कोणी तरी आहे का तिथे?

By Admin | Updated: July 5, 2014 15:24 IST2014-07-05T15:24:30+5:302014-07-05T15:24:30+5:30

पृथ्वीवर आपण राहतो; पण या अनादी-अनंत विश्‍वात आणखी कुणी असेल का, याचं एक प्रचंड मोठं कुतूहल माणसाला आहे. त्याच ऊर्मीतून परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्नही झालेत. परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने एक नवा टेलिस्कोप अंतराळातच साकारण्याची योजना नुकतीच आखली आहे. अंतराळात ‘आपल्यासारखे’ कुणी असण्याचा शोध यातून पूर्णत्वास जाईल?..

Is there anyone there? | कोणी तरी आहे का तिथे?

कोणी तरी आहे का तिथे?

 डॉ. प्रकाश तुपे

विश्‍वात आपण एकटे आहोत काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची धडपड अनेक वर्षांपासून चालू आहे. आपल्या सूर्यमालेत तरी पृथ्वी सोडून इतरत्र जीवसृष्टी नसल्याचे अवकाशमोहिमांनी दाखवून दिले आहे. सूर्यापलीकडच्या तार्‍याभोवती  पृथ्वीसारखे ग्रह आहेत की नाही, व असल्यास तेथील जीवसृष्टी शोधण्यासाठी एक महाकाय दुर्बीण बांधण्याच्या विचारात शास्त्रज्ञ आहेत. ही दुर्बीण पृथ्वीवर ठेवण्याऐवजी तिला अंतराळात तब्बल १५ लाख किलोमीटर उंचीवर ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.
ही दुर्बीण प्रचंड मोठी व जड असणार आहे. व त्यामुळेच तिला अंतराळात नेणे अवघड आहे. यामुळे शास्त्रज्ञ दुर्बिणीची जोडणी अंतराळतच करण्याच्या विचारात आहेत. या प्रकल्पाचे स्वरूप पाहता अमेरिका आणि युरोप यांच्याशिवाय जगातील सर्व प्रमुख देशातील संस्थांनी सहकार्य दिल्यासच ही दुर्बीण पुढील पंधरा-वीस वर्षांत अंतराळात कार्यरत झाल्याचे पाहता येईल. यासाठी रॉयल अँस्ट्रॉनॉमीकल सोसायटीचे अध्यक्ष प्रा. मार्टिन बार्सस्टोव्ह यांनी या प्रकल्पाचे स्वरूप नुकत्याच झालेल्या परिषदेमध्ये शास्त्रज्ञांसमोर मांडले.
आकाशात दिसणार्‍या तार्‍यांभोवती ग्रह आहेत, की नाही, याचे नक्की उत्तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत शास्त्रज्ञांना माहित नव्हते. तारे प्रचंड दूर असल्याने त्यांच्या भोवतालचे ग्रह दुर्बिणीतून दिसत नाहीत. तार्‍याजवळचा ग्रह शोधणे म्हणजे दूरच्या सर्चलाईट शेजारचा काजवा शोधण्याइतके अवघड मानले जाते. यामुळेच प्रत्यक्षपणे तार्‍याशेजारचे ग्रह मोठय़ा दुर्बिणीतूनदेखील शोधता आले नाही. मात्र, १९९४-९५ मध्ये तार्‍याशेजारचा ग्रह अप्रत्यक्षरीत्या शोधण्याचे तंत्र विकसित केले गेले. त्याच्या साह्याने आतापर्यंत हजारो ग्रह व ग्रहमालांचा वेध घेतला गेला. मात्र,  या तंत्राने ग्रहाभोवताली जीवनात उपयोगी ठरणारे हवामान किंवा प्रत्यक्ष जीवसृष्टी शोधता आली नाही.
दुर्बिणीतून दूर अंतरावरील तार्‍यांचा व त्या भोवतालच्या ग्रहांचा किंवा हवेचा वेध घेताना, पृथ्वीभोवतालचे वातावरण त्रासदायक ठरते. पृथ्वीभोवतालच्या अस्थिर वातावरणामुळे दूर अंतरावरच्या ग्रह-तार्‍यांचा प्रकाश दुर्बिणीत शिरताना तो स्थिर न राहता थरथरतो. या थरथरण्यामुळे ग्रहगोलांच्या प्रतिमादेखील दिसत नाहीत. तसेच, दृश्य प्रकारच्या तरंग लांबी व्यतिरिक्तइतर तरंग लांबीचा प्रकाश पृथ्वीवरचे वातावरण शोषून घेते. यामुळे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर अंतराळात दुर्बीण ठेवावी, असे ६0 वर्षांपूर्वी ‘लायमन स्पिटसर’ याने सुचविले होते. त्याप्रमाणे अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेने हवाई दुर्बीण बांधावयाचे ठरविले. मात्र, या प्रकल्पाचा प्रचंड खर्च पाहता युरोपिय राष्ट्रांची मदत घेऊन नासाने हबल दुर्बीण बांधली. 
