कर्तृत्ववान अमोघ
By Admin | Updated: August 30, 2014 15:02 IST2014-08-30T15:02:52+5:302014-08-30T15:02:52+5:30
सातत्याने कष्ट करून यशाची वाट साधता येइलही, पण त्या वाटेवरून जाताना येणार्या प्रचंड ताणतणावांचं काय? अंगभूत गुणांना आणि कार्यप्रवणतेला जर योगसाधनेची जोड मिळाली, तर त्यातून येते भावनिक स्थिरता. मग अवघे जीवनच आनंदमय होऊन जाते. योगसाधनेची कास धरून यशस्वी आध्यात्मिक व भौतिक वाटचाल केलेल्या तरुणाची ही कहाणी.

कर्तृत्ववान अमोघ
डॉ. संप्रसाद विनोद
गेल्या पस्तीस वर्षांत योगप्रशिक्षण आणि योगोपचाराच्या निमित्ताने अनेक होतकरू, कष्टाळू, हुशार, तसंच आळशी, खुशालचेंडू आणि साधारण बुद्धीच्या युवकांशी जवळून संबंध आला. जवळचं नातं जुळलं. संवाद झाले. चर्चा झाल्या. वादविवादही झाले. त्यातले बरेचसे युवक त्यांना काही समस्या, अडचणी होत्या म्हणून आले. या समस्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, वर्तन, मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, अभ्यास, आत्मविश्वासाचा अभाव, नातेसंबंध, वैवाहिक अशा विविध प्रकारच्या होत्या.
अमोघची गोष्ट जरा वेगळी होती. त्याला फक्त थोडी पाठदुखी आणि मानसिक ताण होता. त्याचा व्यवसाय पाहता त्याच्या समस्या समजण्यासारख्या होत्या. सुरुवातीपासूनच अमोघ मला खूप वेगळा वाटला. त्याला अनेक विषयांमध्ये रुची आणि गती होती. बुद्धी उत्तम असल्यामुळे कुठलाही विषय समजून घेणं त्याला सोपं जायचं. त्याला योगदेखील मुळातून जाणून घ्यायचे होते. उत्तम प्रकारे आणि मनापासून योगसाधना शिकायची होती. ध्यान शिकायचं होतं. ध्यान जीवनात उतरवायचं होतं. त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट घेण्याची, वेळ देण्याची त्याची तयारी होती. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरू होते. त्याचे योगाचे एक-दोन अभ्यासक्रम झाले होते.
एकदा डेक्कनवरच्या एका दुकानात त्याला माझं नाईन सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल मेडिटेशन हे पुस्तक दिसलं. ते चाळत असताना त्याला या पुस्तकाचा लेखक भारतीय आणि पुण्यातला आहे, हे समजलं. त्याने तडक क्रॉसवर्डमधूनच मला फोन केला. भेटायची वेळ घेतली आणि दुसर्या दिवशी तो भेटायला आलाही. त्याच्याशी बोलताना त्याने योगाविषयी भरपूर वाचन केल्याचं आणि त्याला योगविद्या जाणण्याची तीव्र जिज्ञासा असल्याचं माझ्या लक्षात आलं. या जिज्ञासेला फक्त योग्य दिशा द्यायला हवी होती.
तो नियमितपणे शांती मंदिरात यायला लागला. तळमळीने योगाभ्यास करू लागला. न दमता, न कंटाळता, कुठलीही तक्रार न करता, काहीही सबब न सांगता रोजचा जाण्यायेण्याचा ४0-४५ कि.मी.चा प्रवास करून तो योगाभ्यासासाठी येऊ लागला. त्याला येणारे सगळे प्रश्न विचारत गेला. मी त्याची उत्तरं देत गेलो. त्यानुसार तो प्रयोग करत गेला. केलेल्या प्रयोगांवर सखोल चिंतन, मनन करून आणखी प्रश्न विचारत राहिला. जोडीला योगसाधना करत गेला. हळूहळू साधनेत रमत गेला. साधनेचे परिणाम मिळू लागले.
