायक’ नसतात, सगळे ‘बलात्कारी’ नसतात आणि सगळे स्त्री देहाकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहत बायकांना पायातली वहाण करायला टपलेले नसतात!
- महत्वाचं म्हणजे या ‘पुरुषांनी’च केलेल्या व्हिडीओमधे कुठलाही पारंपरिक पुरुषी अभिनिवेश नाही. बायका जरा जास्त शहाण्या झाल्याहेत असा उद्धट पवित्र नाही, बरंच संतुलीत आणि संयमी म्हणणं आहे. तमाम पुरुष काही बायकांना छळायला म्हणून जन्माला आलेले नाहीत, एकाच छताखाली रहायचं, तर एकमेकांचं ‘सह-अस्तित्व’ मान्य करणं, याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही हे जे पुरुषांना आता कुठं समजायला लागलंय, ते तरी नाकारू नका एवढंच या व्हिडिओतल्या पुरुषांचं म्हणणं आहे.
पुरुषांच्या डोक्यात चालू वर्तमानकाळात काय चाललेलं आहे हे समजून घ्यायचं असेल, त्यांची काय घुसमट होतेय हे पहायचं असेल, तर हे व्हिडिओ मदत करतील.
पुरुषांना ‘वेगळा’ न्याय कसा?
‘माय चॉईस’ असं लेबल लावून आपण काय करू, कसं जगू हे स्त्रिया फक्त आपल्या मर्जीनुसार ठरवणार असतील आणि आपल्या मर्जीखेरीज कुणाचाही विचार करण्याची त्यांना अजिबात गरज वाटत नसेल,
- तर मग तोच न्याय (या स्त्रियांच्या आयुष्यातल्या) पुरुषांनाही का लावू नये?
तेही त्यांना वाट्टेल तसं वागायला मोकळे असतीलच की मग!
असं सांगणारे हे व्हिडिओज तयार करणारे पुरुष कलाकार आहेत, जाहिरात क्षेत्रतले आहेत, तसे सर्वसामान्यही आहेतच!
(लेखिका टीव्ही सिरीयल्स आणि जाहिरातीचं जग यांचा अभ्यास असलेल्या मुक्त पत्रकार आहेत)