सच्चा संगीततज्ज्ञ

By Admin | Updated: August 30, 2014 14:33 IST2014-08-30T14:33:36+5:302014-08-30T14:33:36+5:30

नाशिकचे श्रीधर हरी ऊर्फ बाळासाहेब देशपांडे हे विविध भाषांचे जाणकार व संगीततज्ज्ञ होते. त्यांनी संगीतविषयक पुस्तकांचे लेखनही केले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष ६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचे केलेले स्मरण..

True musicologist | सच्चा संगीततज्ज्ञ

सच्चा संगीततज्ज्ञ

 अ. पां. देशपांडे

साहित्य, संगीत, मार्क्‍सिझम, मराठी-इंग्रजी, संस्कृत-उर्दू अशा भाषांचे जाणकार आणि इतिहास, अर्थशास्त्राचे चोखंदळ अभ्यासक श्रीधर हरी ऊर्फ बाळासाहेब देशपांडे हे नाशिकचे ५५ वर्षे रहिवासी होते. ३ एप्रिल, १९९९ रोजी त्यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. २0१४ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. 
बाळासाहेब भोर संस्थानातील शिरवळचे. वडील हरी सखाराम देशपांडे भोरच्या पंतसचिवांचे सल्लागार होते. बाळासाहेबांचे प्राथमिक शिक्षण शिरवळला, माध्यमिक शिक्षण वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्याला झाले. नंतर पुण्यात ते मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरीला असताना त्यांची देवळालीला बदली झाली. आता अशा बदल्या सतत होणार, हे ओळखून त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि नाशिकला खासगी कंपनीत नोकरीला लागले. दरम्यान, विमा कंपन्यांचे सरकारीकरण झाल्याने बाळासाहेब सरकारी नोकर झाले. तेथून ते १९७२ मध्ये नवृत्त झाले.
वाईला शाळेत शिकत असताना ते तबला वाजवायला शिकले, पण नंतर पुण्याला आल्यावर त्यांनी अवघे संगीतच आपले विश्‍व मानले. 
बाळासाहेब पुण्यात त्यांचे थोरले बंधू आयुर्वेदाचार्य पांडुरंगशास्त्री देशपांडे यांच्याकडे राहत असताना पांडुरंगाशास्त्र्यांचे संगीतातील गुरू, किराणा घराण्याचे सुरेशबाबू माने, त्यांची बहीण हिराबाई बडोदेकर, 
शिष्य वसंतराव देशपांडे अशांबरोबर बाळासाहेबांचा परिचय झाला.
पुढे बाळासाहेब नाशिकला स्थायिक झाल्यावर १९५0 मध्ये कुसुमाग्रजांच्या पुढाकाराने लोकहितवादी मंडळ सुरू झाले ते मोगूबाई कुर्डीकर यांच्या गायनाने. हे गाणे बाळासाहेबांच्या ओळखीनेच ठरले. बाळासाहेबांचे थोरले बंधू चार्टर्ड अकाउंटंट व संगीतज्ज्ञ वामनराव देशपांडे हे मोगूबाईंचे शिष्य होते. १९५४ ला नाशिकमध्ये एक संगीत महोत्सव झाला. त्यात केसरबाई केरकर, मल्लिकार्जुन मन्सूर, हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल, नर्तिका सितारादेवी, बिस्मिल्ला खान, भीमसेन जोशी, माणिक वर्मा व अखेर वसंतराव देशपांडे व पु. ल. देशपांडे यांचे कार्यक्रम झाले. या सर्वांशी बाळासाहेबांचे स्नेहाचे संबंध होते. बाळासाहेब हयात असेपर्यंत नाशिकमधील कोणतीही गायनाची बैठक त्यांच्या हजेरीशिवाय पार पडली नाही. कुमार गंधर्व आणि भीमसेन जोशी नाशिकमध्ये आल्यावर बाळासाहेबांची गाठ घेतल्याशिवाय जात नसत. संगीतावर चर्चा करण्याएवढे बाळासाहेबांचे वैचारिक योगदान होते. 
१९९0 मध्ये एक पुस्तक वाचत असताना लाचारी तोडी या रागाचे नाव मी वाचले होते. मग बाळासाहेबांना मी पत्र लिहिले. त्यावर त्यांनी कळवले, की तोडी या रागाशी लाचारी तोडीचा संबंध नाही. तोडीमधील कोमल रिषभ, गांधार आणि घैवत यातील गांधार आणि घैवत हे लाचारीमध्ये कोमल आणि शुद्ध झाले आहेत. शिवाय निषांदही कोमल होतो. त्यामुळे तिला तोडीचे स्वरूप न राहता लाचारी तोडी  हा एक वेगळाच मिश्र राग बनतो. मग त्या रागाचे लाचारी हे नाव असण्याचे कारण काय? तोडीशी हा राग मराठीतील ेषाप्रमाणे लाचारीसुद्धा करीत नाही. नाही म्हणायला एक तर्क संभवतो तो असा, की लौ या उपसर्गाचा उर्दूमधील अर्थ नाही असा होतो. (उदा. लाजबाब) त्यानुसार तोडीमध्ये चलन न करणारा राग असा त्याचा अर्थ होईल.
कुसुमाग्रज, साहित्यिक बा. वा. दातार, पाणितज्ज्ञ बापू उपाध्ये, बाबासाहेब टकले, दादासाहेब पोतनीस, चित्रकार बाळासाहेब काळे यांच्याबरोबरच्या स्नेहाचे  बाळासाहेबांनी कधी भांडवल केले नाही. प्रसिद्धिपराङमुखता हा त्यांचा विशेष पैलू होता. 
बाळासाहेबांनी आरन कोपलंडच्या ‘म्युझिक अँड इमॅजिनेशन’ या पुस्तकाचे भाषांतर ‘संगीत आणि कल्पकता’ या नावाने, वामनराव देशपांडे यांच्या  ‘महाराष्ट्राज कॉन्ट्रीब्यूशन टू म्युझिक ’चे मराठी भाषांतर ै‘महाराष्ट्राचे संगीतातील कार्य’ या नावाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला करून दिले होते. केले होते. डॉ. अँथनी स्टोर यांच्या ‘म्युझिक अँड माइंड’ या पुस्तकाचे ‘संगीत आणि मनोविज्ञान’ या नावाने भाषांतर  केले होते. 
शेक्सपियर आणि जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या नाटकांचे त्यांनी भाषांतर केले होते. कालिदासाच्या मेघदूत आणि रघुवंशाचे त्यांनी मराठीत भाषांतर केले होते. त्यांचा उर्दूचाही  व्यासंग मोठा होता. त्यांचा स्वभाव नर्मविनोदी होता. इतरांचे ते पूर्णपणे ऐकून घेत व मग त्यांचे मत ते व्यक्त करीत.
अशा या महनीय संगीततज्ज्ञाचे व संगीतक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण निश्‍चितच औचित्यपुर्ण व  इतरांसाठी  प्रेरणादायी ठरावे. 
(लेखक मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आहेत.)

Web Title: True musicologist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.