शिक्षणाची खरी ओळख

By Admin | Updated: July 12, 2014 14:58 IST2014-07-12T14:58:54+5:302014-07-12T14:58:54+5:30

शाळेला गावाच्या सर्वांगीण विकासाचे ऊर्जाकेंद्र, शक्तिस्रोत बनवण्यासाठी धडपडणारेही काही असतात. गावातील राजकीय पक्षोपक्षीय आणि गटातटाचे राजकारण दूर सारून अशी शाळा सार्‍यांना एकत्र आणते. गावकर्‍यांच्या औदार्याचा आणि संघटित शक्तीचा रचनात्मक कार्यासाठी वापर करते. अशाच एका शाळेविषयी..

The true identity of education | शिक्षणाची खरी ओळख

शिक्षणाची खरी ओळख

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

आमचे सन्मित्र कल्याणराव आणि त्यांचे सहकारी शिक्षक म्हणजे त्यांच्या शाळेचे भूषण आहेत. शाळा गावाचे भूषण आहे आणि शिकणारी मुले या दोन्हींची भूषण आहेत, असे म्हणण्याचे कारण असे, की कल्याणराव आणि त्यांच्या सहशिक्षकांनी शाळेला गावाच्या सर्वांगीण विकासाचे ऊर्जाकेंद्र, शक्तिस्रोत बनविले आहे. ही शाळा गावात राजकीय पक्षोपक्षीय आणि गटातटाचे राजकारण असतानाही सार्‍या गावकर्‍यांना एकत्र आणते. या गावकर्‍यांच्या औदार्याचा आणि संघटित शक्तीचा रचनात्मक कार्यासाठी उत्तम वापर करते. उपेक्षा आणि उदासीनता हा शिक्षणक्षेत्राला मिळालेला शाप या शाळेने पुसून टाकला आहे. गावातली शिक्षण सल्लागार समिती उदासीन नाही. पालक मुलांविषयी उदासीन नाही  आणि आळसावलेल्या प्रशासनालाही या आळसातून, या उदासीनतेतून ते बाहेर खेचतात. या शिक्षकाने गावात शाळा नेली आणि शाळेत गाव आणले. गावातले मतभेद या शाळेने मिटविले. वैर संपुष्टात आणले. अपप्रवृत्ती कमी केल्या. वादापेक्षा संवादावर भर दिला आणि ‘तुम्ही शाळेचे शिल्पकार व्हा आणि आम्ही मुलांचे शिल्पकार होतो,’ हा संदेश या शिक्षकांनी अगदी चुलीपर्यंत नेऊन पोहोचविला. याचेच एक दृश्य उदाहरण म्हणजे शाळेने सुरू केलेले विद्यार्थिकेंद्रित असे नाना उपक्रम. निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, क्रीडा आणि नृत्य. गायन यांसारखे उपक्रम तर या शाळेत होतातच; पण वेगळ्या उपक्रमांवर या शाळेचा विशेष भर असतो. एकदा शाळेतील शिक्षकांनी कल्याणरावांच्या पुढाकाराने सर्व मुलांच्या आयांचा मेळावा घेतला. त्या वेळी मुलांना सुटी दिली. आपल्या मुलाच्या आवडीनिवडी, त्याचा खास गुण वा कलागुण, त्याचे दोष, त्याचे वागणे, घरातील कामातील सहयोग आणि त्याचा अभ्यास यांवर प्रत्येक आईला मोकळेपणाने बोलायला सांगितले आणि त्याला घडविण्यासाठी कुटुंबाने काय केले पाहिजे, शाळेची मदत कशी मिळेल यांवर मोकळेपणाने चर्चा केली. त्याचे सुपरिणामही यथावकाश दिसून आले. जून-जुलैमध्ये दोन-तीन दिवस भरपूर पाऊस पडला. गावामध्ये जागोजागी पाणी साचले. डबकी तयार झाली. त्यामुळे डबक्यात गाव आहे, की