सेवाव्रती

By Admin | Updated: August 23, 2014 13:49 IST2014-08-23T13:49:19+5:302014-08-23T13:49:19+5:30

५0 वर्षे हा काही फार मोठा कालखंड नाही. धार्मिक संघटन करण्याच्या उद्देशानेच स्थापन झालेल्या संघटनेची ५0 वर्षे मात्र निश्‍चितच विचार करण्यासारखी आहेत. विविध सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून सतत कार्यरत असलेल्या, आधुनिक काळातही धर्मविचारावर ठाम असलेल्या विश्‍व हिंदू परिषदेच्या अर्धशतकी वाटचालीचा धावता आढावा.

Volunteer | सेवाव्रती

सेवाव्रती

 डॉ. शरद कुंटे

एखाद्या संस्थेच्या वाटचालीची ५0 वर्षे पूर्ण होणे हा अभिमानाचा विषय असतोच. विश्‍व हिंदू परिषदेला १७ ऑगस्ट २0१४ रोजी ५0 वर्षे पूर्ण झाली. या संस्थेचे समाजाला योगदान काय, हे समाजातील  जाणत्या लोकांनीही अभ्यासण्याची गरज आहे. या संघटनेकडे राजकारणी लोक कसे पाहतात, संत महात्मे, धर्माचार्य कसे पाहतात, हिंदू समाजाचे विविध घटक म्हणजे जातिसंस्थांचे प्रतिनिधी कसे पाहतात, समाजाच्या तळागाळातले वर्ग कसे पाहतात, वनवासी-गिरिजनांचा काय अनुभव आहे, मध्यमवर्गीय शहरी समाज, त्यातही महिलांचा दृष्टिकोन काय आहे, हिंदू समाजाबाहेरील समाजाची प्रतिक्रिया काय आहे, भारताबाहेरील हिंदू समाज व त्या देशातले अन्य विचारवंत कसा विचार करतात, अशा विविध अंगांनी या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. 
राजकारण्यांची वाकडी वाट 
 एखादी संस्था चांगले काम करते की वाईट यापेक्षा त्या कामाचा त्यांच्या मतपेढीला फायदा होतो का, यावरच बहुसंख्य राजकारण्यांचे मत अवलंबून असते. विहिंप हिंदू जागरण करते, त्यामुळे  अहिंदू मतांवर अवलंबून असलेल्या नेत्यांनी त्या कामावर जाहीर नाराजी दाखवावी हे सहज समजण्याजोगे आहे. पण बहुसंख्य असे आहेत, की तुमचे काम चांगले आहे, त्याला आम्ही होईल तेवढी मदतही करू, फक्त आमच्या राजकीय हिताच्या आड येऊ नका असे खासगीत सांगतात. एक उदाहरण सांगण्याजोगे आहे.  केंद्र सरकारने जवळजवळ पावणेतीन वर्षे विहिंपवर बंदी घातली होती. परिषदेचे एक ज्येष्ठ पदाधिकारी थेट तत्कालीन पंतप्रधानांना जाऊन भेटले व त्यांना विचारले, की तुम्ही आमचे सेवा प्रकल्पही बंद 
करणार आहात का? त्यावर त्यांनी सांगितले, की तुमची सर्व सेवाकार्य निर्वेधपणे चालू राहू द्या, कारण या प्रकारची कामे तुमचे कार्यकर्तेच करू शकतात. खरोखरच या सेवाप्रकल्पांना सरकारने काही त्रास दिला नाही. ज्या प्रकल्पांना सरकारी अनुदान होते, ते अनुदानही चालू राहिले. 
धार्मिक संस्थांना आधार 
धार्मिक संस्थांचे संघटन करणे कठीण असते. प्रत्येक मठ, मंदिर, अथवा आखाड्याचा काही एक भक्तगण असतो. तोच त्यांचा आर्थिक आधार पण असतो. दुसर्‍या संस्थेबरोबर काम करताना आपला आधार सुटेल की काय अशी त्यांना भीती असते. विहिंपने या सर्व संस्थांना विश्‍वासात घेऊन त्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्याचा दिलासा दिला. धर्मसंसद, संतसमिती, मार्गदर्शक मंडळ अशा विविध आयामांच्या स्वरूपात विहिंपने संतांनाच समाजासमोर ठेवले. त्यामुळे विहिंपची विश्‍वासार्हता वाढली, जातिसंस्थांना एका व्यासपीठावर आणणे संतांच्या मदतीनेच शक्य झाले. धार्मिक संस्थांचे अनेक प्रश्न संघटित बलामुळे सोडवणे शक्य झाले.  
