शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तुच्छतेशी लढणाऱ्या नव्या लेखकाचं स्वगत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 11:14 AM

मी ज्या काळात जन्मलो आणि ज्या काळाने, आजूबाजूच्या परिस्थितीने माझं भरणपोषण केलं, तो काळ आर्थिक उदारीकरणानंतरचा होता. मी ज्या मुंबई जवळच्या निमशहरात वाढलो, ते शहर माझ्या डोळ्यांसमोर पाहतापाहता जमिनीवर सांडलेला द्रव पदार्थ जागा सापडेल तसा पसरत जावा तसं पसरत जाताना मी पाहिलं.

- प्रणव सखदेव(लेखक, भाषांतरकार व संपादक sakhadeopranav@gmail.com ) ज्या काळात जन्मलो आणि ज्या काळाने, आजूबाजूच्या परिस्थितीने माझं भरणपोषण केलं, तो काळ आर्थिक उदारीकरणानंतरचा होता. मी ज्या मुंबई जवळच्या निमशहरात वाढलो, ते शहर माझ्या डोळ्यांसमोर पाहतापाहता जमिनीवर सांडलेला द्रव पदार्थ जागा सापडेल तसा पसरत जावा तसं पसरत जाताना मी पाहिलं. मी ज्या मोकळ्या माळरानावर फुटबॉल किंवा क्रिकेट खेळायचो, तिथे पाहता पाहता मोठमोठ्या इमारती उभ्या राहात गेल्या. माझ्या लहानपणीचा काळ संथ म्हणावा एवढा वेग मी वयात आल्यानंतरच्या काळाने घेतला. मी लेखक म्हणून ज्या काळात लिहू लागलो, तो काळ इंटरनेटच्या, सोशल मीडियाच्या उदयाचा आणि या मीडियाने वेगाने आपलं जीवन ताब्यात घेण्याचा आहे. या काळात प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वाचं विखंडीकरण झालं. जादूच्या गोष्टीत राक्षसाचा जीव जसा त्याने विविध वस्तूंत दडवून ठेवलेला असतो, तसा प्रत्येकाचा स्व (आणि पर्यायाने अवधान) एकाच वेळी टीव्ही, ओटीटी, सोशल मीडिया, मोबाइल्स अशांच्या स्क्रीन्सवर तळमळत पडू लागला. हा काळ जितका जास्त कंटेंट देतोय, जितकी अभिव्यक्त होण्याची माध्यमं, आणि संधी प्राप्त करून देतोय, तितकीच जास्त संकुचितता, स्वकेंद्रितता, आत्ममग्नतादेखील आणतोय. याचा परिणाम असा की, प्रत्येक जण आपल्यापुरतं पाहू लागतोय. इतरांच्या मतांपेक्षा आपली मतं, भावना अतिजास्त महत्त्वाच्या वाटू लागल्यात. यातून जात-धर्म, समूह यांच्या अस्मिता, अभिमान अतिजास्त वाढीस लागून, आपल्या समाजाचं लहान लहान बेटांत रुपांतरण झालंय. हे बेट या बेटाचं पाहत नाही, ते बेट त्या बेटाचं ऐकत नाही. व्यक्ती आणि समाज म्हणूनही काहीही एकसंध राहिलं नाही. सत्तर-साठ किंवा अगदी ऐंशीच्या दशकाप्रमाणे कोणताही एक लेखक, एक गायक, एक नेता किंवा एक माणूस संपूर्ण मराठी म्हणून असलेल्या समाजाला आवडेल, दिशा दाखवेल, मार्गदर्शक वाटेल अशी स्थिती आज नाही. आपल्या भाषेमध्ये याआधीच्या सर्व जातीतल्या लेखकांनी काय काम करू ठेवलंय, हे संकुचिततेमुळे फारच कमी जणांपर्यंत झिरपत आल्याने – पर्यायाने परंपरा काय आहे हे माहीत नसल्याने – आपण जे करतोय ते नवं, क्रांतिकारी, बंडखोर आहे असं सगळ्यांनाच वाटू लागलंय. आणि ही बंडखोरी आधी झालेली आहे हे जाणवून द्यायला कोणतीही चिकित्सा व्यवस्थाच राहिलेली नसल्याने किंवा जी होती ती परदेशी संकल्पनेत मश्गूल राहिल्याने, तिने कान उपटून सांगायचा प्रश्नच उरलेला नाही.