पापा णा होते, हम कहीं णा होते

By Admin | Updated: December 31, 2016 13:15 IST2016-12-31T12:38:41+5:302016-12-31T13:15:24+5:30

‘एक छोटे, देहाती आदमी के बहोत लंबे स्ट्रगल की ये एक छोटी सी कहानी है.’ गीता सांगत होती,‘.और उस आदमी का नाम है महावीरसिंग. हमारे पापा. उन के जैसा कोच णा होता, तो ये सबकुछ णा होता..’

We were somewhere in the world | पापा णा होते, हम कहीं णा होते

पापा णा होते, हम कहीं णा होते

- सचिन जवळकोटे

औरत का धर्म की होया करे?.. 
सूरज उगने से पहले उठ जाणा, पूजापाठ करणा और साफसफाई कर के चुल्हे चौके में लग जाणा.. यही करणेके लिए तो बणी है औरत; कसरत, कुश्तीके लिए ना...
कसरत, कुश्ती करना ये मर्दोंवाली चीज है, इस में ताक्कत और कलेजा लागे.. लंगोट पहणणेसे कुछ्छ नही होता, मर्द बणणेके लिए मर्द बणके पैदा होणा पडे... 
और कौन से शास्त्रों में लिख्खा है भाई, की औरत भी दंगल लड सके? अरे लिख्खाई होता, तो द्रौपदी खुदणा भिड जाती दुर्याेधण से?...
- दिल्लीहून हरियाणाच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत बसलो, तेव्हा कुठेतरी पाहिलं-ऐकलेलं हे सगळं डोक्यात घुमत होतं. महावीरसिंग फोगट नावाच्या देहाती हिमतीच्या गृहस्थांना भेटायला निघालो होतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या गीता फोगट आणि बबिताकुमारी या त्याच्या पोरी. रितू तिसरी. प्रियंका आणि विनेश या भावाच्या दोघी. हातभर घुंगट घेऊन घुसमटत्या बाईचं नख दिसणं जिथे मुश्कील अशा प्रदेशात अंगाला घट्ट बसणाऱ्या तोकड्या शॉटर््स घालून पीळदार देहाच्या मुसमुसत्या पुरुष मल्लांना कुस्तीच्या मॅटवर लोळवणाऱ्या कापल्या केसांच्या या तगड्या पोरी.
लंगोट पहणणसे कुछ्छ नही होता, मर्द बणणेके लिए मर्द बणके पैदा होणा पडे... 
- असं बजावणाऱ्या जुनाट, उर्मट ताऊंना उलट उत्तर न करता आपल्या कर्तृत्वाने थेट आसमान दाखवणाऱ्या! औरत का धर्म की होया करे?.. या टिपिकल भारतीय प्रश्नाचं वेगळं खणखणीत उत्तर थेट जगाच्या वेशीवरच नेऊन अभिमानाने टांगणाऱ्या!!
लाल मातीच्या फडात अंग घुसळावं मर्दानं अन् काट्याकुट्यानं भरलेल्या चुलीसमोर भाकऱ्या थापाव्यात बाईनं, हे कोल्हापूर-साताऱ्याकडं पाहिलेलं. तिकडं दूरच्या हरियाणातल्या या मल्ल पोरींची कहाणी अजबच. 
त्याहून वरताण त्यांचा बाप. बायकांचं प्रदर्शन मांडतो म्हणून संतापून अख्ख्या कुटुंबाला वाळीत टाकायला निघालेल्या गावकऱ्यांच्या विरोधाला भीक न घालता पोटच्या पोरींना कुस्तीच्या आखाड्यात घुमायला लावणारा वस्ताद - महावीर सिंग. आणि दाराशी बांधलेल्या तीस-पस्तीस म्हशींचं दूध काढायच्या गडबडीत लेकींनी लुटून आणलेली सुवर्णपदकं बघायलासुद्धा वेळ नसलेली या वस्तादाची खमकी बायको- दया सिंग.