गावात डबकी आहेत, हे कळेना. त्यामुळे मलेरियाचे रोगी वाढले. गाव हवालदिल झाला. शिक्षक आणि सर्व मुलांनी शनिवार-रविवारची सुटी पाहून सार्‍या गावातली डबकी बुजवून टाकली. मुलांना घाबरून मलेरियाने पळ काढला. ही मुले एवढय़ावर थांबली नाहीत. जिल्हा परिषदेच्या आणि तालुक्याच्या आरोग्यधिकार्‍यांना पत्र पाठवून दिले. पत्राच्या खाली शेकडो मुलांच्या सह्या पाहिल्या आणि शासनाने सार्‍या गावात फवारणी केली. या घटनेची मुलांनीच बातमी तयार केली. त्यासाठी शिक्षकांची मदत घेतली आणि दिली पाठवून. चार-पाच दिवसांनी ती प्रसिद्ध होताच त्यांनी आनंदाने शाळाच डोक्यावर घेतली आणि लाजलेल्या ग्रामपंचायतीने गाव-स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविले. उँ्र’ ्रि२ ३ँी ऋं३ँी१ ा ३ँी टंल्ल या म्हणीचा प्रत्यय अशा प्रकारे गावकर्‍यांनी घेतला.
त्यापेक्षाही शाळेच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन मुलांच्या मदतीने भरविलेला आठवडे बाजार हा एक अपवादात्मक प्रयोग म्हणता येईल. दर शनिवारी गावचा आठवडे बाजार असतो. परिसरातीलच आठ-दहा गावांतील लोक खरेदी-विक्रीसाठी या बाजाराला येतात. धान्य, भाजीपाला, फळे, मिठाई, रेडिमेड कपडे, किराणा माल, पादत्राणे इथपासून ते खोट्या दागिन्यांपर्यंत अनेक वस्तू विक्रीला येतात. प्रचंड गर्दी असते. प्रचंड विक्रीही होते. कल्याणरावांच्या शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली सभा घेतली. नंतर आठवडे बाजाराची कल्पना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. ज्याच्याकडे मका, ज्वारीपासून ते वांगी, दोडका, मेथी, लसूण, कांदा, मिरची, टोमॅटो असा कोणताही शेतमाल व भाजीपाला असेल, पपई, बोर, पेरू, डाळिंब, केळी इ.सारखी फळे असतील, त्या मुलांनी आपापल्या शेतातील माल बाजारात आणायचा. फक्त ओझ्यापुरती भाऊ वा वडिलांची मदत घ्यायची. ज्यांच्या शेतात विक्रीसाठी काहीच नसेल, अशा विद्यार्थ्यांनी गट करून हॉटेल चालवावे, कुणी भेळेचा गाडा लावावा, कुणी मिठाई विक्री करावी, मुलींनी खेळणी, तयार कपडे, बांगड्या, स्नो-पावडर, हातरुमाल, स्वयंपाक घरात लागणार्‍या किरकोळ वस्तू अशा गोष्टी दुकानात वा हातगाड्यांवर विक्रीसाठी ठेवाव्यात, कुणी वडापावची गाडी ठेवावी, कुणी खेड्यातील बायकांना लागणार्‍या सामानाची विक्री करावी, असे नियोजन केले. गमतीची व नवलाची गोष्ट अशी, की साठ-सत्तर मुलांनी उत्साहाने यात भाग घेतला. उरलेल्या विद्यार्थ्यांनी ग्राहक म्हणून बाजारात यावे. या बाजारातून काय-काय आणायचे, याची एक यादी त्यांनी आई-बाबांकडून तयार करून घ्यावी आणि एकट्याने या वस्तू आपल्या वर्गमित्राच्या दुकानातून घ्यायच्या. वस्तू आणि भाज्या वजन करून देताना एवढी वजने एका दिवसासाठी विकत घ्यायला नको, म्हणून प्लॅस्टिक पिशवीत पाव किलो, अर्धा किलो दगड घालून त्याची वजने तयार केली. दोघा-तिघांत एक तराजू वापरायचा, असे नियोजन केले किंवा टोमॅटो, कांदा, वांगी, लसूण, काकडी यांसारख्या वस्तू अंदाजाने विकायला सांगितले.
