सच्चा देशभक्त
By Admin | Updated: May 24, 2014 13:11 IST2014-05-24T13:11:50+5:302014-05-24T13:11:50+5:30
अफाट ज्ञान, प्रकांड पांडित्य, कमालीची विद्वत्ता आणि तरीही विनम्र थोर स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सतत २0 वर्षे सहकारमंत्री या नात्याने आणि शिवाय विधानसभेचे अध्यक्ष म्हणून १0 वर्षे ऐतिहासिक कामगिरी व महत्त्वाची पदे भूषविल्यानंतरही कमालीचं साधेपण.

सच्चा देशभक्त
- उल्हास पवार
अफाट ज्ञान, प्रकांड पांडित्य, कमालीची विद्वत्ता आणि तरीही विनम्र थोर स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सतत २0 वर्षे सहकारमंत्री या नात्याने आणि शिवाय विधानसभेचे अध्यक्ष म्हणून १0 वर्षे ऐतिहासिक कामगिरी व महत्त्वाची पदे भूषविल्यानंतरही कमालीचं साधेपण. याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे वैकुंठवासी बाळासाहेब भारदे (दादा).
त्यांच्याच शब्दात सांगायचं म्हणजे त्यांचं जीवन प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे, म्हणजे ते नेहमी म्हणत पांढर्याशुभ्र, लोभस अशा पाकळ्या आणि केशरी देठ म्हणजे वैभव आणि वैराग्य एकत्र नांदणारं फूल असं माणसाचं जीवन असावं. हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. त्यांचा मला जवळजवळ ३५ वर्षे सहवास लाभला आणि त्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप काही शिकता आलं. गांधी विचाराचे व्यासंगी भाष्यकार, भागवत संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार, कीर्तनकार, संतवाड्मयाचे व्यासंगी, थोर विचारवंत, उत्तम लोकप्रिय वक्ते, अर्थपूर्ण शाब्दिक कोट्या, र्ममभेदी विवेचन आणि विनोद शैली याचं एक आकर्षक मिश्रण असलेलं व्यक्तिमत्त्व. आज त्यांच्या या शताब्दी वर्षामध्ये त्यांचं स्मरण करीत असताना असंख्य आठवणींची गर्दी माझ्या मनामध्ये आहे. नेमकं काय सांगावं, असा थोडासा संभ्रम निर्माण होतो.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुका. त्या प्रचार सभांमधली विविध पक्षांच्या नेत्यांची भाषणं या पार्श्वभूमीवर भारदे साहेबांच्या काळात झालेल्या निवडणुकांसंबंधी त्यांनी सांगितलेल्या आठवणी याचं चिंतन केल्यानंतर त्यामध्ये किती अर्थानं बदल झालाय, नेमकं राजकारणानं कोणतं वळण घेतलंय आणि मग असं वाटतं स्वत: भारदेसाहेब चार वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रत्येक वेळी प्रचंड मतांनी निवडून आले. त्या वेळी महात्मा गांधींचा विचार, पंडित जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि त्या प्रभावातील अनेक नेते यांच्या नेतृत्वाखाली जात, धर्म, पंथ, भाषा या सर्वांच्या पलीकडे कॉँग्रेसचा एक कार्यकर्ता, उमेदवार एवढीच ओळख लोकांना पुरेशी होती. निवडणुकीत अतिशय कमी खर्च होई. लोक खर्च करायचे, आपापले जेवण घेऊन येत, सायकलवर-पायी किंवा बैलगाडीतून येऊन निष्ठेनं आणि श्रद्धेनं धावणारा कार्यकर्ता या