उत्तर भारताच्या जुन्या, कडवट खेड्यांचं लष्टक फार किचकट. अशा ठिकाणी लोकलज्जा गुंडाळून ठेवून, कठोर संकेत भिरकावून देऊन आपल्याच मस्तीत जगणारं हे जोडपं. नाव झाल्यावर कुस्तीतल्या पुढल्या सरावासाठी मुली लखनौ, दिल्लीकडं सरकल्या. आईबाप गावातच पाय रोवून पक्के उभे. शेती आहे, म्हशी आहेत; त्यांचं कोण करणार? आणि ज्यांनी आधी दगड मारले, त्याच गावकऱ्यांच्या पंचक्रोशीतल्या पोरीबाळी कुस्तीचे धडे गिरवायला येतात, त्यांना कोण पाहणार? म्हणून मुक्काम बलाली. दिल्लीपासून सुमारे शंभर-सव्वाशे किलोमीटर अंतरावर भिवानी जिल्ह्यातलं चिटुकलं गाव. म्हटलं वस्तादांना भेटू. त्यांचं गावही पाहू. म्हणून निघालो. नवी दिल्ली स्टेशनवर उतरल्यानंतर हरियाणाचा बस स्टॅण्ड गाठायचा. मग ‘निडानी’ला जाणारी बस हुडकायची. सगळा गचाळ कारभार. धूळ. कलकलाट. ‘रोहतक’ पार केल्यानंतर ‘निडानी’ गाव. चारेक तासांवर बलाली. छोटं गाव. रांगडा हरयाणवी चेहरा. जुने दगडांनी घडवलेले रस्ते. दिल्लीतून हरयाणात पाझरत आलेल्या झगमगत्या श्रीमंतीचा गावाला ना स्पर्श. ना पत्ता.
औरत का धर्म की होया करे?.. 
- हा प्रश्न कधीही, कुठूनही, कुणीही दरडावून विचारील अशा पुरुषी तामझामाचं गाव. आजूबाजूला रवंथ करत उभ्या म्हशींचे गोठे ओलांडून गेलं की महावीर ताऊंचं घर. तिथे गेलो, तर पत्त्यांचे डाव टाकत मंडळी निवांत बसलेली. सोबतीला धुराची वलयं नाचवणारा पितळी हुक्का. याच्याकडून त्याच्या हाती फिरत झुरके चालू. एका ऐसपैस लाकडी ‘चारपाई’वर तितक्याच ऐसपैसपणे महावीरसिंग बसलेले. घाम गाळून कमावलेलं जुनं भक्कम शरीर. नजरेत बेफिकिरी काठोकाठ आणि आवाजात भलती भारदस्त जरब.
वातावरण सैल. हवेत म्हशींच्या गोठ्यातल्या हिरव्या चाऱ्याची ओल, शेजारच्याच बाजूला असलेल्या कुस्तीच्या हॉलमधून येणारी गळत्या घामाची ओली खारट चुरचुर आणि सरावासाठी मैटवर घुमणाऱ्या पोरापोरींचे हुंकार. थांबा की निवांत, कुठं पळून चाल्लंय तुम्चं काम... असा एकूण माहोल. महावीरसिंगांच्या भोवतीचे सोबती जुने. त्यांच्याच वयाचे. गावकरी.
- यातल्या कुणीकुणी महावीरसिंगांना ‘तेव्हा’ शिव्या घातल्या असतील? कुणीकुणी त्यांची औकात काढली असेल? पोटच्या तरण्या पोरींना उघड्या हातापायांनी मातीच्या आखाड्यात मुलग्यांशी झुंजवतो म्हणून कुणीकुणी त्यांचा पाणउतारा केला असेल? डोक्यात गणितं. आणि तोच जुना हरयाणवी प्रश्न : औरत का धर्म की होया करे?.. 
