थरार विक्रांतने अनुभवलेला
By Admin | Updated: July 5, 2014 14:41 IST2014-07-05T14:41:26+5:302014-07-05T14:41:26+5:30
‘विक्रांत’ या एका शब्दातच भारतीय नौसेनेचा ‘भीमपराक्रम’ सामावलेला आहे. बांगलादेश मुक्तिसंग्रामात विक्रांतवरच्या आकाशयोद्धय़ांनी अवघ्या चार दिवसांत पाकिस्तानी सैन्याला पळता भुई थोडी करून टाकले होते. अडगळीत पडलेल्या या पराक्रमी विक्रांतचे म्युझियम करण्यासाठी केंद्रशासन सध्या प्रयत्नशील आहे. त्या पार्श्वभूमीवर विक्रांतवरची एक अविस्मरणीय आठवण..

थरार विक्रांतने अनुभवलेला
विनायक अभ्यंकर
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फाळणी अटळ होती आणि विभाजनाबरोबर तत्कालीन सैन्याची वाटणीसुद्धा अपरिहार्य ठरली. या वाटणीत भारताला ३३ युद्धनौका मिळाल्या, तर पाककडे १६ गेल्या. परंतु, विस्तृत पसरलेल्या सागरकिनार्याचे संरक्षण लक्षात घेऊन तत्कालीन भारत सरकारने १९५५च्या सुमारास विमानवाहू युद्धनौका घेण्याचा निर्णय घेताच संसदेत टीका सुरू झाली. हा पांढरा हत्ती भारत सरकार पोसू शकेल का? संरक्षणापेक्षा प्रथम विकास महत्त्वाचा नाही का? हा अवाढव्य खर्च म्हणजे अनुत्पादित गुंतवणूक होय.’ असे किती तरी आक्षेप घेतले गेले. तरीही Defence Verses Developmentच्या वादात न अडकता सरकारने ब्रिटनकडून विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस हक्यरुलीस’ विकत घेतली. ही नौका १२ जुलै १९६१ ला बेलफास्ट बंदरामध्ये हारलंड अँँडल उल्फ या गोदीतून विजयालक्ष्मी पंडित यांनी स्वीकारली. तिचे नामकरण झाले ‘आयएनएस विक्रांत’. ती मुंबईला येताच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिचे स्वागत केले.
‘विक्रांत’ या एका शब्दातच भारतीय नौसेनेचा ‘भीमपराक्रम’ सामावलेला आहे. बांगलादेश मुक्तिसंग्रामात विक्रांतवरच्या आकाशयोद्धय़ांनी (Air Worriers) ५0-५0 उड्डाणे करून चार दिवसांत पाकिस्तानी सैन्याला ‘पळता भुई थोडी’ करून टाकले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ‘विक्रांत आम्ही बुडवली’ असा डांगोरा पाकिस्तानने पिटला होता. त्याला हे सडेतोड उत्तर होते. व्हाईट टायगर, कोब्रा, अँँजलस, हारपून ही विमाने विक्रांतवर तैनात होती. विक्रांतचा हा पराक्रम पाहून ‘विक्रांतला’ पांढरा हत्ती म्हणणार्या महाभागांनी चार विमानवाहू युद्धनौकांना ‘सॅँक्शन’ दिले असून, विराट, विक्रमादित्य या परदेशी, तर विक्रांत व विशाल या देशी बनावटीच्या विमानवाहू नौका २0२0 पर्यंत भारतीय आरमारात दाखल होणार आहेत. यालाच म्हणतात काळाचा महिमा आणि जिगरबाज नौदलाचा जोश.
