तया यातना कठीण
By Admin | Updated: May 31, 2014 16:29 IST2014-05-31T16:29:28+5:302014-05-31T16:29:28+5:30
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कष्ट करावेच लागतात. या कष्टाच्या प्रवासात सुख आणि दु:ख ओघानेच आले; परंतु या दु:खाचे अवडंबर करणे म्हणजे आपल्या साध्यापासून स्वत:ला दूर नेणे होय. त्यामुळे उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यात आपणच अडथळा निर्माण करतो.

तया यातना कठीण
- भीष्मराज बाम
प्रश्न : आयुष्यात कोणते तरी मोठे दु:ख असल्याशिवाय उत्तुंग व्यक्तिमत्त्व घडू शकत नाही काय?
ज्ञानेश्वर महाराज, त्यांची भावंडे या सार्यांना समाजाने संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले. अध्यात्मातली फार मोठी अधिकारी व्यक्ती म्हणून लौकिक झाल्यावरसुद्धा समाजाच्या मनात हा सल होताच आणि त्याचे दु:ख त्या चारही भावंडांना सोबतच घेऊन जावे लागले. संत तुकाराम महाराजांचेसुद्धा तसेच झाले. सर्वांना भक्तिमार्गाची उत्तम शिकवण देणार्या या महात्म्याला व्यवहारी जगात अपमान आणि छळ सोसतच जगावे लागले.
श्री रामकृष्ण परमहंसांचे विश्वविख्यात शिष्य स्वामी विवेकानंद आपल्या आईला आणि एकंदरच कुटुंबामधल्या सार्या व्यक्तींना भोगाव्या लागणार्या हालअपेष्टांबद्दल अतिशय दु:खी असत. जगभर रामकृष्ण मिशनच्या शाखा उभ्या राहिल्या; पण ते आपल्या कुटुंबाच्या विपत्तीसाठी फारसे काही करू शकले नाहीत, हे दु:ख त्यांना होतेच.
जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला, तर ज्या थोर व्यक्तींनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला, त्या सर्वांना वैयक्तिक आयुष्यात दु:खच वाट्याला आल्याचे जाणवते. पराक्रमी राजे, सेनानी, मुत्सद्दी, समाजसुधारक या सर्वांनाच भरपूर दु:ख भोगावे लागले आहे. यामुळे एका युवकाच्या मनात हा प्रश्न उभा राहणे स्वाभाविक आहे. माणूस जेवढा मोठा असेल, तेवढी त्याच्या दु:खाची तीव्रता जास्त असते. निदान त्याच्या चरित्राचा अभ्यास करणार्याला ती तशी असल्याचे भासते.
दु:ख हे सामान्य माणसालाही तेवढय़ाच तीव्रतेने भासते. थोर चरित्रनायकांच्या दु:खाबद्दल आपल्याला जास्त सहानुभूती वाटते. कारण ते आपले कल्पनेतले तरी आदर्श असतात. आपल्याला त्यांच्यासारखे व्हावेसे वाटणे, ही अर्थातच फार चांगली गोष्ट आहे; पण त्यांच्या दु:खाच्या तीव्रतेमुळे आपल्यालाही घाबरे व्हायला होते. मनात सुप्त भीती निर्माण होते की आपल्यालाही असे भोगायला लागेल की काय? सर्वांच्याच वाट्याला दु:ख येतच असते; पण थोर व्यक्तींचा विशेष गुण म्हणजे ते दु:खाच्या तीव्रतेमुळे कोलमडून जात नाहीत. त्यांच्या तितिक्षेचा म्हणजे सहनशक्तीचा दर्जाच वेगळा असतो.