आय.आय.टी.तून एम. टेक. केलेल्या अमोघच्या बुद्धिमत्तेविषयी मला कधीच शंका वाटली नाही. पण, त्याची शिकण्याची तीव्र जिज्ञासा पाहून मात्र मी नेहमी चकित व्हायचो. त्याच्याशी बोलत गेल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या. वडील कमी शिकलेले. आई चौथी पास. हडपसरमधल्या एका चाळीत खूप गरिबीत, अडचणीत बालपण गेलं.
या हालअपेष्टांमधून जाताना त्याच्या एक गोष्ट चांगली लक्षात आली होती- सन्मानपूर्वक, सुखी, समृद्ध जीवन जगायचं असेल आणि अपार कष्ट सोसलेल्या आपल्या आई-वडिलांचे पांग फेडायचे असतील, तर उत्तम शिक्षणाला काही पर्याय नाही. म्हणून शाळेपासूनच प्रत्येक परीक्षेत उत्तम गुण मिळवायचं त्याने मनाशी ठरवलं आणि तसं प्रत्यक्षातही आणलं.
अमोघसारखे आणखी काही युवक माझ्या पाहण्यात आहेत; जे प्रतिकूल परिस्थितीत डगमगले नाहीत. निराश झाले नाहीत. ज्यांनी परिस्थितीचा, अडचणींचा सामना केला. त्यावर मात केली. अभिजात योगसाधनेच्या साह्याने आपला परिपूर्ण विकास साधला. पण, इतर बहुसंख्य युवकांना प्रथम आपल्या अडचणी दूर कराव्या लागल्या. त्यासाठी बराच वेळ द्यावा लागला. नंतर त्यांचा खरा विकास सुरू झाला. सकारात्मक प्रगती झाली. पण, अमोघसारख्या युवकांची प्रगती लवकर सुरूही झाली आणि लवकर पुरीही झाली.
अमोघ आता योगाभ्यासातला आनंद घेऊ लागलाय. योगसाधनेचे सुरुवातीचे परिणाम आता चांगले स्थिरावले आहेत. दैनंदिन जीवनातही ते आता त्याला जाणवू लागले आहेत. चित्त स्थिर झालंय. हे स्थैर्य दिवसभर टिकतंय. लोकांबरोबरच्या वागण्यात-बोलण्यात बरीच सुधारणा आहे. मन शांत होत चाललंय. अडचणी आल्या, तरी त्यांनी तो आता गडबडून जात नाही. विचारपूर्वक व्यावसायिक निर्णय घेतो. येणार्या समस्यांचं धीराने निराकरण करतो.
विचार करून व्यावसायिक धोके घेणं आता त्याला चांगलं जमायला लागलंय. अशा प्रसंगी येणारा ताणही खूप कमी झालाय. रात्रीची झोप शांत लागते. वैचारिक गोंधळ कमी झालाय. भावनिक स्थिरता आली आहे. मुख्य म्हणजे अभिजात योगसाधनेच्या साह्याने आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती चांगल्या प्रकारे सुरू आहे. अध्यात्माचा भौतिक विकासावर कुठलाही विपरीत, नकारात्मक परिणाम झालेला नाही. नवी कामं मिळणं- मिळवणं, टिकणं-टिकवणं जमायला लागलंय. आता त्याच्या व्यवसायाचा विस्तारही बराच वाढलाय. नुकतंच त्याचं कार्यालय १५00 चौरस फुटांच्या भाड्याच्या जागेतून ५000 चौरस फुटांच्या प्रशस्त, सर्व सोयींनी युक्त अशा वातानुकूलित जागेत स्थलांतरित झालं आहे.
नवीन जागेच्या वास्तुप्रवेशाच्या वेळी तो मला म्हणाला, सर, तुमच्याकडे मी योगसाधनेसाठी आलो नसतो, तरी मी एवढी प्रगती नक्की केली असती. पण, त्या सगळ्याचा मला खूप ताण आला असता. तुमच्यामुळे मी हे सगळं अजिबात ताण न घेता मजेत करू शकलो.
मी त्याला सांगितलं, तू मनापासून केलेल्या योगसाधनेचा हा सहज परिणाम आहे. मी या विद्येचा केवळ एक विनम्र उपासक आहे,
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरूआणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)