धार्मिक संस्थांच्या विहिंपबरोबरच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण तामिळनाडूत पाहावयास मिळते. तामिळनाडूमध्ये सर्व मंदिरांवर सरकारचा अधिकार आहे. इतर सर्व क्षेत्रांत दिसते तशी सरकारी अनास्था इथेही पाहायला मिळते. मंदिरांना पुजारी नेमले जात नसत. पुजार्‍यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असे, मंदिरे अस्वच्छ असत, त्यांची डागडुजी-देखभाल होत नसे, धार्मिक कार्यक्रम होत नसत. त्यामुळे अनेक मंदिरांत समाजकंटकांचा अड्डा बसलेला असे. स्वाभाविकच लोकांचे जाणे-येणे कमीच झाले होते. विहिंपने या मंदिर पुजार्‍यांची  राज्यव्यापी संघटना उभी केली. संघटितपणे मागण्या मांडून त्यांचे मानधन वाढवून घेतले. या पुजार्‍यांच्या धार्मिक शिक्षणाची व्यवस्था लावली. विहिंपने इथे एक क्रांतिकारक बदल घडवला. केवळ ब्राह्मण पुजार्‍यांपुरते वेदशिक्षण र्मयादित न ठेवता हिंदू समाजातील सर्व जाती- जमातीतील पुजार्‍यांना वेदशिक्षण देण्याची व्यवस्था केली. या परिश्रमास योग्य फळे मिळू लागली. मंदिरे समाजाची शक्तिकेंद्रे बनली. 
सामाजिक समरसता 
जाती नाहीशा होतील तेव्हा होतील, विहिंपने जातीजातीतील वैमनस्य संपवणे व परस्पर समन्वय वाढवण्यावर भर दिला. ज्ञातीसंस्था संपर्क विभाग, समन्वय मंच, सदभाव बैठका अशा उपक्रमांद्वारे सर्व जाती-जमातींचे प्रतिनिधी एकत्र येऊ लागले. विहिंपच्या प्रयत्नातून एका जातीच्या धार्मिक, सामाजिक उत्सावाला इतर जातींच्या पंचांनाही सन्मानाने बोलावून त्यांचा सत्कार करण्याची पद्धत सुरूझाली. विहिंपने अस्पृश्यतेला धर्माचा आधार नाही हे आपल्या प्रत्येक अधिवेशनात संत महात्म्यांकरवी वदवून घेतले आहे. सन १९६९ मध्ये उडुपी येथे झालेल्या धर्म संमेलनात ‘‘हिंदव: सोदर: सर्वे न हिंदू पतितो भवेत’’ असा ऐतिहासिक ठरावही संमत करविला. शंकराचार्य किंवा अन्य संतांच्या प्रवासात त्यांनी दलित वस्त्यांना भेट द्यावी व प्रवचनानंतर सर्व जातींच्या नागरिकांनी त्यांच्याकडून प्रसाद घेण्याची प्रथा सुरूझाली. विहिंपच्या विविध सेवाप्रकल्पांत सर्व जातींच्या लोकांना समान सेवा मिळते हा अनुभव सार्वत्रिक आहे. 
स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली तरी अजून अनेक गावांत दलितांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. आवश्यक तिथे संघर्ष, कायद्याचा वापरही करावा लागतो. पण समन्वय मंच किंवा सद्भाव बैठकांच्या माध्यमातून हे प्रश्न अधिक सहजपणे सुटतात असा विहिंपचा अनुभव आहे. केरळमध्ये आलेला एक अनुभव फार रोचक तसाच मार्गदर्शक आहे. गुरु वायूर मंदिरात दलितांना प्रवेश मिळत नाही. इतरांबरोबर प्रसाद मिळत नाही. म्हणून आम्ही तिरुवनंतपुरम ते गुरुवायूर असा एक मोर्चा काढणार आहोत अशी घोषणा सी.पी.एम.च्या नेत्यांनी केली. अशा कार्यक्रमाने जातीय संघर्षाला निमंत्रण मिळणार होते. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी यावर एक उपाययोजना केली. केरळमधील सर्व मंदिर संस्थान विश्‍वस्तांची त्यांनी बैठक घेतली व त्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेतले. सी.पी.एम.च्या या मोर्चात आपणही सहभागी होणार असल्याची विहिंपने घोषणा केली. हा मोर्चा निघाला तेव्हा सी.पी.एम.च्या बरोबरीने विहिंपचेही कार्यकर्ते सहभागी झाले. प्रत्येक गावातील मंदिर संस्थानाने मोर्चाचे स्वागत केले व गावात सहभोजनाचा कार्यक्रमही झाला. गुरुवायूर मंदिरात मोर्चातील सर्वांना सहभागी करून घेऊन  आरती झाली. त्यानंतर महाप्रसाद झाला. त्यात जातीची कोणीच चर्चादेखील केली नाही. यातून विहिंपने सामाजिक समरसतेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. 
