शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कोल्हापुरातील ते रोमांचित चोवीत तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:05 AM

अस्सल कोल्हापूरकरांचा सगळा नादच खुळा... पार तोडलंस की गड्या असं म्हणणार आणि कचकचून मिठी मारणार... कोल्हापूरकरांची नर्म-विनोदी बुद्धीही अफाट... त्यांच्याबरोबर गप्पांचा फड रंगला की हास्याचे कारंजे थुईथुई नाचू लागणार... याच कोल्हापूरचा एक दिवसाचा पाहुणा म्हणून मी गेल्या शनिवारी कोल्हापुरात आलो आणि माझ्या कोल्हापुरी मित्रांमुळे माझा तो दिवस अगदी सुवर्णमय होऊन गेला...

ठळक मुद्दे. वेळ कमी असल्याने आम्ही रंकाळ्याचा निरोप घेतला; पण मनात येथे मी पुन्हा नक्की येणार हे ठरवूनच..

- प्रशांत कुलकर्णी -अस्सल कोल्हापूरकरांचा सगळा नादच खुळा... पार तोडलंस की गड्या असं म्हणणार आणि कचकचून मिठी मारणार... कोल्हापूरकरांची नर्म-विनोदी बुद्धीही अफाट... त्यांच्याबरोबर गप्पांचा फड रंगला की हास्याचे कारंजे थुईथुई नाचू लागणार... याच कोल्हापूरचा एक दिवसाचा पाहुणा म्हणून मी गेल्या शनिवारी कोल्हापुरात आलो आणि माझ्या कोल्हापुरी मित्रांमुळे माझा तो दिवस अगदी सुवर्णमय होऊन गेला...कोल्हापूर म्हटलं की मनाचा दिलदारपणा... कोल्हापूर म्हणजे रांगडा निरागसपणा... तर्रीबाज मिसळीचा झणझणीतपणा... शुद्ध साजूक तुपासारखा प्रामाणिकपणा... तांबडा-पांढरा... रंकाळ्यावरचा नाजूकपणा... शंभर नंबरी सोन्यासारखी माणसं... खटक्यावर बोट आन् जागेवर पलटी... आणि कोल्हापूर म्हणजे बरंच काही...झालं असं की, मी निघालो होतो गोव्याला सहकुटुंब... जाता जाता महालक्ष्मीचे दर्शन घेऊन जावे म्हणून एक दिवस आधी कोल्हापूरमध्ये आलो... आता माझ्यासारखा माणूस नवीन शहरात उपाशी-तापाशी तर राहणार नाही... अगदी सहज म्हणून मी एका कोल्हापूर ग्रुपवर ‘मिसळ आणि नॉनव्हेज सोडून हटके काय खायला मिळेल?’ अशी दोन ओळीची पोस्ट टाकली... तुम्हाला सांगतो ती पोस्ट टाकली अन् कोल्हापूरकरांनी त्या पोस्टवर तिथं मिळणाऱ्या शाकाहारी पदार्थांचा पाऊसच पाडला... त्या दोन ओळीच्या पोस्टवर साडेपाचशेवर कॉमेंट आल्या आणि त्यातून एकाहून एक सरस अशा कोल्हापुरातील खास पदार्थांची छोटी पुस्तिका होईल, एवढी मोठी यादी निर्माण झाली... त्या पोस्टमुळे तिथल्या लोकांना कोल्हापुरातील माहीत नसतील तेवढी ठिकाणं मला माहीत झाली आहेत...

या पोस्टमुळेच वेगवेगळ्या मित्रांकडून मी कोल्हापूरमध्ये कधी पोहोचणार, याची विचारणा होऊ लागली आणि माझ्या स्वागताची जय्यत तयारीही करून ठेवली... सर्वांत आधी प्रथमेश जोशी माझ्या हॉटेलवर पोहोचला... हा माणूस म्हणजे कोल्हापूरचा चालता-बोलता ग्रंथच... खास कोल्हापूरचा गुगल... कुठं? काय? कधी? केव्हा? याची अद्ययावत माहिती त्याला होती... त्याला भेटून पुलंच्या नारायणची आठवण झाली... प्रथमेश आला आणि त्याने आमचा जणू ताबाच घेतला, नव्हे आम्ही त्याला स्वत:ला सुपूर्द केले... आणि सुरू झाली आमची कोल्हापूर सफारी...

सुरुवात झाली ती महापालिकेजवळच्या इंडिया हॉटेलपासून- ‘पातळ-भाजीपाव’ नावाचा एक हटके पदार्थ हा केवळ येथेच मिळतो... पासष्ट वर्षे जुना, केवळ पंच्याहत्तर पैशांपासून मिळणारी ‘पातळ-भाजीपाव’ म्हणजे एक भन्नाट प्रकार... छोट्याशा डिशमध्ये येणारी विशिष्ट तर्री, त्यात डुंबणारे काही बटाट्याचे छोटे तुकडे आणि त्यावर भुरभुरलेली शेव... त्याबरोबर ‘पेटीपाव’... तोसुद्धा केवळ येथेच मिळतो... गेल्या कित्येक वर्षांपासून इथली चव जशीच्या तशी आहे... त्या काळापासून काम करणारा मांजरेकर अजूनही तेथेच काम करतो... इथला कुंदा व बेसन लाडूही अफाट होता... इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे जुलाब आणि जळीत यावर जालीम औषध दिले जाते आणि तेही मोफत...

