प्रचंड धीराची केतकी
By Admin | Updated: August 23, 2014 14:27 IST2014-08-23T14:27:17+5:302014-08-23T14:27:17+5:30
एखाद्या असाध्य आजारात आईच्या शरीराची पडझड पाहणं मुलांसाठी मानसिकदृष्ट्या कोसळवून टाकणारं असतं. सगळं काही माहिती असतानाही अशा वेळी त्याला सामोरं जाण्याचं धैर्य योगसाधनेतून मिळू शकतं. ते मिळवणार्या केतकीची गोष्ट.

प्रचंड धीराची केतकी
डॉ. संप्रसाद विनोद
रात्रभर रडून सुजलेले डोळे, लाल झालेला, गोरा, घामाने डबडबलेला चेहरा आणि हातांचा अस्वस्थपणे चाळा करणारी १६-१७ वर्षांची केतकी रडत, मुसमुसत माझ्याशी बोलत होती. हातातला रुमाल अश्रूंनी पूर्ण भिजला होता. केतकीसोबत तिची आई होती. आईला पोटाचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्याने दोघी खूप अस्वस्थ होत्या. केतकीचे वडील नोकरीनिमित्त दुबईत आणि भाऊ उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्तीवर अमेरिकेत होते. या बाबतीत तिचं स्काइपवर त्या दोघांशी बोलणं झालं. नेहमीचं हसतं-खेळतं कुटुंबच त्यामुळे चिंताग्रस्त झालं.
केतकीची परिस्थिती तर फारच बिकट झाली. तिच्या ४0 वर्षांच्या आईची- गौरीची कर्करोगाने पोखरणारी प्रकृती. घरात ७0 वर्षांची रक्तदाब आणि सांधेदुखी झालेली आजी. कष्टाची कामं करायला घरात पुरुष माणूस नाही. गौरी ही तिच्या आईची एकुलती एक मुलगी. केतकीची आणि तिच्या परदेशातल्या भावाची महत्त्वाची शिक्षणाची वर्षे. नोकरीमुळे वडील भारतात येण्याची शक्यता नाही. कर्करोगाच्या उपचारांवरील लाखो रुपयांचा खर्च. त्यामुळे त्यांनी भारतात येणं व्यवहार्यही नाही. अशा भयानक परिस्थितीचा केतकीसारख्या लहान मुलीला ताण येणं स्वाभाविक होतं.
कर्करोगाच्या कुठल्याही रुग्णाला दिलासा देणं, धीर देणं खूपच कठीण असतं. कारण, हार निश्चित असलेल्या युद्धासाठी सैनिकाला तयार करण्यासारखं ते असतं. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक हतबल झालेले असतात. त्यातले काही जण तर लढणंच सोडून देतात. आर्थिक कारणांमुळे काहींना तसं करणं भाग पडतं. काहींना घरात असा रुग्ण नकोसा वाटतो. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाची सेवा करणं तसं अवघडच असतं. अशा सेवेची किळस वाटते. कंटाळा येतो. मग, भरपूर पगार देऊन एखादी परिचारिका ठेवली जाते. अर्थात, लठ्ठ पगार असणार्यांनाच अशी लक्झरी परवडू शकते.
काही जण उसनं अवसान आणतात. पण, पैशाचं सोंग आणता येत नसल्यामुळे हे सोंग गळून पडतं. आर्थिक ओढाताण असह्य होते. रुग्णाकडे दुर्लक्ष होऊ लागतं. तो नकोसा वाटू लागतो. घरच्या लोकांचं वागणं बदलतं. हा बदल अगतिक, संवेदनशील रुग्णाला जिव्हारी लागतो. त्याचा धीर सुटू लागतो. तो निराश होतो. निराश रुग्णाचा सहवास आणि सेवा आणखीनच त्रासदायक होते.
