तिस-या जगाचे संत
By Admin | Updated: September 20, 2014 19:02 IST2014-09-20T19:02:39+5:302014-09-20T19:02:39+5:30
फादर जोसेफ वाझ (पाद्री जोस वाझ म्हणून ज्ञात असलेले) यांना संतपद घोषित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर हे गोव्याचे संत म्हणून सुविख्यात असले तरी फादर वाझ हे गोव्यात जन्मलेले पहिले संत ठरणार आहेत. आशिया खंडासाठी ही एक मोठी घटना ठरणार आहे. त्यानिमित्ताने..

तिस-या जगाचे संत
डॉ. सुशीला सावंत मेंडिस
फादर जोसेफ वाझ हे तिसर्या जगातून आलेले ‘पहिले अयुरोपीय’ फादर आहेत; ज्यांनी चर्चच्या माध्यमातून आपली सेवा या खंडात बजावली आहे. प्रोटेस्टंट ख्रिस्ती डच लोकांनी श्रीलंकेतील उद्ध्वस्त केलेल्या चर्चच्या पुनरुत्थानाची जबाबदारी देऊन त्यांना चर्चनेअपोस्टल (प्रेषित) ऑफ कानरा आणि श्रीलंका अशी पदवी दिली असली, तरी संतपद हा विशेष बहुमान असून, तीन शतकांचा काळ त्यासाठी वाट पाहावी लागली आहे.
जेझुईटसचे संस्थापक सेंट फ्रान्सिस झेवियर आणि सेंट इग्निशियस हे दोघे स्पेनमधून आले होते आणि त्यांच्या संतपद मिळण्याला तत्कालीन भागौलिक-राजकीय घटना कारणीभूत होत्या. शिवाय त्यांना सरकारचा पाठिंबा होता आणि जेझुईटसच्या यंत्रणेचाही त्यांना लाभ झाला. फादर जोसेफ यांना ना रोमचा पाठिंबा होता, ना पोतरुगीज सरकारचा किंवा श्रीलंकेच्या राज्यकर्त्यांचा. श्रीलंकेत बळी पडलेल्या देवीच्या रुग्णांना मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांनी केलेली मदत लक्षवेधी होती. श्रीलंकेचा तत्कालीन राज्यकर्ता विमलधर्म सूर्या द्वितीयने त्यांना कैदेत टाकले होते; मात्र नंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्याने त्यांना मुक्त आश्रय दिला.
फादर जोसेफनी याकामी झोकून द्यायचे ठरवले, तेव्हा २५ सप्टेंबर १६८५ रोजी त्यांच्याकडे सेंट फिलीप नेरी ऑरेटरीचे (प्रार्थनामंदिर) प्रमुखपद आले. कोणताही गाजावाजा न करता काम करावे, या संतवचनाला जागून त्यांनी कार्य आरंभले. त्यांच्यासह काम करणारे इतर काही पाद्री फारसे परिचित नसले तरी गोमंतकीय पाद्रय़ांची ती पहिली तुकडी होती. हे मिशनरी काम सहजसुलभ नव्हते. श्रीलंकेत प्रोटेस्टंट डच लोकांमध्ये काम करताना कधी पदेर म्हणून तर कधी बांगडीवाले, धोबी, मच्छीमार, कुली असे अनेक वेश पालटून त्यांना काम करावे लागले.
जोसेफ वाझ यांचा जन्म २१ एप्रिल १६५१ साली बाणावली येथे मारिया दी मिरांडा यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील ख्रिस्तोवांव वाझ हे सांकवाळचे. जोसेफ वाझ यांचे पूर्वज सांकवाळ येथील नामांकित अशा गौड सारस्वत ब्राह्मण नायक कुटुंबातील. जात्याच हुशार असणार्या जोसेफ यांनी पोतरुगीज आणि लॅटिन भाषा शिकून घेतली. त्यानंतर सेंट पॉल या जेझुईट कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. १६७५ साली अवघ्या २४व्या वर्षी त्यांना गोव्याच्या आर्चडायोसेशनने दीक्षा दिली. पाद्री झाल्यानंतर ते अनवाणी फिरू लागले आणि लवकरच त्यांनी समाजात चांगला मान मिळवला.
फादर जोसेफ यांनी श्रीलंकेतील ख्रिस्ती लोकांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. या बेटावरून डचांनी पोतरुगिजांची हकालपट्टी केल्यानंतर तेथील ख्रिस्ती लोकांचे हाल सुरू झाले. १६५८ पर्यंत डच लोकांनी कॅथलिक चर्च इमारती उद्ध्वस्त करून टाकल्या. त्यांचा आध्यात्मिक प्रभावही नामशेष केला. त्यांनी पोतरुगाली पाद्रय़ांना हाकलून लावले, ख्रिस्ती धर्म आचरण्यास बंदी घातली आणि मिशिनरींना श्रीलंकेत बंदी घातली. या पार्श्वभूमीवर फादर वाझ श्रीलंकेत जाऊ पाहत होते. पण गोव्याच्या आर्चडायोसेशनने त्यांना कानरा येथे पाठवले.