सर्वांच्या बळावर मी कोणत्या गावचा, कोणत्या भागात उभा आहे, माझा धर्म, माझी जात कोणती, माझ्याजवळ किती पैसे आहेत हे सर्व प्रश्न गौण असत. आणि म्हणूनच त्या वेळी आम्ही प्रचंड मतांनी निवडून येत होतो. आता काळ बदलला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं तर अवघडच; परंतु नेमकी हीच आव्हानं समोर उभी राहिली आहेत, हे प्रकर्षानं जाणवतंय. गांधींनी विविध मार्गांनी देश एकत्र जोडला. मानवधर्माचा पुरस्कार केला. भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व ही संकल्पना जोपासली आणि संपूर्ण देश एका धाग्यामध्ये गुंफला. सत्य, अहिंसा, शांतता, बंधुभाव, नैतिकता, चारित्र्य ही जीवनाचं सूत्रं ठरली. बदलत्या काळात भारदे साहेबांचं स्मरण करत असताना आज आम्ही सर्व कुठं आहोत, देशाचं ऐक्य, अखंडत्व, सार्वभौमत्व, धार्मिक सहिष्णुता, दलितोद्धार आणि अंत्योदय याला धक्का तर पोहोचत नाही ना, अशी शंका क्षणाक्षणाला निर्माण होणार्या घटना आणि राजकारणातल्या जीवघेण्या तडजोडी पाहिल्या म्हणजे निर्माण होते. गांधींनी अस्पृश्यतानिवारणाचं काम आयुष्यभर केलं. या देशाच्या सर्वोच्च पदावर जेव्हा दलित, वंचित व्यक्ती विराजमान होईल, तो माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण असेल, अशी गांधींची आठवण दादा नेहमी सांगत असत. आज ग्रामीण भागातून दलितांवर होणारे अन्याय पाहिले, की मन विदीर्ण होतं. शेवटी-शेवटी गांधींनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. विशेष म्हणजे, वधू-वरांच्या जोडप्यांपैकी एक दलित असावा, हा त्यांचा आग्रह होता. किंबहुना, अशाच विवाहाला मी येईन, असं गांधी सांगत आणि त्याप्रमाणे कृती करीत. स्वत: दादांच्या घरात आंतरजातीय विवाह झाले. त्यांची एक सून ख्रिश्चन होती. एक नातसून दलित आणि एक नातजावई दलित. या सर्व विवाहांना मी स्वत: उपस्थित होतो. हे इतक्या सहजपणे घडलेलं मी फार जवळून पाहिलं. त्यांच्या नातीच्या लग्नाचा स्वागत समारंभ. माझ्या शेजारी एक थोर नेते बसले होते. त्यांना मी सहज म्हणालो, की हा दादांचा नातजावई दलित आहे. त्यांना एकदम आश्चर्य वाटलं, की दादांनी हे कधी मला सांगितलंच नाही. याच्यासंबंधी दादा बोलताना असं म्हणाले, की कोणताही आंतरजातीय विवाह इतक्या सहज घडावा, की आपण विशेष काही केलं आहे, असं कुणालाही वाटू नये. त्याचं कारण म्हणजे दुसर्या जातीवर आपण उपकार करतोय, कमी लेखतोय, असाच त्याचा अर्थ ध्वनित होतो आणि म्हणून सामाजिक अभिसरण हे शरीरातल्या रक्ताभिसरणाप्रमाणे सहज घडलं पाहिजे. शरीरातील रक्ताभिसरण कुठं स्तब्ध झालं, खुंटलं तर शरीर विकलांग होतं. तसंच समाजपुरुष सहजपणे उभा राहायचा असेल, तर सामाजिक अभिसरणसुद्धा याच गतीनं झालं पाहिजे, असं माझं आग्रही प्रतिपादन आहे आणि म्हणून आम्ही या आंतरजातीय विवाहाचा कधीही आत्मप्रौढीनं उल्लेख करीत नाही. हे ऐकल्यावर दादा म्हणजे गांधी आचार-विचारांचं मूर्तिमंत प्रतीक ही