गेली २५ वर्षे ही दुर्बीण पृथ्वीभोवती फिरताना अंतराळाचे निरीक्षण करत असून, तिने खगोलशास्त्रात भरीव योगदान दिले आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी चंद्रा दुर्बीण देखील अंतराळातून ग्रह-तार्‍यांचे वेध क्ष-किरणांच्या माध्यमातून घेत आहे. या दुर्बिणीला भारतीय शास्त्रज्ञ डॉ. एस. चंद्रशेखर यांचे नाव दिले आहे. 
सध्या अंतराळात केपलर नावाची दुर्बीण आहे. ती तार्‍यांचे वेध घेत आहे. मात्र, हबल किंवा केपलर दुर्बिणीची कार्यक्षमता आता काळानुसार कमी होत असल्याने नासा आता जेवेब स्पेस टेलिस्कोप अंतराळात पाठवत आहे. अमेरिका  क ॅनडा व युरोपियन राष्ट्रांच्या समुदायासह १७ राष्ट्रे मिळून ही दुर्बीण अंतराळात पाठवण्याच्या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. या दुर्बिणीचा पुढचा टप्पा म्हणून ‘अँटलास्ट’ किंवा अँडव्हॉन्स टेक्नॉलॉजी लार्ज अँपर्चर स्पसे टेलिस्कोप हा प्रकल्प राबविण्याचा विचार प्रा. मार्टिन बार्सस्टॉव्ह यांनी मांडला. या प्रकल्पाचे मुख्य प्र्वतक स्पेस टेलिस्कोप स्पेस इन्स्टिट्युट असेल. 
अँटलास दुर्बीण ही हबल दुर्बिणीपेक्षा १0 पट मोठी असेल. तिचा आरसा वीस मीटर एवढा असल्याने, तिची क्षमता हबलपेक्षा दोन हजार पट जास्त असेल. यामुळे ही दुर्बीण ३0 प्रकाश वर्षे अंतरापर्यंतच्या तार्‍याभोवतालच्या ग्रहांचे वेध घेईल. पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध ही दुर्बीण लावेल. तसेच, या ग्रहांचा प्रकाश तपासून त्यामध्ये प्राणवायू, ओझोन, मिथेन व पाण्याची वाफ आहे की नाही, याची निरीक्षणे घेतली जातील. या निरीक्षणातून नवीन ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता अजमावली जाईल. अँटलॉस्ट दुर्बीण तार्‍यांच्या जन्माविषयीदेखील अभ्यास करेल. तारे व वेगवेगळ्या आकाशगंगांच्या जन्माविषयी निरीक्षणे अँटलास्ट घेईल. दुर्बिणीचे बांधकाम पुढील पंधरा वीस वर्षांत होणार असल्याने  नवनवीन तंत्रज्ञान या दुर्बिणीत वापरले जाईल. दुर्बिणीचे प्रचंड आकारमान पाहता ती हबल दुर्बिणीसारखी अंतराळात नेता येणार नाही. अवकाशयानांच्या साहाय्याने दुर्बीणचे सुटे भाग अंतराळात नेऊन त्यांची जोडणी अंतराळ प्रवासी करतील. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीसारखे काही अब्ज ग्रह अंतराळात सापडू शकतील व त्यापैकी किमान ६0 ग्रहांवर जीवनावश्यक वातावरण किंवा जीवसृष्टी सापडू शकेल. मात्र, आपणास यासाठी अजून १५-२0 वर्षे वाट पाहावी लागेल. आपण अशा करू या की आंतराष्ट्रीय समुदाय अँटलास्ट दुर्बिणीच्या प्रकल्पास संपूर्ण सहकार्य देईल व लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल.
(लेखक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आहेत.)

Web Title: Is there anyone there?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.