या सर्वांचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो... प्रथमेश मला व म्हाळसाला घेऊन गेला कविता बंकापुरे यांच्याकडे... त्यांचं ठवळर अठऊ उवफऊर हे छोटंसं हॉटेल; पण एका विशिष्ट पदार्थासाठी खास आहे, ते म्हणजे ‘लसूण भाकरी’... जगात कोठेही न मिळू शकणारी ही लसूण भाकरी म्हणजे चवीचा अद्भुत नजराणा... ज्वारीच्या पिठात लसूण पेस्ट व त्यांच्याकडचा खास मसाला टाकून पीठ मळून हाताने थापून केलेली मऊ खरपूस व चटकदार भाकरी म्हणजे चवीचा हटका अनुभव... त्या भाकरी थापत असताना त्यांच्या त्या हाताच्या लयीकडे बघायचं... ते हस्तलालित्य अचंबित करतं... जणू हाताची बोटं त्या पोळपाटाच्या व्यासपीठावर भरतनाट्यम करीत आहेत... भाकरी तर इतकी गोल की करकटकपण त्यासमोर मार खाईल... त्या गरमागरम भाकरीबरोबर येते शेंगा चटणी आणि त्याच्याकडेच बनविलेला ठेचा... आणि जरासं दही... आम्ही तिथे गेलो आणि एक एक करून मित्रमंडळी गोळा झाली... मास्टर शेफ शिवप्रसाद, मनमोकळ्या गप्पा मारणारा पोलीस उच्चाधिकारी पुष्कराज व त्यापाठोपाठ लक्ष्मी मिसळचे सर्वेसर्वा अमोल ...मैफील जमली आणि गप्पांचा फड रंगला... गरमागरम भाकरी, ठेचा, चटणी, दही व समोर मित्र... विचार करा काय रंगत आली असेल... तव्यातनं आलेल्या भाकरी थेट ताटात पडत असतानाच इकडे हास्यकल्लोळात गप्पा सुरू होत्या...

सौ. कविता यांनी सहज म्हणून काळा वाटाणा रस्सा टेस्टपुरता दिला... एक चमचा चवीसाठी म्हणून तोंडात टाकला आणि अहाहा, नुसता कल्ला चव... शाकाहारी माणसाला पांढरा-तांबडा रस्सा कसा असतो हे जाणून घ्यायचं असेल तर हा रस्सा चाखून बघा... सामिष चवीचा आनंद नक्कीच मिळेल... त्यांनी मग हळूच पिठलं आणून दिलं... मग तेही झक्कास होतं... कोल्हापूरमध्ये आलात तर मंदिरापासून जवळच असलेल्या याठिकाणी दुपारी जेवायचा बेत नक्की करा... पोटातील अन्नपूर्णा तृप्त होऊन भरघोस आशीर्वाद नक्कीच देईल... आणि तेथे खाल्ल्यावर तुम्ही माझी आठवण काढून मला धन्यवाद देणार, हे मी खात्रीने सांगतो...

त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो... प्रथमेश म्हणाला, ‘आपण अजून एका खास ठिकाणी जाऊयात...’ आता आम्ही स्वत:ला त्याच्याकडे सुपूर्द केलं असल्यानं त्याच्या मागे निघालो. कारण, तो जे काही आमच्यासाठी करणार ते अत्युच्च असणार याची मला खात्री होती...

प्रथमेश आम्हाला प्रसिद्ध अशा हिंदुस्थान बेकरीत घेऊन आला... मंदिराला लागून असलेल्या ह्या बेकरीने जवळपास साठ वर्षे आपली ओळख चांगलीच जपली आहे... या बेकरी मालकांचा तिसरा वारस वहाब ही बेकरी चालवतो जो तेथेच भेटला... प्रथमेशने आम्ही येणार याची त्यांना कल्पना दिलीच होती... वहाब एक पंचवीस-तीस वयोगटातील मुलगा; पण अगदी उत्साहाने आणि हिरीरिने हा व्यवसाय चालवतो... त्याने बेकरी व प्रोडक्शन प्रोसेस फिरवून दाखवली... वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे, खारी, ब्रेड, केक, पेस्ट्री ई आदी असंख्य प्रकार येथे तयार होतात... या प्रत्येक तयार होणाºया पदार्थाची माहिती देताना त्या पदार्थाचा नमुना हातावर पडत होता आणि मग पुन्हा एकदा खादाडी सुरू झाली... ही बेकरी एवढी प्रसिद्ध आहे की सकाळी ती उघडायच्या आत रांगा लागतात... जवळपास एक टन केवळ पाव/ब्रेड रोज येथे विकला जातो, यावरून अंदाज बांधता येतो... इथली अतिशय महत्त्वाची गोष्ट आवडली, ती म्हणजे येथे काम करणाºया स्टाफपैकी सत्तर टक्के महिला आहेत... पोरीसाठी चॉकलेट पेस्ट्री आणि काजू रोट घेऊन आम्ही तिथला निरोप घेतला...

कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळे पोट ओव्हर फ्लो झाले होते... संध्याकाळी पुन्हा भेटू म्हणून प्रथमेशची रजा घेतली आणि हॉटेलवर आलो... संध्याकाळी सहाला प्रथमेश आम्हाला राजवाडा दाखवायला घेऊन गेला...महालक्ष्मी मंदिरात दर्शनाला जायचं असल्याने म्हाळसाबार्इंनी साडी नेसलेली होती मग काय विचारायचं राजवाड्यासमोर मस्त फोटो शूट झाले... तेथून तो आम्हाला रंकाळ्यावर घेऊन गेला... काहीवेळ तेथे घालवला... प्रथमेशने तेथील बºयाच अद्भुत व अचंबित करणाºया गोष्टी सांगितल्या... वेळ कमी असल्याने आम्ही रंकाळ्याचा निरोप घेतला; पण मनात येथे मी पुन्हा नक्की येणार हे ठरवूनच... (पूर्वार्ध)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका