कृत्रिम पावसासाठीही वरुणराजाला(च) साकडे.

By Admin | Updated: August 8, 2015 14:47 IST2015-08-08T14:47:11+5:302015-08-08T14:47:11+5:30

2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकसाठी चीननं तीस विमानं, चार हजार रॉकेट लाँचर्स आणि सात हजार विमानविरोधी बंदुकांचा ताफा सज्ज ठेवला होता. - पावसानं ऐनवेळी विचका होऊ नये म्हणून त्याला रोखण्यासाठी! आता जगभर प्रयोग होताहेत ते कृत्रिम पावसाचे! सध्या मराठवाडा आणि विदर्भातही कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याची धडपड सुरू आहे. दुष्काळात होरपळणारे नागरिक मोठय़ा आशेने आकाशाकडे बघताहेत; पण कोटय़वधी रुपये खर्च करूनही ‘आपल्या हातात’ काहीच नाही.

Varun Raja (artificial rain) for artificial rain. | कृत्रिम पावसासाठीही वरुणराजाला(च) साकडे.

कृत्रिम पावसासाठीही वरुणराजाला(च) साकडे.

>- पवन देशपांडे
तीस विमानं, चार हजार रॉकेट लाँचर्स आणि सात हजार विमानविरोधी बंदुकांचा ताफा तैनात होता.. कुठल्याही क्षणी या सा:या अस्त्रंचा वापर करण्याची गरज भासणार होती.. स्थितीच तशी होती.. कारण कोणत्या क्षणी ‘युद्ध’ सुरू होईल आणि होईल की नाही याची शाश्वती कोणीच देऊ शकत नव्हतं. पुढील कोटय़वधी रुपयांच्या नियोजनावर ‘पाणी’ फेरलं जाण्यापेक्षा आताचं हे ‘युद्ध’ परवडेल, म्हणून ही अस्त्रसज्जता ठेवण्यात आली होती. 
ही तयारी केली होती चीननं. वर्ष होतं 2क्क्8 आणि प्रसंग होता ऑलिम्पिकचा. 
वाचून धक्का बसेल, पण हे खरं होतं. 
कारण बिजिंग ऑलिम्पिकचा पहिला दिवस आणि त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून नियोजित केलेल्या भव्य उद्घाटन सोहळा काही तासांवर होता. या सोहळ्यावर पावसाचं विरजण पडू नये म्हणून ही अस्त्रसज्जता ठेवण्यात आली होती आणि प्रसंगी वरुणराजाशी दोन हात करण्याची तयारीही चीननं ठेवली होती. 
पाऊस पडू नये म्हणून चीननं वरुणराजाशी युद्ध पुकारलं होतं. जो उपाय पाऊस पडावा यासाठी केला जातो, तसाच उपाय पाऊस पडू नये म्हणून चीननं केला. 
हे सारं तंत्रज्ञान त्यांना वापरण्याची गरज पडली नाही, हा भाग वेगळा असला तरी, त्यांनी आपण निसर्गाचा कोप काही काळासाठी रोखू शकतो, अशी सज्जता ठेवली. हे वाखाणण्याजोगं आहे. 
निसर्गात आणि त्याच्या एकूणच प्रकृतीत ढवळाढवळ करण्याचं तंत्रज्ञान आता विकसित झालंय, याचं हे द्योतक होतं. हे तंत्रज्ञान होतं पावसाला कृत्रिमरीत्या रोखण्याचं. 
याउलट जगातील दुष्काळी देशांमध्ये पाऊस पडावा म्हणून कृत्रिम पावसाचं क्लाउड सिडिंग तंत्रज्ञान वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. 
जगात जिथं जिथं दुष्काळ आहे, त्या त्या देशा-प्रदेशातले लोक पाऊस पडावा यासाठी वरुणराजाला साकडं घालतात. कृत्रिम पाऊस पाडण्याची धडपड करतात. चीननं पाऊस पडू नये म्हणून प्रयोग करण्याची जिद्द दाखवली. त्याचं कारण म्हणजे चीननं याआधी पाऊस पडावा यासाठी कृत्रिम पावसाचे अनेक प्रयोग केले आहेत आणि ते यशस्वीही करून दाखवले आहेत. 
सध्या महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात हाच प्रयोग यशस्वी करण्याची आणि कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याची धडपड सुरू आहे. पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही, एक-दोन पावसांवर केलेली पेरणी आणि त्यावर उभं राहिलेलं रोप जळून खाक होण्याच्या मार्गावर आहे, जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, खाण्यासाठी चारा नाही अशी सध्या स्थिती भर पावसाळ्यात मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात आहे. कारण दोन महिने उलटून गेले तरी पावसाची म्हणावी तशी कृपा या भागावर झालेली नाही. गेल्या वर्षी पावसाने दिलेली ओढ आणि त्यामुळे अपुरा पाणीसाठा.. अशा स्थितीत हा पावसाळा तरी सुखाचा जावा अशी येथील जनतेची-शेतक:यांची अपेक्षा होती. पण वरुणराजा काही प्रसन्न झाला नाही. त्याची मनधरणी करण्यासाठी अखेर कृत्रिम पावसाचे पाऊल राज्य सरकारला उचलावे लागले आहे. एका कंपनीशी करार करून काही भागांमध्ये त्याचे प्रयोगही सुरू आहेत. 
