उबुन्टु!
By Admin | Updated: May 2, 2015 18:11 IST2015-05-02T18:11:56+5:302015-05-02T18:11:56+5:30
समोरच्या झाडार्पयत धावायचं. जो पहिला येईल त्याला बक्षीस! सर्व पोरं धावली, पण सोबतीनं! जो मागे पडला, त्याला बाकीच्यांनी हात धरून पुढे नेला. सगळे एकत्रच त्या झाडापाशी पोहोचले आणि मग त्यांनी जल्लोष केला. - का केलं त्यांनी असं?

उबुन्टु!
>‘आम्ही सारे आहोत, म्हणून माझं अस्तित्व’ हे त्यांना माहीत होतं.
मिलिंद थत्ते
फ्रिकेतल्या एका गो:या पाहुण्याने सांगितलेला एक किस्सा आहे. एका गावातल्या मुलांना तो म्हणाला, तुमच्यापैकी कोण वेगात धावतो बघू. इथून त्या झाडापर्यंत धावायचे, जो पहिला तिथे पोहोचेल त्याला मी बक्षीस देईन. ती सर्व पोरे धावली पण एकमेकांना सोबत घेऊन. जो मागे पडला, त्याला बाकीच्यांनी हात धरून पुढे नेला. त्या झाडाशी सगळे एकत्र पोहोचले आणि मग त्यांनी जल्लोष केला.
पाहुणा या प्रकाराने थक्क झाला. तिथल्या थोरांनी पोरांचे वागणो समजावून सांगितले. ‘उबुन्टु’ हे त्यांचे तत्त्व होते. उबुन्टुचा अर्थ आहे, ‘आम्ही सारे आहोत म्हणून माङो अस्तित्व आहे.’ (आय अॅम, बिकॉज वी आर.)
आपण शाळेत काय शिकतो? एकमेकांना आपण गणित कसे सोडवले हे दाखवू नका, आपली चित्रंची वही सुध्दा दाखवू नका. परीक्षेत नेमके कोणत्या भागावर काय प्रश्न येणार हे जर आधी समजले तर कोणाला सांगू नका. सगळे एका दिशेला तोंड करून बसा. एकमेकांशी बोलू नका. तू एकटाच पहिला आला पाहिजेस. जो पहिला येणार नाही, तो कमनशिबी, त्याचे आयुष्य कुचकामी. आपण पुढे जाणो, बाकीच्यांचा विचार न करणो. तू तुझं तुझं बघ.
शाळेत असे शिकून आपण पुढे जातो. नोकरीसाठी मुलाखती, परीक्षा, स्पर्धा असे सगळे करतो. एकटे एकटे. सगळ्यांना मागे टाकून पुढे जातो. आणि मग पळत्या गाडीच्या मागे लागलेल्या कुत्र्यांसारखे होते. त्या गाडीपर्यंत पोहोचल्यावर कुत्रे गोंधळतात, तसे आपले होते. सगळ्यांना मागे टाकून जिंकल्यावर ते जिंकणो कुणासाठी हेच कळेना होते.
अशीच शिकलेली माणसे सरकारात बसतात. नागरिक म्हणून सरकारच्या दाराशी तिष्ठत राहणारेही हेच शिकलेले असतात. पाडगावकर उदासबोधात म्हणतात तसे ‘एक हात गांडीवर ठेवून दुस:या हाताने सलाम’ ठोकतात. मागून लाथ बसू नये या काळजीने हात तिथे ठेवायचा, समोर झुकायचे. अनेक शासकीय अधिकारी आपल्या खालच्या कर्मचा:यांवर सतत डाफरत असतात, तोंडाचा पट्टा चालत असतो, अपमानाचा बोनस वाटत असतात. हेच अधिकारी त्यांच्या वरचा अधिकारी आला की, इतके वाकतात की यांना कणा आहे यावर विश्वासच बसू नये. यांचे असे का होते? यांना दोन्ही वेळा मृदू आणि ताठ का राहता येत नाही? कारण त्या व्यवस्थेची घडण आणि माणसांचीही घडण ब्रिटिश राज्यात असल्यासारखी झाली आहे. एकटय़ाने पुढे जायचे आणि बाकीच्यांना दाबायचे. चळवळीचा कार्यकर्ता म्हणून सतत शासनाशी संबंध येतो, त्यामुळे मला हे उदाहरण स्पष्टपणो द्यावेसे वाटले. इतके बटबटीत नसेल, पण अशीच नाती कॉर्पोरेट जगातही असतात. मग तिथे टीम बिल्ंिडग, ट्रस्ट बिलिं्डग अशी ट्रेनिंग घ्यावी लागतात. कारण धंद्यावर, नफ्यावर माणसांच्या आपापसातल्या बिघडलेल्या नात्यांचा परिणाम होत असतो. शासनाच्या धंद्यावरही असा परिणाम होतच असतो. चोरांची सद्दी वाढते, त्यात आपापसात आणि जनतेशी वागण्याच्या या पद्धतींचा मोठा भाग आहे. म्हणूनच लोकाभिमुख शासन करायचे, तर ही वृत्ती हळूहळू का होईना बदलणो भाग आहे.