दीनदुबळ्यांचा आधार 
सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमताही दूर करणे हे विहिंपचे एक उद्दिष्ट आहेच. समाजातील दुर्बल घटक हा आपला समाजबांधव आहे, त्याच्या अडीअडचणी सोडवणे, त्याला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व संस्कार या किमान मानवी गरजांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी स्वत:चा वेळ देणे, धन खर्च करणे, हे आपले कर्तव्यच आहे हे प्रत्येक व्यक्तीवर बिंबवण्याचा विहिंपने प्रयास केला.
सेवाकार्यात अग्रणी
  अगदी प्रारंभापासूनच विहिंपने अनेक प्रकारची सेवाकार्ये सुरू केली. गेल्या ५0 वर्षांत विहिंप ही सेवाकार्य करणारी देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था बनली आहे. देशभर पसरलेल्या या सेवाकार्यांची संख्या बघितली तरीही कोणीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणविषयक एकूण कामे ९४९, आरोग्यविषयक एकूण कामे ७३१, स्वावलंबन घडवण्यासाठी चाललेली कामे १0१९, सामाजिक सेवेची कामे १२३, इतर सेवाकार्ये ११0६, याशिवाय वनवासी गावांचा व विशेषत: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणारे एकल विद्यालय प्रकल्प आहेत ३६ हजार. या प्रकल्पांत बालवाड्या आहेत, शाळा आहेत, महाविद्यालये आहेत, मोठी हॉस्पिटले आहेत तशी छोटी आरोग्य सल्ला केंद्रे आहेत. गावागावांत जाऊन सेवा देणारे आरोग्यरक्षक आहेत. गोशाला आहेत तशा गोमूत्र व गोमय यापासून विविध औषधी निर्माण करणारे उद्योग आहेत. शेती विकास प्रकल्प आहेत, ग्राम विकासाच्या योजना आहेत तसे रोजगार प्रशिक्षण उपक्रमही आहेत. या विविध सेवा प्रकल्पांचे  लाभार्थी काही कोटी नागरिक आहेत. इतर कोणत्याही कामांपेक्षा या सेवाप्रकल्पांचा विहिंपला अभिमान आहे. 
विदेशातील हिंदूंचे संघटन
प्राचीन काळापासून व्यापार उदिमासाठी भारतीय नागरिक जगभर प्रवास करत होतेच. इंग्रजांचे इथे राज्य होते. त्या वेळी त्यांनी ऊस व इतर नगदी पिकांच्या लागवडीसाठी हजारो मजूर इथून फिजी, केनिया, वेस्ट इंडीज बेटे अशा दूरच्या देशांत नेले. त्यांच्या अनेक पिढय़ा तिकडेच वाढल्या तरी त्यांनी आपला धर्म टिकवून ठेवला आहे. आता शिक्षण, व्यापार, उद्योग, अशा अनेक कारणांनी इतर देशांत जाऊन राहणार्‍या नागरिकांची संख्या काही कोटींपर्यंत जाऊन पोहचली आहे. या सर्वांना आपली संस्कृती जपण्याची इच्छा आहे, पण पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रवाहात आपले वेगळेपण टिकवून ठेवणे त्यांना कठीण जात आहे. आपले धार्मिक रीतीरिवाज, सण, उत्सव, खानपान, वेशभूषा, हे सर्व त्यांना टिकवायचे आहे, पण नवीन पिढीपर्यंत हा सर्व वारसा कसा पोचवावा हे त्यांना समजत नाही. वेद आणि गीता दूर राहिले, त्यांना रामायण आणि महाभारताचीही ओळख नाही. तिथे राहून चंगळवादी जीवनच त्यांना खुणावत असते. या विदेशस्थ हिंदूंना भारतातून आधार मिळण्याची आस आहे. ती गरज भागवण्याचे काम विहिंपने केले.