महावीरसिंग या भिवलीच्या हेकेखोर, तर्कट मल्लाला भर रस्त्यात अडवून, अवेळी घरात घुसून, बाजारात गाठून तो दरडावून विचारला गेला त्याला आता कितीतरी वर्षं उलटून गेली. ‘दंगल’. म्हणजे आपल्या भाषेत कुस्तीचा ‘आखाडा’ किंवा ‘मैदान’. एखादा पहिलवान जसा महाराष्ट्रात ‘मैदान’ गाजवतो, तसं उत्तर भारतात कुस्तीत ‘दंगल’ घडते. महावीरसिंग फोगट स्वत: ‘दंगल’ गाजवणारे. ‘मेरे दादाजी पहिलवान. पिताजी पहिलवान... और मैं भी पहिलवान. मुझे भैसों का बहुत शौक’ - हुक्क्याचा कश घेत कहाणी सुरू झाली. महावीरसिंग नामचिन पहिलवान. जवानीत देशभरात फिरले. दंगली मारायच्या आणि गावोगाव जाऊन उत्तम जातीच्या म्हशी पारखून विकत घ्यायच्या हे दोनच नाद. शिक्षण नन्नाच. गडी अशिक्षित. बाहेरच्या जगाशी फारसा राबता कधी आलाच नाही. दिनक्रम ठरलेला. सकाळ-संध्याकाळी तालमीत घुमायचं.. अन् दिवसभर शेतात राबायचं. शिवाय म्हशींचं चारापाणी. धारा काढणं. दया. नवऱ्यासारखीच तगडी. बेफिकीर. कष्टाला मागे न हटणारी. एवढ्या म्हशींच्या आचळाला सकाळ-संध्याकाळ तिचेच हात. एकापाठोपाठ एक अशा चार पोरी पोटाला आल्या. गीता, बबिता, संगीता आणि रितू. हा भलता शाप. इतक्या पोरी? सततचे टोमणे खा-खाऊन बऱ्याच वर्षांनी शेवटची कूस उजली. तो मुलगा. दुष्यंत. महावीरसिंगांचा लहान भाऊ राजपाल सिंग. एका जीवघेण्या अपघातात काही वर्षांपूर्वी तो वारला. त्याच्या दोन मुली विनेश अन् प्रियंका याही मग चाचा-चाचीच्या आश्रयाला आल्या. चौघी होत्या. सहा जणी झाल्या. घरी दूध-दुभतं बख्खळ. लोण्या-तुपातच वाढल्या पोरी. शेतात घर. घरात गोठा आणि घरामागे बापाने कुस्तीच्या तालमीसाठी जमिनीत खोदून केलेल्या तात्पुरत्या आखाड्याची खोली. पोरींचे हातपाय मातीत मळू लागले.
‘जब गीता छोटी थी तब लड़कों जैसे घुमती थी. घर के पिछडेवाले छोटे कमरे में मेरे साथ प्रॅक्टिस करती थी’ - महावीरसिंग सांगतात. पहिल्यांदा त्यांचं डोकं सटकवलं ते या थोरल्या गीताने. ‘उसकी लगन देखकर मैंने तय किया कि मेरी बच्चीओंको भी मैं कुश्ती सिखाऊंगा!’ - ते सांगतात.
ही सुरुवात. 
साधं स्वप्न होतं, त्यातून पुढे एक युद्धच उभं राहिलं. या मल्ल पहिलवानाला काही समाजसुधारणा नव्हती घडवायची. ना कसला मुद्दा सिद्ध करायचा होता. आपल्या पोरी मातीत घुमतात, तर त्यांना शिकवायला काय हरकत आहे? - एवढं साधं होतं प्रकरण. एका पहाटे त्यांनी दिली पहिली धडक.
गीताला ती सुरुवात स्वच्छ आठवते. ‘एक दिन बडी सुबह पापाने हमे जगाया और पुछा, कितनी दूरीतक दौड सकते हो? चलो, दौड लगाते है..’ दिवसही धड फुटला नव्हता. दहा वर्षांची गीता आणि आठ वर्षांची बबिता. दोघी पोरी डोळे चोळत, आपापसात खुसखुसत बापाच्या मागे शेतात निघाल्या... आणि इशारा झाल्यावर जीव खाऊन पळत सुटल्या.
...आपल्या पळत्या पावलांखालच्या वाटेला अंत नसणार आहे, हे कळण्याचं वय नव्हतं त्यांचं. ‘बहोत मजा आया... फिर रोज हम दौड लगाने लगे’ - गीता सांगते. महावीर ताऊंची नजर पक्की होती. त्यांनी पोरींचं पाणी जोखलं आणि आठव्या दिवशी घराशेजारच्या शेतात नवा आखाडा खणायला घेतला. माती उपसली. वर एक पत्र्याचं छप्पर टाकलं. दंगल सुरू झाली.
गीता आणि बबिता रोज नेमाने आखाड्यात घुमू लागल्या. नवनवे डाव शिकू लागल्या. आजा-पणजाने बापाला शिकवलेले कुस्तीतले पेच अंगात मुरवू लागल्या. कुस्ती करायची म्हणजे अडचणी दोन. बायकांचे कपडे आणि केस. बापाने पोरींसाठी गुडघ्यापर्यंत येतील आणि अंगालगत बसतील अशा घट्ट चड्ड्या शिवून घेतल्या आणि दोघींचे केस पार मानेच्या वर कापून घेतले. अशा अवतारात पोरी पळायला जात. चारचौघांदेखत दोरीच्या उड्या मारत. गावात कुजबुज होतीच. बघता बघता रान पेटलं. महावीरसिंगांना विरोध वाढू लागला. कधी समोरासमोर, कधी आडून प्रश्न विचारले जाऊ लागले.