खासगी धंदेवाईक जसे नफ्यासाठी कर्मचा:यांची प्रेरणा टिकवण्याचे, त्याला आपली कंपनी ‘आपली’ वाटण्याचे, कंपनीचा नकळत अभिमान वाटू लागेल असे अनेक प्रयोग करत असतात. यात नकळत ‘आपण सारे एकत्र पुढे जाऊ’ हीच भावना रुजवण्याचा प्रयत्न असतो. मॅक्सम्यूलर भवन या जर्मन शिक्षण संस्थेत शिकताना आमच्या वर्गात हॉटेलातल्या सारखी गोल टेबले आणि त्याभोवती चार-पाच जण अशी बसण्याची रचना असे. सर्वांनी मिळून, एकमेकांचे पाहून, एकमेकांना मदत करून शिकायचे अशीच तिथली रीत होती. दुस:याला मदत करताना आपला विषय अजून पक्का होतो, अशी त्यांची धारणा होती. ‘विद्याधन दिल्यामुळे वाढते’ असे आपण फक्त सुभाषितात म्हणतो, आचरणात आणत नाही.
आपल्या देशातला बहुसंख्य वर्ग अजूनही एकाच दिशेला तोंड करून ‘एकमेकांना मदत करू नका’ असे घोषवाक्य असलेल्या शिक्षणव्यवस्थेत तयार होतो आहे. ‘शासन’ या एकाच इंडस्ट्रीशी या वर्गाचा संबंध येतो आहे. त्यांच्या आकांक्षाही ‘एकटय़ाने पुढे जाणो हाच पुरुषार्थ’ अशा आहेत. पूर्वी धर्माच्या कामात सर्वजण एकत्र येत. तिथे आपपरभाव बाजूला ठेवला जाई. राजस्थानात मोठमोठे तलाव लोकांनी बांधले. तलावाच्या कामात लागणारी कौशल्ये वेगवेगळ्या लोकांकडे विभागलेली होती, त्यांचा मान लोकांनी ठेवला. पिढय़ान् पिढय़ा हे तलाव स्वच्छ राखले. त्यातल्या पाण्यावर गावांचे जीवन वाळवंटातही सुखाने चालले. या तलावांच्या काठावर देव बसवलेले आहेत. जणूकाही हे देवानेच बांधले. ‘तेरा तुझको अर्पण’ अशी भावना आरतीत व्यक्त केली जाते, ती लोकांनी प्रत्यक्षात आणली. स्वत:चा मोठेपणा केला नाही. असे देवाच्या नावावर असणारे, पण लोकश्रमाने बांधलेले तलाव कोकणात, गोव्यातही आहेत.
पूर्वी कुटुंबाचा एक फोन असे. तोही आता गेला आहे. सर्वांची तोंडे आणि रेंज वेगवेगळ्या दिशेला अशी आपली कुटुंबे आहेत. ‘अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम, उदारचिरतानां तु वसुधैव कुटुंबकम’ (हा माझा, तो परका असा भेद कमी बुध्दीचे लोक करतात, उदार मनाच्या लोकांना मात्र सारी धरती हेच एक छोटे कुटुंब वाटते.)
- ही थिअरी आपल्याला पाठ आहे, पण प्रॅक्टिकलमध्ये मात्र घटते गुण आहेत. जे आपल्यापुरतेच बघतात त्यांना कमी बुध्दीचे न मानता आपण रोल मॉडेल मानतो आहोत.
जगाचे कल्याण, पर्यावरणाचे जतन, भारतीय संस्कृतीचा ठेवा - या सगळय़ा गोष्टी गेल्या समजा तेल लावत, पण नफ्याच्या मागे धावताना सुध्दा एकेकटे पुढे जाणो परवडत नाही. तरीही आपण असे का वागतो? आपल्या उबुण्टूचे काय?
(लेखक ‘वयम्’ या समावेशक विकासाच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत. )