तडफड
By Admin | Updated: April 25, 2015 14:30 IST2015-04-25T14:30:07+5:302015-04-25T14:30:07+5:30
समकालीन वास्तवाची, साहित्यिक-सांस्कृतिक पर्यावरणाची दखल घेणा:या नव्या आणि वेधक पुस्तकांच्या, लेखक-कवींच्या आणि प्रयत्नांच्या परिचय मालेतला हा पहिला लेख

तडफड
- सुनीती नी. देव
'नाटकवाल्यांचे प्रयोग’ हे अतुल पेठे लिखित पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. वेळोवेळी दिलेल्या भाषणांचा, मुलाखतींचा तसेच लिहिलेल्या लेखांचा एकत्रित केलेला संग्रह असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यातून जवळ-जवळ तीन दशकांहून अधिक कालखंड प्रायोगिक रंगभूमीवर व्यतित केलेल्या एका ताकदीच्या नाटय़दिग्दर्शकाचा प्रवास वाचकांना उलगडत जातो.
स्वत:च्या अटींवर जगणा:या पेठे ह्यांचा नाटक हा श्वास आहे, ध्यास आहे. या नाटकांनीच त्यांना जगण्याचे बळ दिले. त्यामुळे नाटक आणि नाटकाशी संबंधित लेखन, अभिनय, दिग्दर्शन त्यांनी केले, करताहेत. हे जरी खरे असले तरी जगण्याचा हा सूर त्यांना चटकन गवसला असे नाही. प्रकृतीला न मानवणा:या गोष्टीही त्यांना काही कालावधीसाठी कराव्या लागल्या. नाटय़ दिग्दर्शनाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही वर्षे त्यांनी स्वत:च लिहिलेल्या नाटकांचे दिग्दर्शन, प्रयोग केले, परंतु कालांतराने त्यातील ‘अपुरेपणा’ जाणवल्यावर इतर लेखकांच्या नाटकांचाही विचार करायला त्यांनी प्रारंभ केला.
‘नाटक टिकायचे असेल तर ते पसरले पाहिजे’ या विचारातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात त्यांनी निवासी कार्यशाळांचे आयोजन केले. प्राथमिक गरजांचीही धड पूर्तता होणो शक्य नव्हते, अशा आडवळणांच्या ठिकाणी स्वत: जाऊन, धडपडत, स्थानिक मुला-मुलींना एकत्रित करून, ‘कार्यशाळेत पाठवा’ म्हणून दारोदारी हिंडून, त्या मुला-मुलींकडून विविध प्रकारच्या गोष्टी त्यांनी करून घेतल्या.
या वेगवेगळ्या कार्यशाळा, त्यातून उभी राहिलेली नाटके करताना पेठे त्यांच्या साथीदारांसह प्रचंड शारीरिक, मानसिक श्रम घेतात. सहका:यांसोबत हसतात, रडतात, करमणूक करून घेतात, पण हाती घेतलेले काम, नैराश्याची क्वचित प्रसंगी आलेली मरगळ झटकून पूर्णत्वाला नेतात.
या कार्यशाळा म्हणजे तरुणाईचा ‘सजर्नशील उत्सव’च होत्या. कार्यशाळांमधून अगदी सहजपणो मूल्यविषयक जाणीव पेठे रुजवितात. उदाहरणार्थ आपापल्या चपला रांगेतच ठेवणो, कार्यशाळेत आपल्याला जेवू घालणारी व्यक्तीदेखील आपल्याएवढीच महत्त्वाची आहे, तिच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करणो, निसर्गाची हानी न करता परिसरातील वस्तूंमधून फुले तयार करणो व त्यानेच सत्कार करणो, स्त्रीचा सन्मान करायला नकळत शिकविणो, जसे नाव सांगताना स्वत:चे, आईचे व आपल्यावर विशेष प्रभाव असणा:या स्त्रीचे नाव सांगणो इत्यादि, इत्यादि. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात ही मूल्ये रुजविलेली असल्याशिवाय या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी कोणीही इतरांर्पयत पोहोचू शकणार नाही. पेठे ह्यांच्या व्यक्तिमत्त्वात ‘समन्वयवादी, स्त्रीवादी आणि मानवतावादी भूमिका’ खोलवर रुजलेली आहे.