सुदैवाने, केतकी किंवा तिच्या कुटुंबीयांच्या बाबतीत असं नव्हतं. तिची सत्तरी ओलांडलेली आजी, नात्यातले इतर सर्वजण आणि खुद्द गौरीदेखील खूप सकारात्मक राहिली. केतकीचे काका-काकू, आत्या यांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. केतकीला मात्र कंबर कसून संगणकातील पदव्युत्तर शिक्षण, वेळोवेळी कराव्या लागणार्या गौरीच्या तपासण्या, तिला रुग्णालयात दाखल करणं, तिच्याजवळ जास्तीत जास्त वेळ थांबणं, घरातल्या कामात आजीला मदत करणं, अभ्यास सांभाळून बाहेरची कामं करणं हे सगळं ओळीने दोन-तीन वर्षे करावं लागलं. प्रसंगी, ताण असह्य झाला की ती मला फोन करायची. लहान वयात जबाबदारीने सगळं निभावून नेणारी गुणी आणि हुशार मुलगी म्हणून मला तिचं फार कौतुक वाटायचं. त्यामुळे, तिचा फोन आला की सगळी कामं बाजूला ठेवून मी तिला दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष बोलून धीर द्यायचो. तीही मोकळेपणाने सगळं माझ्याशी बोलायची. परीक्षा फारच जवळ आली की ती आजीवर आणि काका-काकूंवर थोडे दिवस सगळं सोडून शांती मंदिरमधे अभ्यासाला यायची. दिवसभर अभ्यास करायची. आश्चर्य म्हणजे, आजूबाजूला कितीही माणसं असली तरी तिची एकाग्रता कधी भंग पावायची नाही. याचं मला फारच कौतुक वाटायचं. त्यामुळे, प्रसंगी तिला मी चहा, सरबत करून द्यायचो. त्यात मला एक वेगळाच आनंद वाटायचा. काही वेळा, ताण फारच असह्य झाला तर ती माझ्यापाशी येऊन तिचं मन मोकळं करायची. पोटभर रडायची आणि शांत होऊन घरी जायची.
धीर देताना तिला गौरीच्या तब्बेतीविषयी ‘वेडी आशा’ वाटणार नाही याची मी कायम खबरदारी घ्यायचो. ‘प्राप्त परिस्थितीत आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, याबद्दल वैचारिक स्पष्टता ठेवून आनंदाने आपलं काम करत राहावं’ असं दुसर्याला सांगणं सोपं असतं. पण, आपल्यावर तशी वेळ आली तर ते कठीण जाईल याची प्रामाणिक जाणीव ठेवूनच हे मी तिला सांगायचो. समाधानाची गोष्ट अशी, की ती हे सगळं समजून घ्यायची. मनापासून तसं करण्याचा प्रयत्न करायची. नियमित ध्यान, साधना, प्राणायाम करायची. जोडीला आवश्यकतेनुसार आमचं बोलणं व्हायचं. या सगळ्याचा मला खूप फायदा होतोय, असं ती मला आवर्जून सांगायची. संगणक अभियांत्रिकीच्या सर्व परीक्षांमधे विशेष प्रावीण्यासह यशस्वी होणं ही त्याची पावती होती.
तीन वर्षांच्या काळात तिचे वडील, भाऊ जमेल तसं भारतात येत गेले. वडिलांनी खर्चाविषयी, भावाने करिअरवर होणार्या परिणामांविषयी, आजीने तिला होणार्या दगदगीबद्दल, नातेवाइकांनी त्यांना होणार्या त्रासाबद्दल चुकूनही कधी तक्रार केली नाही. केतकीने तर तिच्या वयाच्या मानाने सगळं खूपच धीराने घेतलं.
शेवटी, जे होणार होतं ते झालं. गौरी देह सोडून गेली. केतकीचं सर्वस्व असणारी तिची आई आता तिला पुन्हा दिसणार नव्हती. केतकीवर अक्षरश: आकाश कोसळलं. ती कोलमडली. हताश झाली. पण, काही काळानंतर पुन्हा सावरली.
कर्करोगाने शरीर पोखरलेल्या गौरीच्या चेहर्यावर शेवटी एक शांती होती. या शांतीमागे कुटुंबीयांविषयीची कृतज्ञता आणि आपल्या लाडक्या, गुणी लेकीविषयीचं कौतुक दडलेलं होतं.
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)