ही युद्धनौका १९६१ मध्ये कॅप्टन पी. एस. महेंद्रु यांच्या नेतृत्वाखाली भारतात येत असताना तिला काळ्या समुद्रात सागरी वादळाला तोंड द्यावे लागले. त्याबाबत वसंतराव लिमये म्हणतात, ‘२५-३0 मीटर उंच लाटा, खवळलेला समुद्र, काळीभोर रात्र, विक्रांत १0-१५ अंशात कलंडून पाण्यात फ्लॅग मास्ट टेकत. माझा पहिला अनुभव; पण आम्ही सुखरूप बाहेर पडलो. पुण्यात आल्याबरोबर प्रथम ‘तळ्यातल्या गणपतीला’ नारळ फोडला. १९७१ च्या युद्धात ‘रिझर्व्हिस्ट’ म्हणून बोलावले, तेव्हा जहाजावर हजर होताना प्रभाने धीराने ओवाळले. जिंकून परत आलो. ‘विक्रांत’ मेरे दिल का तुकडा. पण आता जुलै २0१४ मध्येच ती ‘अस्तंगत’ होणार. बा विक्रांता, अलविदा!’ भारतीय आरमारात विक्रांत दाखल होताच अनेक युद्धसरावांत तिने भाग घेतला. आशिया खंडात अवतरलेल्या या विमानवाहू नौकेचे अप्रूप होते. या उत्कंठेपोटीच १९६३ मध्ये विक्रांतवर थरार, युद्धसदृश संकट आले.
त्याचे असे झाले, की तत्कालीन अँडमिरल नीलकंठ कृष्णन यांच्या आधिपत्याखाली सिंगापूरला कॉमनवेल्थ युद्धसराव करून विक्रांत आली होती व नांगर टाकून विसावा घेत समुद्रात उभी होती. पहाटेची वेळ. कृष्णन शांतपणे पूजाअर्चा-गीतापठणात व्यस्त होते. इतक्यात विक्रांतचा सिग्नल ऑफिसर (Communication Officer) व ड्युटीवरचा अधिकारी कॅप्टन केबिनसमोर येऊन जोरात ओरडले, ह्यर्र१, रडर एन. कृष्णन क्षणाचाही विलंब न लावता ‘सोवळे’ नेसलेल्या स्थितीत बाहेर येताच सिग्नल ऑफिसर सॅल्यूट ठोकत म्हणाला, ‘सर जहाजाच्या रडारवर अनोळखी युद्धनौका दिसते आहे.’ इकोही तसाच वाटतो. अँडमिरल एन. कृष्णन त्याच वेशात ब्रिजवर स्थानापन्न होऊन आदेश देऊ लागले. ‘इंजिन सुरू करा, सर्व गन ऑपरेट करा. युद्धजन्यची (Action Station) उद्घोषणा करा. टॅली, अलीझे उड्डाणास तयार ठेवा’ टॅली-कमांडर आर ताहिलियानी, जे अँडमिरल होऊन नौसेनाध्यक्ष म्हणून पुढे निवृत्त झाले. लढाऊ विमान प्रथम उडवणारा विक्रांतवरचा आकाशयोद्धा. हॅँगरमधून ‘अलीझे’ काढून तयार ते झाले.
ती युद्धनौका दृष्टिक्षेपात येण्यापूर्वी तिला इशारा देण्यात आला. ‘खबरदार, जर पुढे याल तर चिंधड्या होतील.’ ती युद्धनौका दिसताच कॅप्टन एन. कृष्णन यांनी ओळखले ती पाकिस्तानी युद्धनौका पीएनएस बाबर होती. त्यांनी बाबरच्या कॅप्टनला संदेश दिला, ‘सईद मागे फिर, हकनाक बेमोत मराल’
बाबरचा पाकिस्तानी कमांडिंग ऑफिसर कृष्णन यांना सिग्नल देत म्हणाला, ‘डिअर निलू क्रिश, रिलॅक्स! माझ्या जहाजावर फिल्ड मार्शल अयुब खान आमचे राष्ट्राध्यक्ष असून, त्यांना ‘विक्रांत’ दिसते कशी हे पाहायचे आहे, दर्शन घ्यायचे आहे. मी तुला व विक्रांतला मुबारक व फत्ते चिंतितो. तुझा बॅचमेट सईद अहसान मोहम्मद’ सी.ओ. पीएनएस बाबर.
