गोव्यातली हटके दिवाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 06:08 IST2018-11-04T06:08:00+5:302018-11-04T06:08:00+5:30

आमची दिवाळी अगदी आगळीवेगळी. दिवाळीची सुरुवात व्हायची तीच तोंड कडू करून ! दिवाळी तशी साधीच; पण या दीपोत्सवात लक्ष्मीची पावले नक्कीच आपल्या तिजोरीकडे वळतील ही भावना प्रत्येकाच्या मनात ठाण मांडून असायची !..

Unforgettable Diwali moments in Goa | गोव्यातली हटके दिवाळी!

गोव्यातली हटके दिवाळी!

ठळक मुद्देदिवाळी तशी साधीच, पण या दीपोत्सवात लक्ष्मीची पावले मात्र नक्की आपल्या तिजोरीकडे वळतील ही भावना प्रत्येकांच्या मनात ठाण मांडून असायची!..

नीता कनयाळकर

वय वाढत जाते तसे जुन्या आठवणी आपल्या मनात रुंजी घालतात. आठवणींचा हा इतिहास चघळत बसण्यातही सुखद आनंद मिळतो. त्याच आठवणींपैकी एक आठवण म्हणजे दिवाळी.
मी मूळची गोव्याची. पणजीहून ५७ किलोमीटर अंतरावर असलेले सावर्डा हे आमचे मूळ गाव. जवळ जवळ २०-२२ खोल्या असलेले दुमजली घर. आता अशी घरे दुर्मीळच. आमची आई आम्हाला दिवाळीची सुट्टी कधी लागते याची आतुरतेने वाट बघायची. कारण घरातील साफसफाई ही आमची जबाबदारी. भाऊ मंडळींनी उंचावरची साफसफाई करायची, तर इतर साफसफाईची जबाबदारी आम्हा बहिणींची. एवढ्या मोठ्या घराला रंग देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे घर चांगले घासून, धुवून पुसून स्वच्छ केले जायचे. किमान दोन तरी खोल्यांची साफसफाई रोज केली जायची व रात्री आईला फराळ करणेकामी मदत केली जायची. भाऊ मंडळी आकाशकंदील बनविण्यात गर्क. १-२ नाहीत तर चक्क ५-६ आकाशकंदील बनवले जायचे वेगवेगळ्या ठिकाणी टांगण्यासाठी. अंगणात तुळशीच्या डोक्यावर एक, दुसरा वरच्या मजल्यावरच्या खिडकीवर. तिसरा घराच्या छपरावर तर चौथा उंच नारळाच्या झाडावर. पाचवा घराच्या चोहोंबाजूने फिरणारा तर सहावा फणसाच्या झाडावर. भावाच्या कल्पना पण दरवर्षी सुपीक असायच्या. अशा वातावरणात दिवाळीचा आनंद दरवळायचा.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. त्याच्या आदल्या दिवशी गावात नरकासूर बनवण्याची स्पर्धा ठेवली जायची. नरकासुरांची रात्री गावभर मिरवणूक काढून मग दहन केले जायचे. नरकासूर बनविण्यासाठी काथ्या, गवत, काड्या, कापूस, कागद, पुठ्ठा यांचा वापर केला जायचा. त्याच्या पोटात फटाके भरले जायचे.
गोव्याची दिवाळी जरा हटके !... तोंड कडू करून दिवाळीची सुरुवात व्हायची.
अभ्यंग स्नान - सुवासिक तेलाने मालिश करून नारळाचे दूध अंघोळीसाठी वापरून, घरी बनविलेल्या उटण्याने अंघोळ व्हायची. ओल्या अंगाने पुरुष मंडळी ‘कारिट’ नावाचे कडू फळ तुळशीच्या समोर उभे राहून ‘गोविंदा गोविंदा’ म्हणत पायाने फोडायचे व त्याची छोटीशी बी तोंडात टाकायची. जणु काही वाईट, कडू सवयी किंवा प्रवृत्ती गिळून व त्या पायदळी तुडवून चांगला विचार, चांगल्या कर्मासाठीची सुरुवात करण्याचा संकल्प.
‘सातीवनाचं’ झाड याला नरकचतुर्दशीला महत्त्व असते. घरातील मोठी व्यक्ती पहाटे उठून त्या झाडापाशी जाऊन त्या झाडाची पूजा करत. झाडाच्या साली काढून त्या घरी आणत. या साली स्वच्छ धुवून पाट्यावर वाटल्या जात. वाटताना त्यात मिरे, लसूण टाकून त्याचा रस काढला जायचा. हा रस घरातील सर्व मंडळी प्राशन करायचे आणि मगच गोडधोड खायला सुरुवात व्हायची ! गोव्यात दिवाळीच्या दिवसात भात कापणीचा ऋतुमान असायचा. काढलेल्या नवीन भाताचे पोहे बनविले जायचे. त्याचा नेवैद्य देवाला अर्पण केला जायचा.
पोह्याचे प्रचंड प्रकार गोव्यात दिवाळीला खास चाखायला मिळतात. गूळ-खोबऱ्याचे दडपे पोहे, बटाटा-मिरचीचे तिखट पोहे, दुधातील पोहे, नारळाच्या रसातले पोहे, ताकातले पोहे, दह्यातले पोहे, कटी पोहे... एवढे नव्हे तर या पोह्यांसोबत आंबाड्याचे गोड-आंबट रायते, काळ्या वाटाण्याची उसळ, बिमलाचे लोणचे, काजूची उसळ, अळूवड्या, हळदीच्या पानातील पातोळ्या, शेवग्याच्या फुलांची भजी असे इतर अनेक प्रकार बनवले जायचे. घरचा फराळ होताच मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी शेजारीपाजारी जायचे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिव्याची रोषणाई न करता पणत्यांची रोषणाई व्हायची. शेणाने सारवलेल्या अंगणात पणत्यांच्या मंद पेटणाºया वातीचा लखलखाट, दरवाजात आंब्याची पाने लावून फुलांचे भले मोठे तोरण, अंगणात ठिपक्यांची रांगोळी, दरवाजात शेणाच्या वासात फुलांचा, तुळशीकडील अगरबत्ती व धुपाचा वास दडून जायचा. घरातील सर्व दरवाजे उघडून तिजोरी लक्ष्मीच्या आगमनाची वाट बघायची.
दिवाळी तशी साधीच, पण या दीपोत्सवात लक्ष्मीची पावले मात्र नक्की आपल्या तिजोरीकडे वळतील ही भावना प्रत्येकांच्या मनात ठाण मांडून असायची!..
(मूळच्या गोव्याच्या असलेल्या लेखिका उद्योजिका आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: Unforgettable Diwali moments in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.