चळवळीशी किंवा कोणत्याही विधायक कार्याशी तरुण स्वत:ला जोडून घेत नाही अशी सार्वत्रिक तक्रार असताना पेठे यांचा अनुभव मात्र वेगळाच आहे. त्यांच्या कार्यशाळांमध्ये तरुण/तरुणी सामील होतात. त्यांनीच गाणी लिहायची, ‘नाटुकल्या’ लिहायच्या, पेठे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सादरही करायच्या. पेठे यांचा तरुणाईवर प्रचंड विश्वास आहे. तरुणाई त्यांची पुंजी आहे.
पेठे यांचे वैशिष्टय़ असे की ‘भाडोत्री’ नट घेऊन नाटक न बसविता स्थानिक मुला-मुलींमधूनच ते नाटक उभे करतात. त्यासाठी अक्षरश: दमछाक होईल इतकी मेहनत घ्यावी लागते. पण त्याला पेठे ह्यांची तक्रार नाहीच मुळी! ते कष्टांचा डोंगर उपसायला तयार आहेत. त्याच्या जोडीला ‘वाचिक अभिनया’वर व्याख्याने, ‘रंगभूषा’ कार्यशाळा घेणो, व्यायामाचे धडे गिरवून घेणो इत्यादि बाबीही ते करतात. ‘दलपतसिंग येती गावा’, ‘सत्यशोधक’, अलीकडील ‘रिंगणनाटय़’ अशी कितीतरी नाटके पेठे ह्यांनी अक्षरश: दिवस-रात्र मेहनत घेऊन उभी केलेली आहेत. ते वर्णन मुळातूनच वाचायला हवे. ‘दलपतसिंग येती गावा’चा प्रयोग पाहिल्यावर मेधा पाटकर म्हणाल्या, ‘आमच्या शंभर भाषणांनी होत नाही ते काम तुमच्या एका नाटकाने होतं.’ (पृ. 143)
मनात प्रश्न येतो की ‘एवढे प्रचंड परिश्रम घेऊन पेठे नाटके का करतात?’ ह्याचे एकमेव उत्तर म्हणजे नाटय़कला ही एक ‘म्युङिाअम आर्ट’ बनू नये ही त्यांची ‘आंतरिक तळमळ’, ‘आंतरिक तडफड’ आहे. त्यासाठी ते स्वत: मेहनत घेतात व तरुणाईला त्यात सामील करून घेतात.
ज्येष्ठ नाटककार सत्यदेव दुबे एकदा म्हणाले, ‘..इस तरह के पागल लोग सिर्फ मराठी थिएटर मे ही पैदा होते है.’ (पृ. 116) - असा ध्यास, असे वेड असल्याशिवाय कामे उभी राहात नाहीत.
असे असूनही वाईट ह्याचे वाटते की पेठे यांच्यासारख्या योग्यतेच्या व्यक्तीचे असे ‘शोषण’ व्यवस्थेने का करावे? कामासंबंधातल्या मूलभूत सोयींसाठीही कष्ट उपसावे लागावेत? - त्यांच्यातील सर्वच क्षमतांचा, सजर्नशीलतेचा हा अपव्यय आहे.
कधी कधी एका नाटकातून पूर्णपणो बाहेर आल्यावर जाणवणारे ‘रितेपण’ घालविण्यासाठी पेठे ह्यांनी ‘आंतरपीकपालट’ही केले. कधी कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम, कधी आकाशवाणीवर एखाद्या कादंबरीचे क्रमश: अभिवाचन तर कधी दृष्टिहिनांसाठी नाटकांचे ब्रेलभाषेमध्ये रूपांतर!