‘शरम नही आत्ती तुझे? लडकीसे दंगल लडवायेगा? उन्हे लंगोट पहनायेगा? बेशरम है क्या?’
- पण ते थंड राहिले. भलत्या जागी रक्त तापवून घेतलं, तर आपलंच तोंड पोळेल, एवढं व्यवहारज्ञान होतं. त्यातून दिल्लीच्या आखाड्यातल्या त्यांच्या गुरूंनी मातीत घुमणाऱ्या पोरींमधली कसक पाहिली होती. या पोरी आपल्या शिष्याचं नाव रोशन करणार, हे कळून त्यांनी महावीरसिंगांना सल्ला दिला होता : चूप बैठ तू और जो करना है वो करता रहे. बच्चीयोंकी तालीम नही रुकनी चाहिए!
लोक टीका करतील. कानात बोळे घाल. गुरुआज्ञा. ती कशी मोडणार? गीता आणि बबिताच्या नादाने लहानग्या बहिणीदेखील मातीत उतरू लागल्या. सगळ्यांचीच तालीम सुरू झाली. टीका वाढत होती, राग धुमसत होता, विरोध टोकाला चालला होता, तशी महावीरजींच्या आखाड्याची कीर्तीही पसरत होती. आजूबाजूच्या गावातले चार मुलगे आले. त्यांनाही कुस्तीचे डाव शिकायचे होते. वस्तादांच्या देखरेखीखाली त्यांची तालीम सुरू झाली. मग आपल्या पोरींचा दमसास, ताकद जोखण्यासाठी महावीरसिंगांनी या पोरांबरोबर त्यांच्या कुस्त्या लावायला सुरुवात केली.
- ठिणगी धुमसत होतीच, आता सभोवार विरोधाची आग पेटली. पोरापोरींची कुस्ती? त्यात पोरींची आई दया गावची सरपंच. तिच्यावर रोज नवी किटाळं येऊ लागली. बायका कानाशी लागू लागल्या...
कैसे होण्णा है, तेरी बच्चीयोंका? उणकी बॉडी अब लडकों जैसी होणी है... त्यांची नाकं फुटतील, कान तुटतील... असल्या मुलींशी शादी कोण मूर्ख करेल? आणि शादी झाली, तर कुस्ती खेळणाऱ्या बाईला बच्चे तरी होतील का?
- दया भौजाई सैरभैर होत कधीकधी. ‘चिंता होती थी मणे, और गुस्साभी आता था, की क्यूं मेरी बच्चीया कुश्ती नही कर सकती?’ - त्या सांगतात.
ताण वाढत गेला, तशी घरात वादावादी होऊ लागली. आवाज चढू लागले. राग आला, वैताग झाला. पण ना महावीरसिंग हटले, ना त्यांची बायको.
‘मेरा बस इतणाही कहणा था, की लडकी अगर प्रधानमंत्री बण सकती है, डॉक्टर बण सकती है, तो कुश्ती क्यूं नही लड सकती?’
- एवढ्या एका साध्या पण ठाम तर्कावर महावीरसिंगांनी विरोध, उपेक्षा आणि सार्वजनिक अपमानाचे मोठेमोठे हल्ले परतवून लावले. त्यांचा एकच हट्ट होता : मेरी बच्चीया अच्छा करे, बस्स!!
- त्यासाठी ते पोरींच्या हात धुऊन मागे लागले.
‘रोज सुबह चार बजे उठाते थे पापा. मैं तब बच्ची थी. लेकिन एक मिनिट भी देर होती, पहाड टूट पडता था. बहोत ‘मरम्मत’ होती थी. सुबह चार से लेकर सात बजे तक ट्रेनिंग चलती थी. स्कूल से लौटने के बाद शाम को फिर वही सिलसिला.. शुरू में तो बहोत हार्ड लगता था, पापाजी पर बडा घुस्सा भी आता था’ - गीता सांगते.