कृत्रिम पाऊस नेमका असतो तरी कसा आणि तो पाडला कसा जातो? 
तो पाडला जातो ढगांशी खेळ करून. आकाशात ढग साचले की त्यावर काही रासायनिक प्रक्रिया (क्लाउड सिडिंग) केली जाते आणि त्यातून ते ढग पाऊस पाडण्याइतपत सक्षम बनविले जातात.
प्रकिया म्हटली तर सोप्पी, पण म्हटलं तर अवघडही. कारण त्यासाठीही निसर्गाची साथ हवीच.
दुष्काळाशी दोन हात करताना निसर्गाशी खेळण्याचा हा प्रकार सुरू झाला जवळपास सत्तर वर्षापूर्वी. अमेरिकेचे हवामानतज्ज्ञ विन्सेट शेफर यांनी जुलै 1946 मध्ये कृत्रिम पावसासाठी ड्राय आइस (कोरडा बर्फ) प्रक्रियेद्वारे ढगांना पावसायोग्य बनविण्याचा पहिला प्रयोग केला. आज ‘सिल्व्हर आयोडाइड’ रसायनाचा वापर करून पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्याचे प्रमाण अधिक आहे. पण हा प्रयोग पहिल्यांदा विन्सेट शेफर यांचे मित्र डॉ. बर्नार्ड व्होनेगट यांनी यशस्वी करून दाखविला होता. न्यूयॉर्क शहरात पहिला कृत्रिम पाऊस पडला. त्यानंतर आजर्पयत कृत्रिम पावसाच्या पद्धतीवर अनेक संशोधनं सुरू आहेत, परंतु या प्रयोगाद्वारे पाऊस पडेलच अशी शंभर टक्के हमी देणारं तंत्रज्ञान गेल्या सत्तर वर्षाच्या संशोधनातून पुढं आलेलं नाही. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या संशोधन अहवालात असं म्हटलं गेलं आहे.  
दुसरीकडे चीनने मात्र त्यांच्या देशात यशस्वी प्रयोग सुरू ठेवले आहेत. 2क्11 साली चीननं क्लाउड सिडिंगवर तब्बल 9क्क् कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली. ज्या भागात पाऊस होत नाही, अशा भागांवर कृत्रिम सरींची वृष्टी करायची असा धडाकाच चीनने लावला आहे. त्यामुळेच चीनचा कृत्रिम पावसावरील खर्च वर्षानुवर्षे वाढतच आहे. दुसरीकडे अमेरिका मात्र केवळ 9क् कोटी रुपये खर्च करून या क्षेत्रत सावध पावलं टाकताना दिसत आहे. 
भारतात 2क्क्4 साली प्रथम कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. त्यावेळीही पाऊस म्हणावा तसा पडला नव्हता. आता राज्य सरकारनं ‘ख्याती क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सल्टंट’ या कंपनीसोबत करार करून औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसासाठी मुख्य केंद्र केलं आहे. त्याचे प्रयोगही सुरू केले आहेत. औरंगाबादच्या आसपास 25क् किलोमीटरच्या परिघात कृत्रिम पावसाचे हे प्रयोग सुरू केले गेले आहेत. पुढील तीन महिने ते सुरू राहणार आहेत. त्याच्या यशापयशाचा विचार केल्यास असा खर्च परवडणारा आहे का? त्यातून जनतेला खरंच पाणी मिळणार आहे का? की 12-13 वर्षापूर्वी जसे अयशस्वी प्रयोग करण्यात आले तशीच आताही परिस्थिती असेल? - असे प्रश्न अनुत्तरित आहेत. 
जगभरातील आकडेवारी पाहिली तर सध्यातरी या प्रयोगाला 3क् टक्क्यांपेक्षा अधिक यश आलेले दिसत नाही. चीन, इस्नईल आणि अमेरिका हे प्रयोग वारंवार करते, कारण त्यांच्याकडे तसे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. एखादा प्रयोग फसला तरी त्यांना फारशी झळ पोहोचत नाही. आपले तसे नाही. आपल्याला हे तंत्रज्ञान एखाद्या कंपनीकडून घ्यावे लागते किंवा त्या कंपनीला असे प्रयोग करण्याचे कंत्रट दिले जाते आणि त्याची मोठी रक्कम मोजावी लागते. दुष्काळाची झळ सोसत असणा:या जनतेसाठी ही रक्कम मोजणो गैर आहे असे नाही, पण त्यात किती यश येणार हे कोणीच सांगू शकणार नाही. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्च करावे आणि हाती काहीच लागू नये, अशी वेळ महाराष्ट्रातील सरकारवर आणि ओघाने जनतेवर येऊ नये, एवढेच काय ते वरुणराजाला साकडे..
 
