पुस्तकं सांगतात गोष्ट: कामाठीपुऱ्याचं न संपणारं कुतूहल
By मनोज गडनीस | Updated: August 24, 2025 12:14 IST2025-08-24T12:13:41+5:302025-08-24T12:14:07+5:30
Kamathipura: काही जागा आपल्याला माहिती असतात. पण त्या आपण जगलो नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांचं अस्तित्व आपल्या नेणीवेपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे म्हणा, तिथल्या संस्कृतीची नस आपल्याला सापडू शकत नाही.

पुस्तकं सांगतात गोष्ट: कामाठीपुऱ्याचं न संपणारं कुतूहल
- मनोज गडनीस
काही जागा आपल्याला माहिती असतात. पण त्या आपण जगलो नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांचं अस्तित्व आपल्या नेणीवेपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे म्हणा, तिथल्या संस्कृतीची नस आपल्याला सापडू शकत नाही. परिणामी, एका जळजळीत अनुभवापासून आपण वंचित राहतो. परंतु, खुलं झालेलं मन कुतूहलाच्या वाटेवरून त्या जागेच्या अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी जातं तेव्हा तिथले दाहक क्षितिज आपल्यातल्या खुजेपणाची जाणीव करून देतं. माझ्याबाबतीत गोंधळात्मक वर्णनाच्या मांडणीच्या आजूबाजूचा अस्वस्थ अनुभव सुधीर जाधवलिखित ‘कामाठीपुरा’ वाचताना सातत्याने येत राहतो. एक मन कुतूहल क्षमविण्यासाठी पुस्तकाची पुढची पानं भराभरा वाचू लागतं तर दुसरं कामाठीपुऱ्यातील भीषण जगण्याच्या जळजळीत वास्तवाची अनुभूती घेण्यासाठी नव्हे तर पचविण्यासाठी थांबण्याची खूण करत राहतं. मनाच्या अशा विकट हिंदोळ्यावरून लेखक माझ्या खांद्यावर हात टाकून कामाठीपुरा दाखवतो.
आत्मानुभूतीला मिळालेल्या चित्रमय शब्दांची जोड म्हणजे सुधीरचे आयुष्य. त्याचा परिघ. त्याच्यासारख्या अनेक तरुणांच्या जडणघडणीचा दस्तावेज. लेखक म्हणून सुधीरचे हे पहिलेच पुस्तक. पण अफाट निरीक्षणशक्ती आणि जे दिसतं ते जसंच्या तसं नेमक्या शब्दांत मांडण्याची हातोटी त्याला लाभली आहे. त्यामुळेच पुस्तकाचं पहिलं पान वाचतानाच सुधीर आपल्याला कामाठीपुऱ्यात घेऊन जातो. या भ्रमंतीमध्ये जेव्हा नकळत पुस्तकाच्या पान क्रमांकावर नजर जाते तेव्हा भान येत , शंभर पानं तर आपण आत्ताच वाचून काढली... मग पुन्हा पुस्तक हातात घेईपर्यंत सुधीर आणि त्याचा कामाठीपुरा शांत बसूच देत नाही. तो तुमच्यातला अधाशी वाचक जागा करतो.
सुधीरच्या पुस्तकातून कामाठीपुरा फिरताना, मला तिथल्या लोकजीवनात दिसली एक विषण्ण विपन्नावस्था. मात्र या विपन्नावस्थेवर आनंदी राहण्याची पावडर-लाली चढवलेली आहे. इथल्या बेईमानीच्या दुनियेत एक इमानदारी आहे. त्यांचे काही उसूल आहेत. इथल्या लोकांनी सहानुभूती फाट्यावर मारलीये. मुंबई माझे कार्यक्षेत्र. त्यामुळे मला ती चांगली माहितीये, या माझ्या भ्रमाला या पुस्तकाने भानावर आणलं. माझ्या घरापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटरवर असलेला कामाठीपुरा नवा नव्हता. कित्येकवेळा त्या रस्त्यावरून जाणं झालं. म्हणून मला कामाठीपुरा ही केवळ एक जागा म्हणून माहित होती, त्याच्या अंतरंगांची जाणीवही नव्हती. मध्यमवर्गीय धारणांमुळे कामाठीपुरा म्हणजे वेश्यावस्ती, एवढीच मर्यादीत अक्कल ! पण १४ गल्ल्यांपैकी केवळ तीन गल्ल्या म्हणजे वेश्यावस्ती आणि पहिल्या १२ गल्ल्या आहेत त्या अपरिहार्यतेच्या नौकेत स्वच्छंद, बेफिकीर, क्वचित विकृतीच्या सर्वोच्च आविष्काराचे वारू शिडात भरून आपल्याच मस्तीत फिरणाऱ्या ! हे पुस्तक आवर्जून वाचा. कारण त्यातून कामाठीपुऱ्याबद्दल असलेलं कुतूहल शमण्यास नक्की मदत होईल.