त्यांची प्रतिमा आजही माझ्या मनात आहे. एवढंच काय गांधीजींच्या आदेशाप्रमाणे १९३७मध्ये त्यांनी स्वत:चा विवाह कुठलाही खर्च न करता नोंदणी पद्धतीने केला. सामाजिक भान ठेवून असं जीवन जगणारे दादा अलीकडच्या काळात विवाह आदी सोहळ्यांमध्ये संपत्तीचं होणारं ओंगळ दर्शन, सत्तेच्या पदांवर असलेल्यांचा उन्मत्तपणा, सामाजिक बेफिकिरी, जातिनिष्ठ राजकारण-समाजकारण पाहून व्यथित होत असत. गांधींच्या स्वप्नातील हा भारत नाही, असं ते म्हणत आणि अगदी वयाची नव्वदी ओलांडली, थकलेपण आलं तरीही त्यातूनही उभारी घेऊन म्हणत, ‘अजून काही बिघडलेलं नाही, आपल्याला पुन्हा भारत नवीन उभा करता येईल. गांधींचं स्वप्न साकार करता येईल. आपण करू.’ हे त्यांचं वाक्य ऐकलं, की असं वाटायचं, दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, आत्मबल म्हणजे काय याचं मूर्तिमंत सळसळत चैतन्य आपल्यासमोर आहे, याची साक्ष पटायची. आजच्या लोकशाहीचं वर्णन करताना दादा म्हणत, ‘नेते सुखासीन आणि लोक उदासीन.’ केवढं विदारक सत्य. दादा आयुष्यभर स्थितप्रज्ञ वृत्तीनंच वागले. ना खंत- ना खेद असंच त्यांचं आयुष्य होतं. त्यांना कधीही रागवलेलं, चिडलेलं मी पाहिलं नाही. ज्यांनी त्यांना त्रास दिला, त्यांच्याबद्दल कधीही एक चकार शब्द बोलले नाहीत अथवा द्वेष केला नाही. खादीचं धोतर, खादीचा नेहरू शर्ट, खादीची गांधीटोपी, तुकतुकीत कांती, प्रसन्न चेहरा, मिस्कील हसणं आणि सदैव उत्साह असे दादा आजही माझ्या डोळ्यांसमोर साक्षात उभे आहेत, असाच मला भास होतो. उर्दू भाषेतला एक सलाम त्यांना बरोबर लागू होतो. तो खालीलप्रमाणे-
सलाम उनपर जो बादशाहीमें फकिरी करते थे।
सलाम उनपर जो गालियॉँ खाकर दुवाएॅँ देते थे।।
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका ही लोकशाहीची पवित्रं मंदिरं आहेत. जनताजनार्दन ही तेथील देवता आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे या देवतेचे पुजारी आहेत. जनताजनार्दनाच्या कल्याणाची साधकबाधक चर्चा म्हणजे लोकशाहीचा संवाद आणि जनतेची सेवा हीच त्या देवतेची पूजा, या श्रद्धेनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पण, आजचा लोकप्रतिनिधी कसा आहे? यासंबंधी दादा म्हणत, ‘लोक म्हणजे लोकांशी संपर्क नसलेला, प्रति म्हणजे भिंतीवरच्या प्रतिमेसारखा आणि निधीची काळजी करणारा, असा लोक-प्रति-निधी.’ हे विदारक सत्य आज अनुभवाला येत आहे. शेवटपर्यंत आपल्या तत्त्वांशी कुठलीही तडजोड न करता जीवननिष्ठा सांभाळणारा गांधी विचारांचं आचरण करणारा आणि शेवटच्या क्षणापर्यंत समाज घडवण्याची इच्छाशक्ती बाळगणारा एक साधक या नात्यानं त्यांच्या पवित्र स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि सुजलाम्-सुफलाम्, विविधतेतून एकतेचं दर्शन घडवणारा भारत निर्माण करण्याची प्रेरणा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना मिळावी, ही विनम्र प्रार्थना.
(लेखक माजी आमदार आहेत.)