कसा पडतो कृत्रिम पाऊस?
 
कृत्रिम पावसाच्या पद्धतींबाबत जागतिक हवामान संघटनेचे सदस्य असलेले हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, क्लाउड सिडिंगदरम्यान ढगांवर ठरावीक आकाराच्या मिठाचे कण किंवा सिल्व्हर ओयोडाइडचे कण फवारले जातात. त्यासाठी डोंगर माथ्यावर जनित्र बसविले जाते आणि त्यातून या पदार्थाचा फवारा ढगांवर केला जातो. मात्र ढग जमिनीपासून फार दूर असतील तर अशा प्रक्रियेचा फारसा उपयोग होत नाही. कारण फवारलेले पदार्थ ढगांर्पयत पोहोचूच शकत नाहीत. आणखी एका प्रकारात ढगांमध्ये रॉकेट सोडले जाते. क्लाउड सिडिंगसाठी लागणारी रसायने भरून त्याचा मारा ढगांवर केला जातो आणि ते जाऊन ढगात फुटतात. या पद्धतीचा चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. चीनकडे अशा प्रकारचे चार हजार रॉकेट लाँचर्स आहेत. पण या प्रकारात आपल्याला हव्या त्या भूभागावरील ढगांमध्ये क्लाउड सिडिंग करण्याचे नियंत्रण राहत नाही. त्यामुळे ही पद्धत फारसी वैज्ञानिक नाही, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 
आणखी एक पद्धत जी सर्वाधिक यशस्वी म्हणून वापरली जाते ती म्हणजे विमानाच्या माध्यमातून ढगांच्या पायथ्याशी जाऊन रसायनांचा मारा करणो. विमानातून मिठाच्या किंवा सिल्वर आयोडाइडच्या नरसाळ्या फोडून ढगांच्या विशिष्ट भागात फवारणी केली जाते. मात्र यासाठी आधी ढगांचे रडारद्वारे निरीक्षण केले जाते. ढगांचा आकार, त्यातील मेघबिंदूंचा साठा, त्यांची उंची या सर्व घटकांवरून त्यावर कोणत्या प्रकारच्या रसायनांचा मारा करायचा, हे ठरविले जाते. नैसर्गिक पद्धतीत जशी ढगांना पाऊस पडण्यासाठीची कळ मिळते, तशीच कळ या रसायनांद्वारे दिली जाते. 
 