ती पापाजींची लाडली शागिर्द. म्हणून तिच्यावर जबरदस्ती जास्त. आखाड्यातल्या तरण्या पोरांबरोबर या मुलींच्या कुस्त्या लावल्या जात. मेहनतीत मुलींना शून्य सूट. ‘पापा सुबह सुबह खेत में हम से दौड लगाते थे, लडकों के साथ’ - गीता सांगते, ‘दौड में अगर हम लडकों से पिछे रह जाते या जोरबैठक में उन से कमजोर पडते, तो इतना घुस्सा होते थे, बहोत मार पडती थी! कहते थे, तुम क्या लडकों से खाते कम हो, जो उन से कम मेहनत करोगे? उन से तो जादाही कुछ न कुछ खाते हो.. पापा जैसा कोच हमने आज तक नहीं देखा. हम अगर किसी दुसरे आखाडे या ट्रेनिंग सेंटर में होते, इतनी मेहनत कभी ना करते, घर लौट आ जाते.. पापाजी की तो खाते-पिते हर वक्त ट्रेनिंग..’
सकाळी कुस्ती, संध्याकाळी कुस्ती, रात्री दमूनभागून घरी आल्यावरही कुस्तीच्याच गप्पा आणि दंडुक्याची दहशत. पोरी थकून जात. गीताने तर वैतागून अर्ध्यावर सोडूनच द्यायचं ठरवलं होतं हे प्रकरण. पण तिची मानगूट सुटली नाही. तिच्या मागून येऊन बबिताची तयारी उत्तम होऊ लागली, तसा गीताला चेव चढला.
मुलींना तयार करायचंच, या विचारानं महावीरसिंग यांना अक्षरश: घेरलं होतं. ते स्वत: एके काळी राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले पहिलवान होते. अनेक कारणं होती, त्यांना आणखी पुढे झेप घेता आली नाही. आपल्या मुलींना ती अडचण येऊ नये म्हणून मग त्यांनी स्वत:च पुढाकार घेतला. जिथे साधं प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं, शिक्षणाची पुरेशी सोय नव्हती, त्या खेडेगावात शास्त्रशुद्ध ‘आखाडा’ वगैरे कुठला असायला? 
पोरींनी बापाच्या कष्टाचं आणि हट्टाचं सोनं करायचं अखेर मनावरच घेतलं. गीता आणि बबिता यांच्याबरोबर त्यांची धाकटी बहीण रितू, चुलत बहिणी प्रियंका, विनेश याही दंगली मारू लागल्या. पंचक्रोशीत या फोगट भगिनींची कीर्ती पसरू लागली. २००० च्या आॅलिम्पिकमध्ये करनम मल्लेश्वरीने मेडल पटकावलं.
- ती घटना दूर हरियाणातल्या बलाली गावात पोचली आणि महावीरसिंग यांच्या डोक्यात नवा किडा घुसला. आजवरच्या अथक, वेड्या, ओबडधोबड प्रयत्नांना पहिल्यांदाच ‘स्वप्ना’चा स्पर्श झाला. ‘करनाम मल्लेश्वरीने आॅलिम्पिक मेडल जितने के बाद पापा को लगने लगा, मल्लेश्वरी आॅलिम्पिक मेडल ला सकती है, तो मेरी बेटियॉँ क्यों नहीं?’ - गीता सांगते.
तेव्हापासून जास्तीचा घाम गळू लागला. जास्तीची बोलणी बसू लागली. जास्तीचे फटके पडू लागले. ‘पापाजी ने हमें और तंग करना शुरू किया’ - बबिता सांगते, ‘सोते, जागते दिमाग में बस एकही खयाल: ट्रेनिंग बराबर चल रही है या नहीं?’ रितू आणि विनेश दोघी धाकट्या. विनेश सांगते, ‘लडका, लडकी अलग होते है, ये वो मानते ही नहीं.. जितनी मेहनत लडके करते है, उतनीही मेहनत वो हमसे करवाते थे..’ पण याच अथक मेहनतीनं या देहाती मुलींना फौलादी बनवलं. आपल्यापेक्षा भरभक्कम, जास्त ताकदीच्या मुलांबरोबर कुस्ती खेळल्यानं परिसरातच काय, अख्ख्या राज्यात त्यांच्या तोडीची महिला कुस्तीपटू नव्हती. मुलींना जागतिक दर्जाच्या कुस्तीपटू करण्याचं स्वप्न तर महावीरसिंग यांनी पाहिलं, पण त्यासाठी लागणारं आर्थिक बळ कुठे त्यांच्याकडे होतं? पण या माणसानं आपली जिद्द सोडली नाही. मुलींना कुस्तीचे नुसतेच डाव शिकवून उपयोगाचं नव्हतं, त्यासाठीचा खुराक, व्यायाम, शारीरिक तयारीही तितकीच महत्त्वाची होती. - त्यासाठी उधार-उसनवाऱ्या केल्या, पण मुलींना काही कमी पडू दिलं नाही. आणि मुलींनीही या भरकटल्या, वेड्या, मारकुट्या बापाच्या अरभाट कष्टांचं चीज केलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खणखणीत यश कमावून गीता, बबिता आता ‘देशाचा सन्मान’ बनल्या आहेत. स्पोटर््स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया- ‘साई’च्या कॅम्पमध्ये त्यांची सराव शिबिरं होतात. परदेशी प्रशिक्षक मिळतात. प्रशिक्षण आणि सराव यांसाठी युरोप-अमेरिकेचा प्रवासही आता दुर्मीळ नाही राहिलेला. बलालीच्या घरचा ‘आखाडाही’ आता पूर्वीइतका धूळभरला नाही. घरामागे पत्रा चढवलेल्या छपराची मोठीच्या मोठी बरैक पापाजींनी उभी केली आहे. तिथे कुस्तीसाठीची (महागडी) डबल साईज मॅट आहे. बघावे तिकडून भले दांडगे दोरखंड लोंबताना दिसतात. शिवाय वेट मशीन्स आहेत. 