सुखे आणि दु:खे ही इंद्रियांच्या वाट्याला येतात. इंद्रियांच्या ओढीमागे मन फरफटत जाते. सुख हवेसे वाटणे आणि दु:ख अगदी नकोसे होणे हे मनापर्यंतच पोहोचत असते. बाहेरून दिसणारे शरीर हे अन्नमय कोशाचे असते. पुढला प्राणमय कोश इंद्रियांवर सत्ता चालवतो. त्याच्याही पलीकडे मनोमय कोश आहे. तेथपर्यंतच सुख व दु:खाची धाव असते. या द्वंद्वांत आपण गुरफटलो गेलो तर मनाची प्रसन्नता हरवून बसतो. मनोमय कोशाच्या पलीकडे विज्ञानमय कोश आहे. जे तत्त्वज्ञान तुम्हाला रुचत असेल, त्याचे जर चिंतन होत राहिले, तर तुम्ही विज्ञानमय कोशात म्हणजे सुख आणि दु:खांच्याही पलीकडे जाता. मग खरे सत्य, खरी सत्ता काय आहे, ते जाणून घ्यायची ओढ लागते. त्या ओढीने आत्म्याच्या अगदी जवळ असलेल्या आनंदमय कोशात तुम्ही पोहोचता. मग संसारातली सुखे आणि दु:खे तुमच्यावर परिणाम नाहीत करू शकत.
ज्ञानाची आणि तत्त्वचिंतनाची ओढ जशी तुम्हाला आनंदमय कोशात नेऊ शकते, तशीच हाती घेतलेले काम उत्तम प्रकारे पार पाडण्याची ओढसुद्धा नेते. जे थोर, पराक्रमी, विद्वान लोक असतात, ते मनोमय कोशात अडकून पडतच नाहीत. आपल्या कामाची आणि ते उत्तम करण्याची ओढ त्यांना विज्ञानमय आणि याच्याही पलीकडल्या आनंदमय कोशात घेऊन जाते. मग दु:खांची तीव्रता किती असली, तरी ती मनावर परिणाम करू शकतच नाही. आपल्या कार्याचा आनंद त्यांना सतत मिळत राहतो. त्यापुढे सांसारिक सुखे-दु:खेही अगदी तुच्छ वाटायला लागतात.
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासारख्या थोर देशभक्तांना ब्रिटिशांच्या दमन यंत्रणेने तुरुंगात टाकले. लोकमान्यांनी गीतारहस्यासारख्या उत्कृष्ट ग्रंथाची निर्मिती तुरुंगात असतानाच केली. महात्माजींनी तर तुरुंगालाच आपल्या साधनेचे मंदिर मानले आणि तेथूनच स्वातंत्र्याची चळवळ चालू ठेवली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर दोन जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. त्यांनीसुद्धा तुरुंगातूनच उत्कृष्ट काव्य आणि साहित्याची निर्मिती केली आणि देशप्रेमाचे कुंड धगधगते ठेवले.
आपले जे आदर्श असतात, त्यांच्या चरित्रांचे अध्ययन करीत असताना त्यांनी भोगलेल्या मोठय़ा दु:खांसाठी त्यांची कीव करायची नसते, तर ज्या धैर्याने आणि जिद्दीने त्यांनी कठीण परिस्थितीला तोंड देऊन आपले अंगीकारलेले कार्य तडीला नेले, त्या त्यांच्या गुणांचे आदर्श आपल्यासमोर ठेवायचे असतात. मोठी दु:खे आयुष्यात असल्याशिवाय उत्तुंग व्यक्तिमत्त्व घडू शकत नाही काय, याचे उत्तर नि:संशय होय असेच आहे. साधे आयुष्य जगावे म्हटले तरी दु:खे चुकणार नाहीतच. थोर कार्य करणार्या खटाटोपात आणखी मोठय़ा दु:खांना आमंत्रण देऊन त्यांचे स्वागत करावे लागते. जी दु:खे आणि संकटे परमेश्वर आपल्यासाठी पाठवत असतो, त्यातून तो आपली परीक्षा घेत असतो. कठीण प्रसंगांना आणि दु:खांना धैर्याने तोंड देण्याची कुवत आपण दाखवली, तरच तो आपल्यावर आणखी मोठी जबाबदारी टाकतो. व्यक्तिमत्त्व उत्तुंग व्हायला हवे असेल, तर सुख-दु:खांच्या पलीकडे जाऊन मोठी संकटे आणि दु:खे सहज झेलता यायला हवीत. यातना सहन करता येणार नसल्या, तर मोठेपणाची अपेक्षा धरणे चुकीचे ठरेल!
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)