उपेक्षितांचा आवाज
By Admin | Updated: July 26, 2014 12:22 IST2014-07-26T12:22:52+5:302014-07-26T12:22:52+5:30
दलितांच्या- शेतकरी- कष्टकरी- कामगारांच्या व्यथावेदनांची धग कथाकादंबर्यांतून मांडणारा, जाणीवजागृती करणारा सच्चा माणूस म्हणजे अण्णा भाऊ साठे. विषमतेच्या विरोधात बुलंद आवाज देणार्या या लोकशाहिराच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा मागोवा.

उपेक्षितांचा आवाज
- प्रभाकर ओव्हाळ
महाराष्ट्राच्या परंपरेपासून.. स्टॅलीनग्राडच्या परंपरेपर्यंत वीररसात्मक पोवाडे.. ‘अकलेच्या गोष्टी’पासून ‘माझी मुंबई’पर्यंत दहाच्या वर लोकनाट्य, चाळीस-बेचाळीस कादंबर्या, बाराच्या वर कथासंग्रह, ‘इनामदार’ व ‘पेंद्याचे लगीन’ अशी दोन नाटके.. ‘चित्रा’ कादंबरीचे रशियन- पोलीश भाषांतून भाषांतर, ‘वारणेच्या खोर्यात’ कादंबरीचे गुजराती भाषेत पदार्पण.. ‘फकिरा’च्या हिंदी व पंजाबी आवृत्त्या.. आलगुज, आवडी, माकडीचा माळ, फकिरा, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, बारा गावचे पाणी या कादंबर्यांवर सरस, सुरस चित्रपट; साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचा हा व्यापक साहित्यपट.
सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे १ ऑगस्ट १९२0 रोजी अण्णा भाऊंचा जन्म झाला. ‘ज्या दिसाला तू जलामलास त्या दिशीच टिळकबाबाला मरणं आलं,’ अशी जन्मतारीख मातृवचनांतून अण्णा भाऊंना समजली होती. स्वराज्यासाठी सिंहगर्जना करणार्या लोकमान्यांची पुण्यतिथी तीच सुराज्यासाठी हाळी देणार्या लोकशाहिराची जयंती. अण्णांनी लोकनाट्य सुरुवातीच्या मुर्जयाच्या पहिल्याच अंतर्यात अभिवादन केले आहे.
‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क करुनी गर्जना ।
देश उठविला जागा केला त्या लोकमान्यांना ।
.. स्मरोनी गातो कवना ।’
.. अण्णा भाऊंचे बालपण मिसरूड फुटेस्तोवर वाटेगावात सरले. शिक्षण अक्षर ओळखण्याइतपत.
‘महाराष्ट्राच्या अंगणात - सरिता ह्या खेळ खेळत ।
कोयना-कृष्णा चालत घालून हातामध्ये हात
वायूला लाजवीत वारणा वाहे वेगात ।’
.. वारणेच्या खळखळणार्या प्रवाहात अण्णा भाऊ अनेकदा डुंबले होते.
‘कळकीचे बेट आकाशात झुकांड्या मारी ।
खाली सुपीक शेतजमीन काळजापरी ।।’
‘कापूस, ऊस, गुळभेंडी, तूर, तीळ, हवरी ।
त्यात लाळ्याचे लोंब पुढे लवून मुजरा करी ।।’
अशा मुर्जयाची अनुभूती शेत सर्यांतून हिंडताना अंगभर भिनली होती. पण, निसर्गाची किमया अनुभवणार्या मातंगाच्या वाट्याला येणारे सारे भोग त्यांनी साहीले होते. गावकुसाबाहेरच्या महार-मांग-रामोशी वस्तीतली उपासमार, दारिद्रय़, जातीयता अनुभवली होती. गुराढोरांचा दास होऊन त्यांना रानोमाळ भटकावं लागलं. शेठय़ा-सावकाराकडे राबावं लागलं.. नागडंउघडं फिरावं लागलं.. म्हणूनच
‘उरावर ठेऊन दगड
म्या धाव घेतली मुंबईची..’
.. विशी-एकविशीत त्यांनी मायावी नगरी मुंबापुरी गाठली; पण त्या बकाल परगण्यात अशा फाटक्या-तुटक्याला विचारणार कोण? मोलमजुरी मिळत नव्हती. कामासाठी वणवण हिंडणार्या अनेक बेकारांत आणखी एका बेकाराची भर पडली.
‘मढय़ावर पडावी मूठमाती
तशी गत झाली आमची..।’
..शेवटाला रस्त्यात खडी फोडायचे बिगारी काम मिळाले. गड-किल्ल्यांचा अभिमान असणार्या या र्मद गड्याला दगडाशी झुंजावे लागले. ना निवारा-ना चारा अशा भणंग अवस्थेत अण्णा कारखान्यांच्या दारोदार हिंडू लागले.. अनवाणी उन्हा-पावसात हिंडत.
‘पावसानं भरलं खिसं माझं ।
वाण मला एका छत्रीची ।।’
मुंबईभर अनवाणी छत्रीविण हिंडता-हिंडता त्यांना एका गिरणीत बिगार्याची नोकरी मिळाली.. अण्णा भाऊ कामगार बनले. हळूहळू साचा चालवू लागले.. तिथेही पिळवणूक.. वेतनात छळवणूक.. कामगार हक्कांची अडवणूक.. त्याविरुद्ध लढा.. कामगार नेत्यांची भाषणं ऐकून त्यांची प्रतिभाही चाळवू लागली.. हळूहळू शोषित कामगारांची सुखदु:खं जाणली. मुंबईतली श्रीमंत-गरिबांतली विषमता हृदयास भिडली. मन भडभडलं.
