भीती आहे, बंदी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:01 AM2020-03-15T06:01:00+5:302020-03-15T06:05:01+5:30

जपानमध्ये घबराट जरूर आहे;  पण त्याचा धसका कोणी घेतलेला नाही.  लोकांच्या स्वातंत्र्यावरही बंदी आलेली नाही. याचं कारण जपान मुळातच शिस्तशीर आहे. 

There is fear, but no ban! | भीती आहे, बंदी नाही!

भीती आहे, बंदी नाही!

Next
ठळक मुद्देआक्रस्ताळेपणा करणं हा मुळातच जपान्यांचा स्वभाव नाही. कायद्याचंही काटेकोर पालन. त्यामुळे निदान आतापर्यंत तरी सरकारनंही लोकांवर फारसे निर्बंध घातलेले नाहीत. 

- रोहित हळबे

जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसनं आता जपानमध्येही शिरकाव केला आहे. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. लोकांच्या मनात घबराट जरूर आहे; पण प्रत्यक्षात त्याचा फार धसका कोणी घेतल्याचं चित्र मात्र दिसत नाही. सरकारनंही स्वत:हून लोकांवर फारसे निर्बंध लादलेले नाहीत. कोणालाही घरात डांबून ठेवलेलं नाही. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंदी आलेली नाही. लोकांना वाटेल त्यावेळी ते बाहेर पडू शकतात, कामावर जाऊ शकतात. याचा अर्थ संकट दाराशी घोंघावत असतानाही जपानी सरकार किंवा जपानचे लोक अजून जागे झालेले नाहीत, असं म्हणायचं का?
तसं कधीच म्हणता येणार नाही, कारण अर्थातच त्यामागे काही कारणं आहेत. ती आपल्याला समजून घ्यावी लागतील.
मुळात जपान हा अतिशय शिस्तशीर देश आहे. आपलं कर्तव्य, आपल्या जबाबदार्‍या आणि आपली कामं यांना जपानी लोक सर्वाधिक महत्त्व देतात. त्यामुळे सरकारनं काही निर्बंध लागू करण्याच्या आधी लोकांनी स्वत:हूनच आपल्यावर अनेक निर्बंध लादून घेतले आहेत.
दुसरी गोष्ट, जपानची लोकसंख्या अतिशय कमी आहे. वृद्धांची संख्या जास्त आहे. त्यामुळे असंही जपानध्ये रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फार लोकं एकावेळी कधीच दिसत नाहीत. अर्थात टोकिओसारखं राजधानीचं शहर, काही टुरिस्ट स्पॉट्स, रेल्वे स्टेशन. यांसारख्या काही ठिकाणी लोकांची थोडीफार गर्दी असते, दिसते; पण तीही आता कमी झाली आहे.
आक्रस्ताळेपणा करणं हा मुळातच जपान्यांचा स्वभाव नाही. कायद्याचंही काटेकोर पालन. त्यामुळे निदान आतापर्यंत तरी सरकारनंही लोकांवर फारसे निर्बंध घातलेले नाहीत. विविध माध्यमांतून आवाहन, विनंती मात्र ते करीत आहेत. जपानमधील लोकांना तेवढं पुरेसं आहे. त्यामुळे समूहाच्या भीतीचं वातावरण इथे दिसत नाही. 
लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं बंद केलं आहे. आठवडाभर काम केल्यानंतर इथले लोक वीकेण्डला जातात. वीकेण्डसाठी बाहेर पडणं त्यांनी थांबवलं आहे. मोठमोठे इव्हेण्ट्स आधीच कॅन्सल झाले आहेत. बाहेर पडताना मास्कचा वापर केला जात आहे. त्यामुळे मास्क, टिश्यू पेपरचं शॉर्टेज इथे आहे. डिस्नेलॅँडला लोकांची गर्दी असते; पण 29 फेब्रुवारी ते 15 मार्च या काळात ते आधीच बंद ठेवण्यात आले आहेत. कदाचित ही मुदत आणखी वाढवण्यात येईल. स्पोर्ट्स सेंटर्स काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. कंपन्यांनी कर्मचार्‍यांना घरून काम करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपन्यांतली गर्दी कमी झाली आहे. महत्त्वाच्या मीटिंग्जही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जात आहेत. 
सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाचवेळी सगळ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. कामाच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. समजा एखाद्या कंपनीतील कर्मचार्‍यांची वेळ सकाळी सातची असेल, तर काही जण सातला, काही जण आठला, काही जण नऊला. अशी बदलण्यात आली आहे. जेणेकरून कुठेही गर्दी होणार नाही.
आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, जपानमध्ये कोरोनामुळे दुर्दैवानं काही जणांचा मृत्यू झाला; पण ते वृद्ध होते. या वृद्धांचीही काळजी घेतली जात आहे. सरकार, कंपन्या आपापल्या पातळीवर लोकांची तपासणी करताहेत. सगळं काही शिस्तशीर सुरू आहे. रस्ते ओस पडलेत, गर्दी कमी झालीय, लोकांनी आधीच किराणा आणि इतर सामान घरात भरून ठेवलंय. भीती आहेच; पण त्यापेक्षाही काळजी अधिक दिसतेय. दुकानं पूर्णत: बंद झालीत, काहीच मिळत नाहीये. अशी स्थिती सध्या तरी नाहीए.
(लेखक जपानच्या टोकिओतील रहिवासी आहेत.)

(मुलाखत आणि शब्दांकन : समीर मराठे)

Web Title: There is fear, but no ban!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.