१६८१-८४ या काळात कानरा येथे काम करताना त्यांनी मंगळूर, बसरूर, मुलकी, कालियनपूर येथे मिशिनरी कामाला सुरुवात केली. तेथील लोक पाद्रय़ांच्या उपस्थितीत एकत्र येत. या प्रार्थना त्यासाठीच खास उभारलेल्या छोट्या झोपड्यांतून होत. वाझ यांना तेव्हाच संत म्हणून ओळख मिळू लागली होती, त्याच भागात मुदीपू येथे त्यांचे थडगे आहे. आजही हजारो लोक त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्या व्याधींवर उपाय शोधण्यासाठी तिथे येतात.
१६८४ ते गोव्यात परतले आणि धर्मोपदेश देणे सुरू केले. इथेच त्यांना जुने गोवे येथे होली क्रॉस ऑफ मिरॅकल्स या भग्न चर्चमध्ये स्वत:ला ‘मिलाग्रस्त’ म्हणवून घेणारे तीन पाद्री पास्कोल द कॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली भेटले. (आजही जुन्या गोव्यात या चर्चचे भग्नावशेष दृष्टीस पडते.) वाझ यांना येथेच
पहिल्यांदा ऑरेटरीचे प्रमुख म्हणून निवडले गेले. त्यानंतर लगेचच फादर वाझ यांनी गुप्तपणे श्रीलंकेत (तत्कालीन सिलोन) जायचे ठरवले. त्या वेळी श्रीलंकेने सुमारे ५0 वर्षे एकही पाद्री पाहिला नव्हता. १६८६ साली वाझ यांनी एक संन्यासी म्हणून प्रवास सुरू केला आणि १६८७ साली ते तुतीकोरीन येथे पोहोचले. १६९७ च्या जानेवारीत त्यांना ‘विकार जनरल ऑफ सिलोन’ म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर लगेच देवीची लागण झालेल्या कँडी येथील पीडितांना मदत केली.
तमिळ आणि सिंहली भाषेत लिखाण करत फादर वाझ यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून धर्मप्रसार आरंभ केला. फादर वाझ यांचा सम्मानासू स्वामी (प्रेषित धर्मोपदेशक) म्हणून आदर होई. १७0५ मध्ये त्यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांना बिशपपद आणि पहिले ‘विकार अपोस्टलिक ऑफ सिलोन’ (प्रेषित) हे पद देऊ करण्यात आले; पण त्यांनी ते नाकारून मिशिनरी राहणेच पसंत केले.
१७१0 मध्ये आरोग्याच्या तक्रारी असतानाही त्यांनी आपले काम सुरू ठेवले; पण १६ जानेवारी १७११ साली ५९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या दिवशी त्यांच्या नावे फेस्त (जत्रा) साजरे केले जाते.
१७१३ साली सिलोनचे बिशप फ्रान्सिस्को दी वास्कोन्सेलस यांनी त्यांना संतपद देण्यात यावे असा प्रस्ताव पहिल्यांदा दिला होता. नंतर १९५३ साली गोवा आणि दमणच्या आर्चडायोसेशनने त्यांना संतपद देण्याची प्रक्रिया मार्गी लागावी म्हणून प्रयत्न सुरू केले. फादर जोसेफ वाझ यांना पोप जॉन पॉल यांनी २१ जानेवारी १९९५ साली कोलंबो येथे बिटिफाय केले. (कॅथलिक चर्चमध्ये एखाद्या मृताची साधूच्या मालिकेत गणना करण्यापूर्वी तो शाश्वत सुखाचा भोक्ता आहे असे घोषित करतात.)
फादर वाझ यांना संतपद घोषित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गरीब आणि तळागाळातील लोक केवळ त्यांचे काम पाहून रोमन कॅथलिक चर्चकडे वळले. संपूर्णपणे अपिरिचित अशा प्रदेशात त्यांना गुप्तपणे काम करावे लागले. काही वेळा तर एकदा जेवल्यानंतर पुढचे जेवण मिळणार की नाही याचीही शाश्वती नसे. फादर वाझ यांनी श्रीलंकेत उद्ध्वस्त झालेल्या चर्चची पुनस्र्थापना केली. त्यासाठी आपले प्राणही संकटात टाकले. अगदी अलीकडेपर्यंत त्यांचे काम लोकांना माहीत नव्हते. २000 साली गोव्यातील आर्चडायोसेशनने त्यांना गोवा आणि दमण येथील आर्चडायोसेशनचे आश्रयदाते घोषित केले.
(लेखिका इतिहासाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका आहेत.)