समाजातील वाईट गोष्टींवर पेठे सडकून टीका करतात, परंतु त्याचबरोबर समाजात आढळलेली, अनुभवलेली संवेदनशीलताही तेवढय़ाच कृतज्ञतेने टिपतात अन् नोंदवतात. ‘अजब अनुभव’ या प्रकरणात समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील व्यक्ती आपणहून आर्थिक सहकार्य करण्यास कशा पुढे आल्यात हे पेठे ह्यांनी लिहिले आहे. एका व्यक्तीने आई गेल्यावर तिच्या ‘दिवसांसाठी’ खर्च न करता ‘पेठे स्कूल’ला मदत दिली, तर एका व्यक्तीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भावाने ठेवलेली दहा हजारांची रक्कम पेठे ह्यांच्या सुपूर्द केली. हे अनुभव वाचताना आपलेही डोळे पाणावतात. लोक इतक्या उत्स्फूर्तपणो मदत करतात, याचे कारण म्हणजे पैशांचा विनियोग योग्य रीतीनेच होणार हा विश्वास पेठे ह्यांनी कमावला आहे. पेठे चोख हिशेब देतात. मला बाबा आमटे ह्यांचे एक वाक्य राहून राहून आठवते आहे, ‘पीपल टेस्ट यू, बिफोर दे ट्रस्ट यू.’
पेठे ह्यांची जवळ-जवळ सर्वच नाटके ही जगण्याशी तसेच भेडसावणा:या सामाजिक प्रश्नांशी संबंधित असलेली दिसतात. किंबहुना नाटक निवडीमागील पेठे ह्यांची ती पूर्वअटच असते. पेठे ह्यांचे सामाजिक भान ह्यातून दिसून येते. ‘सत्यशोधक’ हे नाटक आजही महात्मा फुलेंच्या विचारांची प्रस्तुतता अधोरेखित करते, ‘दलपतसिंग येती गावा’ सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार आणि त्याची खोलवर रुजलेली पाळेमुळे यावर प्रकाश टाकते, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ सॉक्रेटिस, त्याचे तत्त्वज्ञान, ते सांगण्याची पद्धत यावर भाष्य करते. त्यांचे माहितीपटही ह्याला अपवाद नाहीत. उदाहरणार्थ ‘कचराकोंडी’ हा माहितीपट एका वेगळ्याच वास्तवाकडे लक्ष वेधतो.
पेठे ह्यांची मराठी भाषेवरील हुकमत मोठी वेधक आहे. काही वाक्ये तर सुभाषितवजा वाटावी अशी आहेत.
‘खरी कला जगण्यापासून वेगळी करता येत नाही, जगण्यात ती मुरलेली असते’,
‘चांगले साहित्य माणसाला अस्वस्थ करून शहाणपणाच्या वाटेवर नेण्याचे काम करते’
- केवळ वानगीदाखल ही काही वाक्ये!
एक मात्र सुचवावेसे वाटते, पेठे ह्यांनी नाटक आणि त्याच्याशी संबंधित वा पूरक असे जे जे उपक्रम राबवले त्यांची कालक्रमानुसार सूची कोठेतरी यायला हवी होती. ती असती तर ‘एका दृष्टिक्षेपात’ पेठे ह्यांनी रंगभूमीला दिलेले योगदान वाचकांसमोर ठळकपणो आले असते. सबंध पुस्तकभर ती माहिती विखुरलेली आहे.
नाटकाच्या, दिग्दर्शनाच्या क्षेत्रत येणा:या तरुण पिढीसाठी पेठे ह्यांचे हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल, हे नक्की!
संघर्ष आणि सुधारणा
एकीकडे व्यवस्थेतील उणिवांचे दिग्दर्शन करतानाच पेठे त्या व्यवस्थेत बदल कसा करता येईल हेही पाहतात व त्याही पातळीवर विनातक्रार काम करतात.
उदाहरणार्थ कार्यशाळा जेथे घ्यायची तेथे संडास आहेत का? असलेच तर कोणत्या स्थितीत आहेत? ते अस्वच्छ असतील तर स्वत: संडास सफाईचे काम करणार. (‘संडास संस्कृती’ हे प्रकरण जरूर वाचावे.) महात्मा जोतिबा फुले यांच्याप्रमाणो एकीकडे व्यवस्थेशी संघर्ष आणि दुसरीकडे व्यवस्थेत सुधारणाही पेठे ह्यांनी केल्या.
(लेखिका विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी मासिक ‘आजचा सुधारक’च्या माजी संपादक आणि
विश्वस्त आहेत.)
पुस्तकाचे नाव : नाटकवाल्यांचे प्रयोग
लेखक : अतुल पेठे
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
किंमत: 220 रुपये