Join us  

काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 9:09 PM

Ujjwal Nikam vs Vijay Wadettiwar: शहीद हेमंत करकरे मृत्यूप्रकरणात वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केले होते.

Ujjwal Nikam vs Vijay Wadettiwar, Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आयपीएस अधिकारी हेमंत करकरे ( Hemant Karkare ) यांच्याबाबत एक विधान केले होते. करकरे यांना दहशतवा‌द्यांनी गोळ्या घातल्या नाहीत, तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केले, असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. हा दावा निराधार व तथ्यहीन असून यामार्फत मतदारांची दिशाभूल करण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्युमागे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची व पक्षाची बदनामी केली आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन त्यांच्यावर भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र भारतीय जनता पार्टीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. या तक्रारीसोबतच या विषयीची सर्व कागदपत्रेही जोडण्यात आली असल्याचे भाजपाने माहिती दिली.

26/11 मुंबई अतिरेकी हल्ला केस (अजमल कसाब) याची प्रथम सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली. सर्व पुरावे, साक्षी तपासून न्यायालयाने आरोपी अजमल कसाब यास फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर आरोपी अजमल कसाब याला कन्फर्मेशन केस उच्च न्यायालयात दाखल केली. या अपीलामध्ये सुनावणी होऊन अजमल कसाब याची फाशी कायम केली व सर्वोच्च न्यायालयानेही अजमल कसाब याची फाशी कायम केली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जे विधान केले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे व न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असा आरोप भाजपाने दिलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

भाजपाच्या निवडणूक विधी विभागाचे सहसंयोजक ॲ‍ड. शहाजीराव शिंदे, ॲ‍ड. मनोज जयस्वाल यांनी राज्य  मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वडेट्टीवार यांच्या आरोपांमध्ये पुराव्यांचा अभाव तर आहेच पण राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेही दिसते. अशा कृती निष्पक्ष प्रचाराच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग करतात. अशी विधाने केवळ आपल्या सशस्त्र दलांच्या व पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्ह उपसथित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे व राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्यांचे राजकारण करतात. या व्यतिरिक्त, लोकशाही प्रक्रियेची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी, निवडणूक चर्चा नागरी आणि तथ्यात्मक राहील याची खात्री करण्यासाठी योग्य कारवाई केली पाहिजे, असा दावा करून कारवाईसाठी या तक्रारीच्या प्रती निवडणूक निर्णय अधिकारी, 29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, पोलीस महासंचालक,पोलीस आयुक्त, मुंबई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मरीन लाईन्स, पोलिस ठाणे यांनाही दिल्या आहेत.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४विजय वडेट्टीवारउज्ज्वल निकममुंबई उत्तर मध्य