मी ज्या काळात लिहितो आहे, त्या काळाचं एक प्रॉडक्ट म्हणजे तुच्छतावाद. जे लोकप्रिय, ते वाईट. जे खूप वाचलं जातं, लोकांना आवडतं, ते वाईट. रसपूर्ण, खिळवून ठेवणारं म्हणजे वाईट आणि फ्लॅट टोनमधलं, बौद्धिक कसरती करून गांभीर्याचा आव आणणारं म्हणजे प्रायोगिक आणि त्यामुळे उच्च दर्जाचं असा सार्वत्रिक समज या काळात एवढा पसरवला गेला की, त्यामुळे लोकप्रिय साहित्याला अनुल्लेखाने मारून टाकण्यात आलं आणि गंभीर किंवा वेगळं करू पाहणाऱ्या लेखकांवर खपाऊ होण्याची जबाबदारी घेऊन पडली. या काळात साहित्यिक मासिकं, त्रैमासिकं बंद पडली. त्यामुळे सुचलेलं, ताजं नवं लेखन प्रकाशित होण्यासाठी बऱ्यापैकी सर्वदूर पोचेल असं दिवाळी अंक हे एकमेव छापील माध्यम उरलं. अर्थात, याला सोशल मीडिया, ब्लॉग्ज, वेबसाइट्स यांसारखे नवे पर्याय निर्माण झाले, नाही असं नाही, पण या सर्व पर्यायांची रचना, त्यांचं अल्गोरिदम पाहिलं (फेसबुक प्रतिमांना जास्त पुढे ढकलते) तर ते दीर्घ लेखन पोहोचवण्यासाठी तेवढं उपयुक्त नाही. सोशल मीडियामुळे थेट वाचकांपर्यंत पोचणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे शक्य होऊ लागलं, तरी त्यातही एक गोची अशी की, ‘पुस्तकांचे फोटो टाकून लाइक्स पटकावणारे’ आणि खरोखरीच वाचणारे किती, हे सांगणं मात्र अवघड झालं.२ आज माझ्या समोर असलेला काळ, आणि पर्यायाने समोरचं वास्तव एकसंध, एकरेषीय नाही. ते अनेकस्तरीय, गुंतागुंतीचं - केयॉटिक आहे. अनेक वास्तव एकाच वेळी विविध वास्तवांवर दाब टाकत आहेत. ही वास्तव एकमेकांत घुसून कमालीची विखंडित, तुटक आणि गुंतागुंतीची झालेली आहेत. हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच, कॅलिडियोस्कोपचा कोन बदलावा तसं झटक्यात आधीची वास्तवाची प्रतिमा बदलून जाते आहे, समोर दुसरी उभी राहते आहे. आधीची प्रतिमा नक्की कशी होती, आणि आत्ताची समोरची प्रतिमा कशी आहे याचा संबंध लावत असतानाच पुन्हा तिसरीच नवी प्रतिमा उभी राहते आहे. यातून ज्याला वास्तव असं म्हटलं जातं, असं काही उरतच नाहीये. एखाद्या व्हायरससारखं ते‘म्यूटेट’ होत आहे. आणि अशा या सतत बदलत्या वास्तवाला भिडणं ही मी लेखक म्हणून माझी जबाबदारी समजतो, त्याची मीमांसा करणं, शब्दांत पकडणं हे माझं काम आहे. माझ्या पिढीला वर उल्लेख केलेल्या सगळ्या गोष्टी आणि हे वास्तव टाळून पुढे जाता येणार नाही. आम्हाला त्यांना भिडावं लागणारच आहे. त्यामुळे आजचा लेखक म्हणून माझ्यापुढे या काळाचं संभाषित व्यक्त करताना अनेक प्रश्न आणि पेच उभे राहिले आहेत, राहत आहेत. त्यासाठी सांगण्याची नवी पद्धत, नवा आशय, नवी धाटणी शोधावी लागणार आहे किंवा सतत पुनर्शोध घ्यावा लागणार आहे. या काळात सेफ  गेम असा पर्यायच राहिलेला नाही, आणि तसा सेफ गेम खेळला तर, ती काळाशी प्रतारणाच ठरणार आहे.पण ही रिस्क घेताना या अमृताशी पैजा जिंकणाऱ्या भाषेत लेखकासाठी सपोर्ट सिस्टीम कोणती आहे, या प्रश्नाचं उत्तर नैराश्यदायी आहे. वाचकांपासून ते प्रकाशक-विक्रेत्यांपर्यंत सगळे जण सत्तरच्या दशकात किंवा ऐतिहासिक काळात गोठलेले ! मोठं काम करण्यासाठी फेलोशिप्स इ. आधार मिळावा, तर, त्याही दोन बोटांवर मोजता येतील अशा ! महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य संमेलनं, साहित्य संघ वगैरे संस्थांकडे पाहावं, तिथे महाआनंद ! आणि समकालीन पिढीतल्या सर्वच क्षेत्रांतील कलाकारांकडून, किमान लेखकांकडून देवाणघेवाण, चर्चा होणं, जेणेकरून आपल्यासारखे आणखीही आहेत, असा मानसिक आधार मिळावा – तर, तिथेही एक मोठ्ठ मौन!  आणि सर्वांत खतरनाक बाब म्हणजे प्रत्येक वाक्य लिहिताना मनात दबा धरून असलेली भीती, की, याने कोणी दुखावलं जाणार तर नाही ना!, आणि तसं झालंच तर, आपल्यापाठी कोणीही उभं राहणार नाही, ही !  नाशिक येथे आणि त्यानंतरही पुढे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्याला शुभेच्छा !

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन