अविस्मरणीय अनुभव

By Admin | Updated: July 12, 2014 14:12 IST2014-07-12T14:12:03+5:302014-07-12T14:12:03+5:30

एव्हरेस्ट पादाक्रांत झालेल्या दिवसाचे औचित्य साधून सर एडमंड हिलरी यांचे ‘ओकलंड’मधील घर नुकतेच स्थलांतरित करण्यात आले. या निमित्ताने हिलरींचा मुलगा व दोन गिर्यारोहकांच्या भेटीचा योग जुळून आला. न्यूझीलंडमधील त्या अनुभवाविषयी...

Unforgettable experience | अविस्मरणीय अनुभव

अविस्मरणीय अनुभव

- कल्याणी गाडगीळ

मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या २९ मे या दिवशी सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी पृथ्वीतलावरील सर्वांत उंच शिखर ‘एव्हरेस्ट’ सर्वप्रथम पादाक्रांत केले. २९ मे २0१४ रोजी या घटनेला ६१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने न्यूझीलंडमधील ओकलंड या शहरात एक आगळाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो म्हणजे सर एडमंड हिलरींच्या ‘रेम्युअरा’ या ओकलंडमधील उच्चभ्रू वस्तीतून ‘ओटारा’ या ओकलंडमधील शाळेत हलविण्यात आलेल्या घराचे ‘सर एडमंड हिलरी लीडरशिप सेंटर’ म्हणून उद्घाटन करण्यात आले.
सर एडमंड हिलरी व त्यांच्या पहिल्या दिवंगत पत्नी लुईस (Louise) यांनी १९५६मध्ये बांधलेल्या घरात ते त्यांच्या मृत्यूपर्यंत (११ जानेवारी २00८) राहिले. नंतर हे घर त्यांच्या टेरी जार्व्हिस (Terry Jarvis) या उद्योजक शेजार्‍याने विकत घेतले. जार्व्हिसना घरापेक्षा घराच्या जागेची गरज होती. म्हणून त्यांनी १.५ मिलियन डॉलर्स देऊन घर घेतले; पण हिलरी कुटुंबीयांना घराची इमारत हलवायला नुसती परवानगीच नव्हे, तर मदतही केली. घराच्या पायाचे स्तंभ पाडून घर जसेच्या तसे एका भल्या मोठय़ा ट्रकच्या साह्याने ओटारा येथे हलविले गेले. हे काम २0१0मध्ये सुरू झाले. पायाची तोडफोड करताना 'Buy a Hillary Brick Day अशी जाहिरात करण्यात आली; ज्यायोगे त्या घराच्या पायातील एक-एक वीट विकत घेऊन ते पैसे लीडरशिप सेंटरसाठी निधी म्हणून वापरण्यात आले. या कामासाठी न्यूझीलंडमधील अनेक उद्योग व सरकारतर्फेही बरीच आर्थिक मदत करण्यात आली.
घर ट्रकवर हलविण्यात आल्यानंतर मोकळ्या जागी हिलरींनी स्वहस्ते केलेले एक स्टेन्सिल सापडले. त्यांच्या एका मोहिमेमध्ये कुठे खड्डे खणायचे, याच्या नोंदी त्यावर होत्या. आता हे स्टेन्सिल लीडरशिप सेंटरमधील त्यांच्या अभ्यासिकेत ठेवण्यात आलेले आहे. ज्या घरात बसून त्यांनी हिमालयावरील, तसेच इतर मोहिमा आखल्या व ‘हिमालयन ट्रस्ट’ या त्यांच्या संस्थेतर्फे नेपाळमध्ये शाळा, इस्पितळे, गिर्यारोहणाचे प्रशिक्षण इत्यादी लोकसेवेची कामे केली, त्या वास्तूत आता मुलांना व समाजाला नेतृत्वाचे शिक्षण देण्यात येणार आहे. या अभ्यासिकेत त्यांचे ग्रंथालय, छायाचित्रे, तसेच जुन्या वर्तमानपत्रांतील हिलरींच्या विविध यशासंबंधीची कात्रणे ठेवलेली आहेत. पीटर हिलरी- सर एडमंड हिलरींचा मुलगा - हेही दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करून आले आहेत. नवीन जागी हलविलेल्या घरात गेल्यानंतर  वडिलांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या व नवनवीन मोहिमांविषयी जेवणाच्या टेबलावर वडील या गोष्टींची माहिती कशी सांगत, याच्या आठवणीने त्यांना गहिवरून येत होते.
या उपक्रमानिमित्त जाणवलेल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी होत्या. पहिली म्हणजे, एव्हरेस्टसारखे उत्तुंग शिखर सर केल्यानंतरही सर हिलरी अत्यंत विनम्र राहिले. त्यांच्या एव्हरेस्ट, तसेच अंटाक्र्टिका आणि गंगेतून उलटा प्रवास करण्याच्या धाडसी मोहिमांमधील यशापेक्षा त्यांना नेपाळी लोकांसाठी शाळा, इस्पितळे बांधणे अशा कामांविषयी जास्त प्रेम वाटे. १९७५मध्ये नेपाळला जात असताना विमानाला अपघात होऊन त्यांची पत्नी लुईस (Louis) व मुलगी बेलिंडा (Belinda) यांचा मृत्यू झाला. नंतर लेडी जून हिलरी यांच्याशी त्यांनी विवाह केला व नेपाळमधील सामाजिक काम त्यांच्या मृत्यूपर्यंत चालूच ठेवले. त्यांनी स्वत:च याबद्दल लिहून ठेवले आहे, की ‘kI have enjoyed great satisfaction from my climb of Everest and my trips to the poles. But there is no doubt that my most worthwhile things have been the building of schools and medical clinics' लेडी जून व पीटर हिलरी यांनी सर एडमंड हिलरींचे हे लोकसेवेचे व्रत चालू ठेऊन त्यांचे घर ‘सर एडमंड हिलरी कोलेजिएट इन ओटारा’ (Sir Edmund Haillary Colligiate in Otara) येथे हलविण्यास परवानगी दिली. 
नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारी ही संस्था मुलांना स्वत:च्या क्षमता ओळखून, त्या जास्तीत जास्त वापरून उच्च ध्येये प्राप्त करण्यासाठी प्रेरणा देईल व नवीन क्षितिजे शोधायला मदत करेल. सर एडमंड हिलरींचे एक वाक्य या संदर्भात फारच बोलके आहे. ‘It is not the mountain we conquer, but ourselves’ नेतृत्वाचे प्रशिक्षण देणार्‍या संस्थेला यापेक्षा अधिक स्फूर्तिदायक संदेश कोणता असू शकेल?
दुसरी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे, न्यूझीलंडमध्ये अनुभवलेली इजिनियरिंगची किमया - घरे जशीच्या तशी उचलून दुसरीकडे व्यवस्थित हलविणे. ओकलंडमध्ये १८८५-८६मध्ये बांधले गेलेले तीन मजली हॉटेल बर्डकेज टेव्हर्न (Birdcage Tavern) म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या व चांगला पब म्हणून फार गाजलेले. शहरातील वाहतुकीच्या सोयीसाठी ‘व्हिक्टोरिया टनेल’ बांधायचे ठरले. तो टनेल या हॉटेलखालून जाणार असल्याने हॉटेलची ७४0 टनांची तीन मजली इमारत खास ट्रेक तयार करून ऑगस्ट २0१0मध्ये सुमारे ४0 मीटर अंतरावर हलविली व टनेलचे काम पूर्ण झाल्यावर एप्रिल २0११मध्ये पुन्हा मूळच्या जागी नेऊन ठेवण्यात आली; संपूर्ण इमारतीला अक्षरश: काडीचाही धक्का न लागता. तीन वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाने ख्राइस्टचर्चमधील अनेक घरे पुराचा सामना करीत आहेत. ख्राइस्टचर्चचे सिटी कौन्सिल ही घरे ‘उचलून’ सुरक्षित जागी नेऊन वसविणार आहे. 
घरमालक जुनी वास्तू पाडून दुसरीकडे घरे बांधण्यापेक्षा स्वत:च्याच वास्तूमध्ये राहायला मिळणार, म्हणजे ‘वास्तू तीच फक्त परिसर वेगळा’ या मध्यावधीच्या तडजोडीला खुशीने तयार आहेत. सर एडमंड हिलरींचे घरही मे २0१0मध्ये रेम्युअरा येथून हलविण्यास प्रारंभ केला व २९ मे २0१४ रोजी घराच्या नव्या परिसरात म्हणजे ओटारा येथे ते स्थिरावले आहे, जसेच्या तसे! (हे घर हलवितानाचे चलत्चित्र पाहायचे असेल,तर tvnz.co.nz/nationalnews/hillary-s-house-relocated-3537417/video या लिंकवर पाहायला मिळेल.)
उत्तुंग ध्येय, त्यासाठी अविरत कष्ट, यशाने हुरळून न जाता अधिक उंच शिखरे गाठण्यासाठी प्रयत्न, मानवतावादी कार्ये व स्वत:च्या यशापेक्षाही मानवतावादी कार्याला प्राधान्य देणारे सर एडमंड हिलरी - त्यांच्या स्मरणानेही प्रेरणा देत राहतील. आता जिथे असतील, तिथे त्यांना आपल्या सर्वांतर्फे मानाचा मुजरा व विनम्र दंडवत! 
(लेखिका न्यूझीलंडस्थित गृहिणी आहेत.)

 

Web Title: Unforgettable experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.