कृत्रिम पावसाच्या मर्यादा
 
1 ज्या भागात पाऊस पाडायचा आहे, त्या भागात किमान ढग असले पाहिजेत आणि ते ढग शोधण्याची रडार यंत्रणा हवी.
2 ढगांर्पयत पोहोचण्यासाठी आणि ढगांमध्ये रसायनांचे बीजारोपण (क्लाउड सिडिंग) करण्यासाठी विमान आणि रॉकेट हवे.
3 ढगांर्पयत पोहोचेर्पयत ढग विरून जाण्याची शक्यता दाट असते. 
4 ज्या ढगांमध्ये रसायनांचे बीजारोपण केले जाते त्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी असल्यास काहीच फायदा होत नाही. पाऊस पडू शकत नाही. 
5 ज्या भागात पाऊस पडावा म्हणून आपण रासायनिक बीजारोपण करतो त्याच भागात पाऊस पडेल याची शाश्वती नसते. ते ढग पुढे जाऊनसुद्धा बरसू शकतात. 
17.5 कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारने 2004 साली कृत्रिम पावसावर केला होता, परंतु त्यात यश आले नव्हते. कृत्रिम पावसाचीही कृपा झाली नव्हती. 
25 कोटींचा खर्च यावेळी अंदाजित आहे. अजून यावेळचा प्रयोग पूर्ण व्हायचा आहे. त्यामुळे यावेळीचा खर्च 40 कोटींपेक्षाही वर जाईल असा अंदाज आहे.
50 हजार किलो सिल्व्हर आयोडाइडचा वापर दरवर्षी जगभरात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो. एकावेळी 10 ते 20 ग्रॅम सिल्व्हरचाच वापर कृत्रिम पावसाचा प्रयोग करताना केला जातो. 
 
अशी चालते प्रकिया
1 रडारद्वारे मोठय़ा प्रमाणात बाष्प असलेल्या ढगांची पाहणी केली जाते. 
2 असे ढग आढळल्यानंतर त्यावर विमानाद्वारे किंवा रॉकेटद्वारे ढगांमध्ये क्लाउड सिडिंगच्या रसायनांचा मारा केला जातो.
3 त्या ढगांमधील बाष्पकणांचे एकत्रीकरण होऊन त्याचे मोठय़ा कणांमध्ये रूपांतर होते. काही वेळाने ते पाऊस म्हणून बरसतात.
 
 
पजर्न्यास्त्रच्या पुराणकथा
- एक बाण ढगात मारला की पाऊस पडायला सुरुवात.. असे बरेच पौराणिक कथांच्या मालिकांमधून आपल्याला पाहायला मिळते. ते असते पजर्न्यास्त्र. या कथांमधला हाच प्रकार आता रसायनिक रॉकेट्सच्या (अगिAबाण) रूपात पाहायला मिळतो. 
- पाऊस पाडण्यासाठी यज्ञ केला जायचा. तशा आख्यायिकाही आहेत. त्यासाठी अधिक धूर होणा:या झाडांची लाकडे, धूप, दुग्धजन्य पदार्थ यांची आहुती दिली जायची. हाही कृत्रिम पावसाचाच प्रयोग. 
 
धोका काय?
रसायनांद्वारे पाऊस पाडण्याबाबत जगभरात संशोधन आणि प्रयोग सुरू असतानाच दुसरीकडे मात्र अशा पावसामुळे होणा:या धोक्याचीही चर्चा सुरू आहे. हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्या मते, अशा पावसामुळे पर्यावरणाला धोका नाही. कारण देताना ते सांगतात की, नैसर्गिक पाऊस तयार होण्यासाठीही समुद्रापासून तयार होणारे मिठाचे कण लागतात. नळकांडय़ा फोडून फवारलेल्या मिठाचे वजन केवळ एक किलोग्रॅम असते. तसेही नैसर्गिक पावसात क्षारांचे काही प्रमाण असते, त्यात कृत्रिमरीत्या क्षार मिसळले गेल्यास फारसा फरक पडत नाही, कारण हे क्षार नगण्य असे असतात.
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)
dpavan123@gmail.com
 

Web Title: Varun Raja (artificial rain) for artificial rain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.