विक्रांतच्या बाजूने सुरक्षित अंतरावरून बाबर पारंपरिक मानवंदना देत-स्वीकारत दिसेनाशी झाली. तेव्हा अँन्टि-सबमरीन व अँन्टि-एअरक्राफ्ट गन्स विसावल्या. विक्रांतच्या क्रूने सुटकेचा श्वास सोडला. कॅप्टन कृष्णन हसत हसत ‘सोवळ्यातच’ केबिनकडे निघून गेले. अँडमिरल नीलकंठ कृष्णन यांनी पूर्व विभागात ( Eastern Command) विक्रांतवरून १९७१ च्या भारत-पाक युद्धात नेतृत्व केले, तर पाकिस्तानी नौदलाचे तेव्हा सारथ्य करत होते हेच अँडमिरल सईद अहसान मोहम्मद, हिलाले जुरत्त (आपल्या वीरचक्र समकक्ष पाकिस्तानी शौर्यपदक). बांगला मुक्तिसंग्रामात पाकिस्तानी नौसेनेला नेस्तनाबूत केल्यावर अँडमिरल एन. कृष्णन, डी.एस.ओ., पी.व्ही.एस.एम. यांनी अँडमिरल सईदना सिग्नल दिला- ‘डिअर अेहसू, ही तीच १९६३ मधील ‘जांबाज’ विक्रांत; जिने तुम्हाला डुबवले.’ हे दोन्ही लढवय्ये दर्यासारंग मित्र होते.
दोघांनाही ‘डिस्टिंगविश सर्व्हिस क्रॉस’ या शौर्यपदकाने इंग्लंडने गौरवले होते; पण एक जिंकला, एक हरला! ‘विक्रांत’ खरोखर भारतीय नौदलाच्या पराक्रमाचा मानदंड. सैन्यदलावरचा खर्च हा ‘वायफळ’ खर्च नसतो, तर तो आपत्कालीन संकटाला तोंड देण्याची तरतूद असते. चीन व पाकिस्तान यांचे संरक्षण अंदाजपत्रक आपल्या तिप्पट-चौप्पट असते. आज चीनकडे ८0 पाणबुड्या आहेत, तर नुकतेच चीनने विमानवाहू युद्धनौका खरेदी केली असून, ‘गदव्वार’ हे पाकिस्तानी बंदर भाडेपट्टीवर स्वत:कडे घेतलेले आहे. चीन तिबेटमधून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानपर्यंत रेल्वेमार्ग बांधत आहे. भारतावर १९६२ मध्ये हल्ला करण्यापूर्वी चीनने अरुणाचलला (अक्साई चीन) लागून असलेल्या व भारताच्या भूमीतून रस्तेवाहतुकीस भक्कम रस्ते बांधून काढले.
खरे तर लांब पल्ल्याची अण्वस्त्रे व नभांगणात रोज अवतरत असलेली अत्याधुनिक लढाऊ विमाने यांचे निरीक्षण केले तर मन सुखावते. भविष्यकालीन सर्वंकष युद्धात विमानवाहू युद्धनौका- प्रचंड युद्धनौका हे टिपण्यास इझी टारगेट; पण त्या जहाजावरचे तरबेज, निपुण व जिगरबाज ‘नौसेना लढवय्ये’ हे आव्हान लीलया परतवून लावतात. हीच तर खरी ‘विक्रांतची’ यशोगाथा. विक्रांत आता दारूखाना ब्रेकिंग यार्डमध्ये अखेरचा श्वास घेत आहे; पण विक्रांतवर लढलेल्या आम्हा सैनिकांच्या ‘हृदयसिंहासनावरून’ उतार किंवा लुप्त होऊच शकत नाही. बा ‘विक्रांता’ अलविदा. नूतन सरकारने अर्थसंकल्पात लष्करासाठी तरतूद करताना सावध व्हावे, म्हणून हा खटाटोप.
(लेखक निवृत्त नौदल अधिकारी आहेत.)