या मुलांनी आपला माल स्वत:च बाजारात आणला. एका प्लॅस्टिक कागदावर स्वत:च आकर्षक पद्धतीने मांडून ठेवला. आपल्या मालाची जाहिरात करण्यासाठी ‘ताजी वांगी, गोड काकडी, कोवळी गवार, ताजी जिलेबी, गरम भजी’ असा पुकारा या छोट्या विक्रेत्यांनी जोरजोरात सुरू केला. ‘चला चला, घाई करा. आमच्याकडे तुपातला शिरा’ अशी मजेशीर जाहिरातही मुलांनी सुरू केली. एका मुलाने ‘राजूचा पाववडा। गाव झाला वेडा’ अशी घोषणा सुरू केली. हळूहळू बाजारात गर्दी सुरू झाली. हातात पिशव्या व सामानाची यादी घेऊन हे बालग्राहक कोण काय विकतोय, हे पाहू लागले. मित्राशी बोलू लागले. आपल्या वडीलधार्‍याप्रमाणे खरेदी करताना हुज्जत घालू लागले. कमी भावाने वस्तू मागू लागले अन् त्याचाच वर्गमित्र एखाद्या कसलेल्या दुकानदाराप्रमाणे, विक्रेत्याप्रमाणे ग्राहकाचे समाधान करून आणि थोडीशी सवलत देत मित्राच्या गळ्यात माल बांधू लागले. नेहमीप्रमाणे त्यांच्यातही सुट्या पैशांवरून वादावादी व्हायची. दोन वांगी जादा टाकून प्रश्न संपविला जाई.
शाळेतील शिक्षकांनी सूचना केल्याप्रमाणे विक्रेत्या आणि ग्राहक असलेल्या मुलांच्या पालकांनी काय करायचे? आपला पोरगा शेतमाल कसा विकतो, कसा खरेदी, व्यवहार करतो, पैशांचा व्यवहार कसा बघतो, या सार्‍या गोष्टी देवळात थांबून बघायच्या किंवा दूर झाडाखाली थांबून न्याहाळायच्या. या मुलांनीच लुडबुड न करण्याची तंबी आपल्या पालकांना दिली होती. पुस्तकातलं जग वाचणारी ही पोरं जगाचं पुस्तक उत्तम रीतीने वाचताना पाहून त्यांचे आईबाप हरकून गेले होते. कमालीचे समाधानी झाले होते. आपला पोरगा या फसव्या बाजारात आणि उद्याच्या जगण्याच्या लढाईत नापास होणार नाही, उपाशी मरणार नाही, या साक्षात्काराचा तो आनंद होता. सायंकाळी सात वाजता या मुलांच्या विक्रीचा हिशेब केला. तेव्हा शिक्षकांचे डोळे पांढरे झाले नि पालकांचे डोळे डबडबून गेले आणि मुलांचे डोळे आत्मविश्‍वासाने तेजाळून गेले. शहरातील सधन पालकाला मोठी फी भरून जे व्यवहारज्ञान आपल्या मुलाला देता आले नसते, ते या मुलांनी केवळ सहा तासांत फीशिवाय संपादन केले होते. म्हणूनच मी ‘शब्द आणि विचारांची ओळख, माणसांची ओळख, व्यवहाराची ओळख, निसर्गाची ओळख आणि आत्मसार्मथ्याची ओळख म्हणजे खरे शिक्षण’ अशी एक नवी व्याख्या या शाळेला पाहून तयार केली आहे. 
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: The true identity of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.