सर्वप्रथम विहिंपचे संस्थापक दादासाहेब आपटे यांनी विश्‍वभरातील अनेक देशांत प्रवास करून वेदमंदिराची स्थापना केली. पाठोपाठ एकेका देशात विहिंपची समिती स्थापन झाली. जगातील १00 हून अधिक देशांत आज विहिंपची सक्रिय कार्यसमिती आहे.  तिथल्या हिंदूंना एकत्र करून आपले सण, उत्सव साजरे केले जातात. विहिंपने कायदेशीर लढाई करून अनेक देशांतील शाळांत हिंदू मुलांना  स्वतंत्र धार्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली. आपल्या सांस्कृतिक मूल्यांची माहिती व्हावी म्हणून विविध स्पर्धा परीक्षा विदेशातही घेतल्या जाऊ  लागल्या. हिंदू देवदेवतांची निंदानालस्ती, जाहिरातींमध्ये त्यांचा विकृत प्रकारे उपयोग अशा घटना रोखण्यासाठी आंदोलने, सरकारवर दबाव आणणे, खटले दाखल करणे हे सर्व उपाय केले जातात. जगात कुठेही हिंदूंवर अन्याय होत असेल तर मानवाधिकार समितीकडे, प्रसंगी जागतिक न्यायालयाकडेही दाद मागितली जाते. आजवर या सर्व देशांत १00 हून अधिक मोठी हिंदूसंमेलने झाली.
हिंदू समाजाचे जागरण
भारतामध्ये हिंदू समाज बहुसंख्य आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या सहावा हिस्सा हिंदू समाज आहे. तो जगभर पसरला आहे. सर्व क्षेत्रांत अग्रेसर आहे. तरीही सर्वांत जास्त समस्याग्रस्त समाज हाच आहे. हजार वर्षे आम्हाला पारतंत्र्यात का राहावे लागले? या देशाची फाळणी का झाली? आजही या देशात जातीय दंग्यांचे भय हिंदू समाजाला का वाटते? आपले धार्मिक हक्क मिळवण्यासाठी हिंदूंना सतत संघर्ष करण्याची वेळ का येते? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे, की हिंदू समाज संघटित नाही. तो जातीजातींत विभागलेला आहे. हिंदू म्हणून तो जागृत नाही. या समाजाला संघटित करणे, त्याचा स्वाभिमान जागवणे, यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. गेल्या ५0 वर्षांंत हे काम विहिंपच्या अभियानामधून सातत्याने होत आले आहे. समाजाला संघटित करण्यासाठी त्याच्यावरील संकटांची जाणीव करून द्यावी लागते. समाज म्हणून जागृती येण्यासाठी समान अस्मितेचे जे विषय असतात त्यांना समोर ठेवून संघर्ष करावा लागतो. गेल्या ५0 वर्षांत विहिंपने सातत्याने अशा प्रकारची अभियाने राबवली.
विहिंपची स्थापना झाल्यावर लगेचच विहिंपने गोहत्या बंदीचा कायदा व्हावा यासाठी मोठे आंदोलन केले. त्यानंतर या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच आज ७ राज्यांत गोहत्याबंदी अस्तित्वात आहे. इतरही राज्यांत गोहत्येवर काही ना काही स्वरूपाचे नियंत्रण आहे.  या देशात राष्ट्रीय ऐक्य सांस्कृतिक स्वरूपात विद्यमान आहेच. हे हिंदू समाजाच्या लक्षात आणून देण्यासाठी विहिंपने १९८३ व पुन्हा १९९५ मध्ये एकात्मता रथयात्रेचे आयोजन केले. गंगामाता, भारतमाता व गोमाता या तीन प्रतिमांची यात्रा देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंंत पोहोचली व त्या यात्रांचे जनतेने अभूतपूर्व स्वागत केले. गंगा शुद्धीकरण योजनेसाठी विहिंपने सातत्याने आंदोलन केले. न्यायालयात गेल्यामुळे राम मंदिर निर्मितीचा विषय मागे पडला आहे. पण सततच्या आंदोलनातून हिंदू समाजात मोठय़ा प्रमाणात जागृती होत चालल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या राजकीय परिवर्तनामागे हेही एक कारण आहे असे म्हटले तार वावगे ठरणार नाही.
समाज हाच परमेश्‍वर
५0 वर्षांंचा कालखंड हा फार लहान नाही, पण हिंदू समाजासमोरील प्रश्नच इतके अवाढव्य आहेत, की या ५0 वर्षांंत इतकी मजल मारता आली हेच आश्‍चर्य आहे. हा समाज हाच आपला परमेश्‍वर आहे आणि याच्या सेवेसाठी निरंतर काम करत राहणे यातच इतिकर्तव्यता आहे. आपल्या वाटचालीची दिशा बरोबर आहे न एवढय़ासाठीच वारंवार पुनरावलोकन करावे लागते. ती दिशा निश्‍चित करून विहिंप असेच मार्गक्रमण करत राहणार आहे.
(लेखक विश्‍व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Volunteer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.