‘मुंबईत उंचावरी । मलबारी हील इंद्रपुरी ।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती..।’
अशी श्रीमंताची विलासी राहणी.. आणि त्याच्या उलट..
‘परळात रहाणारे । रातंदिस राबणारे ।
मिळेल ते खाऊन । घाम गाळती ।’
.. ही विषमता मनात काहूर उठवू लागली. त्यातूनच वीरश्रीची हळी फुटली.. आर्थिक क्रांतीसाठी! वर्गीय क्रांतीसाठी! कामगार क्रांतीसाठी! त्या पोवाड्यानं मनं चेतली.. अण्णा भाऊ शाहीर झाले.
..कम्युनिस्ट विचारसरणीचे पोवाडे दत्तात्रय गव्हाणकर, अमर शेख लाल बावट्याच्या निशाणाखाली गात होते. अण्णा भाऊही त्यात सामील झाले. तेव्हापासून अमर-अण्णा-दत्ता असा त्रिवेणी संगम झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत या त्रिसूत्रीने अवघा महाराष्ट्र जागता केला. १९४२पर्यंत ध्वनिक्षेपक अस्तित्वात नव्हते. त्या वेळी शाहिरांना कवनं उंच स्वरात गावी लागत. पण, ध्वनिक्षेपक येताच गाताना खर्जापासून तारसप्तकापर्यंत आवाज खेळवण्याची सोय झाली. बलराज सहानी-शैलेन्द्र व प्रेमधवन असे नामवंत त्या वेळी लाल बावटा कलावंतांचे सहकारी होते. त्यांनी पोवाड्यातल्या कवनांना आकर्षक चाली लावल्या आणि बघता-बघता कलापथकाचे कार्य महाराष्ट्राच्या दर्याखोर्यांतून निनादू लागले. तिन्ही शाहिरांच्या दिंडीत वर्गीयक्रांतीची दवंडी असे. भजनांत प्रतिगाम्यांचे भजन असे व गावाशिवारांत रान उठवणारे प्रभंजन असे. यामुळे गरीब शेतकर्यांचे, वारली-कोळी-ठाकर या आदिवासींचे अंतरंग हेलावून गेले. मात्र, अण्णा भाऊंना यापेक्षा प्रचारासाठी अधिक प्रभावी कलामाध्यमाची निकड जाणवली. त्यासाठी अण्णांनी तमाशाबाजाला आपलंसं केलं. अण्णा भाऊंना तमाशा कलेची जातिवंत शक्कल पाहिजे होती. बापू साठे यांच्या रूपानं ती घरातच सापडली. अण्णांना बापू मिळाले आणि मग बघता-बघता सारे आप्तगण तमाशा कलावंत आपण होऊन आले. गणपत सातपुते, सीताराम साठे, शंकर साठे, धोंडिबा सातपुते, अनंत बल्लाळ, नामदेव कापडे ही सारी हरहुन्नरी मंडळी या बाजासाठी सिद्ध जाहली. बापूंनी जुना गण घेऊन सुरावट केली.. अगदी तशीच अक्षरे अण्णा भाऊंनी त्याच सुरावटीत गोवली अन् नवा पोवाडा तयार झाला. वगातली जुगलबंदी, विनोदाच्या सपक कथा ऐकल्या, त्यातून चितारला सुप्रसिद्ध वग ‘अकलेची गोष्ट’. त्याला नाव ठेवले लोकनाट्य! ‘देशभक्त घोटाळे’, ‘खापर्या चोर’, ‘पुढारी सापडला’, ‘शेठजीचं इलेक्शन’ आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात लोकप्रिय झालेलं ‘माझी मुंबई’ अशी अनेक लोकनाट्यं त्यांनी साकार केली.
अण्णा भाऊ घाटकोपरच्या चिरानगरात राहत. चिरानगरातली त्यांची हवेली म्हणजे छोटेखानी झोपडी.. वार्यानं डोलायची, पावसात गळायची, पायाची जमीन पाणथळ! उंची किती? तर ताटीचे महाद्वार चिमटीनं हळुवार सारीत नतमस्तक होऊन आत शिरावं लागायचं. तिथंच तुणतुणं, तिथंच ढोलकी, तिथंच पाटा-वरवंटा, तिथंच चूल. गोधडीच्या वळकुट्या, एका कोपर्यात हांडी-भांडी.. झोपडाच्या चौअंगाला कोंबड्यांसाठी कारवीचं कुड होतं. त्या सार्यांच्या भाऊगर्दीत अण्णा भाऊंची बैठक जमे. रॉकेलचा दिवा विझेस्तोवर आणि कोंबडा बांग देईस्तोवर हा राकट शाहीर क्रांतीचे राग आळवीत राही.
‘आता वळू नका । कुणी चळू नका माघं पळू नका ।
बिनी मारायची अजून एक राह्यली ।
माझ्या जिवाची होतीया काहीली ।।’
.. अण्णा भाऊ गोणपाटाचे अंथरूण.. फाटक्या गोधडीचे पांघरूण अन् मनगटाची उशी करून झोपत असत. अशा उपेक्षितांच्या ग्रामीण जीवनातल्या सुख-दु:खांचे वेध घेत अण्णांच्या प्रतिभेतून कथा-कादंबर्या-कवनं असं धगधगतं साहित्य निर्माण झालं..
.. अण्णा भाऊ साठे म्हणे ।
बदलू या हे दुबळे जिणे ।
जग बदल घालुनी घाव ।
मला सांगून गेले भीमराव ।।
असं तळमळीनं सांगणारा हा लोकशाहीर उपेक्षितांचा आवाज अखंड घुमवत राहिला..
(लेखक साहित्यिक आहेत.)