- पोरी एवढ्या ‘इंटरनॅशनल’ झाल्या, तरी बापाच्या हातातल्या दंडुक्याचा धाक तेवढाच जबरी!
कॉमनवेल्थ गेम्ससाठी बबिता आणि विनेश ग्लासगोला गेल्या होत्या. लिगामेण्टच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर राहण्याची वेळ आलेली त्यांची गीतादीदी घरी बलालीला होती. या दोघींनी घरी फोन केला, तर पहिली गाठ पापाजींशी पडली! बबिता सांगते, ‘और कुछ णा बोले पापाजी. बस्स इतणा कहा, की गोल्ड लेके आईयो. खाली हाथ आ गयी, तो बहोत पीटाई होणी है तुम लोगोंकी...’ हा असला बाप. आणि त्याच्या पोरी त्याच्याहून जास्त हट्टी. ‘मैणे कहा, गोल्डही लायेंगे पापाजी.. आप चिंता णा करो’ - अशी खात्री देणाऱ्या विनेशने दुसऱ्याच दिवशी ४८ किलो वजनी गटात ‘गोल्ड’ पटकावलं... आणि त्यानंतर दोन दिवसांनी ५५ किलो वजनी गटात बबितानेही ‘गोल्ड’ सोडलं नाही. ‘चड्डी पहणणेवाली बेशरम लडकिया बिरादरी का नाक कटवाएंगी’ या संतापाने जिथे येऊन येऊन टोमणे मारण्याची, वाद घालण्याची, भांडणं उकरण्याची एकही संधी गावकऱ्यांनी सोडली नाही, ते महावीरसिंगांचं अख्खं घर ‘बस मैदाण मारके आती है’वाल्या कौतुकाने नुसतं भरून वाहतंय आता. जिकडेतिकडे पोरींच्या कर्तृत्वाच्या खुणा टांगलेल्या. मांडलेल्या. पदकं, फोटो, बक्षिसं..
- आता लेकींच्या यशाचा आनंद लुटण्याचे, अभिमानाने मिरवण्याचे दिवस आहेत. जुने टोमणे आणि उखाळ्यापाखाळ्या संपल्या. आता पंचक्रोशीतल्या बायकांना वाटतं, आपल्याही मुलीने असं काहीतरी शिकावं. गीता-बबितासारखा विमानाने प्रवास करावा. पदकं मिळवावीत. दयाबाईंची सासू आधी खारच खाऊन होती सुनेवर. पोटाला चार मुलीच पाठोपाठ? बबिताला हे माहिती आहे. ती हसत सांगते, ‘अब तो हमारी दादीजी भी कहती है, भगवान ऐसी बेटीया सौ दे दे, तो भी कम है.’ फोगट मायलेकींच्या हातचा खास हरयाणवी पाहुणचार घेऊन निघालो. मी दिल्लीच्या दिशेने..
आणि महावीरसिंग त्यांच्या आखाड्याच्या!
डोळ्यांत तीच जरब... आणि हातात दंडुका!!
म्हटलं, कुठल्यातरी भावी गीता-बबिताला आज पडणार चांगला मार!

पूर्वप्रसिद्धी दीपोत्सव 2015

(लेखक लोकमतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

sachin.javalkote@lokmat.com

Web Title: We were somewhere in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.