उत्तम 'विद्यार्थी' बनलेली शिक्षिका

By Admin | Updated: December 27, 2014 19:09 IST2014-12-27T19:09:05+5:302014-12-27T19:09:05+5:30

योगाचा उत्तम विद्यार्थी व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते अनुभवजन्य ज्ञान. केवळ शिक्षकी भूमिकेतून शिकवण्याऐवजी आपल्याला मिळालेला आनंद दुसर्‍याला देणं, हे खरं जगणं आहे हे हेलेनला समजलं आणि जीवनाला खरी दिशा मिळाली..

The teacher who became the best 'student' | उत्तम 'विद्यार्थी' बनलेली शिक्षिका

उत्तम 'विद्यार्थी' बनलेली शिक्षिका

 डॉ. संप्रसाद विनोद

 
हेलेनला उत्तम योगशिक्षिका व्हायचं होतं.. त्यासाठी ती कठोर योगसाधनाही करत होती. खरा शिक्षक हा कायम विद्यार्थी राहणंच अधिक पसंत करतो. योगाचा उत्तम विद्यार्थी व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते अनुभवजन्य ज्ञान. केवळ शिक्षकी भूमिकेतून शिकवण्याऐवजी आपल्याला मिळालेला आनंद दुसर्‍याला देणं, हे खरं जगणं आहे हे हेलेनला समजलं आणि जीवनाला खरी दिशा मिळाली..
--------------
सकाळी उठून फ्रान्समधील योग केंद्राभोवतालच्या बागेत फिरत होतो, तेव्हा दोन मोठी कुत्री शेपट्या हलवत माझ्याकडे धावत येताना दिसली. ती प्रेमाच्या आणि मैत्रीच्या भावनेने माझ्याकडे येत असली, तरी त्यांच्या आकाराकडे पाहून त्यांनी प्रेमाने आपल्या अंगावर उडी मारली तर त्यांचं हे प्रेम आपल्याला झेपण्यासारखं असेल की नाही याचा मी अंदाज घेत होतो, इतक्यात ती माझ्याजवळ पोचलीदेखील! मला प्रश्न पडला की ओळख नसताना ती माझ्याबद्दल एवढं प्रेम का दाखवतायत? माझी दुभाषी कॅथरीनने खुलासा केला, की आठ वर्षांपूर्वी मी जेव्हा रियुनियनला आलो होतो, त्या वेळी ही कुत्री अगदी लहान पिल्लं होती. त्या वेळी मी त्यांना बाटलीने दूध पाजलं होतं. त्यांच्याशी खेळलो होतो. मी हे विसरलो असलो तरी त्यांनी ते लक्षात ठेवलं होतं. म्हणूनच, इतकी वर्षं गेली असली तरी त्यांनी मला ओळखलं होतं. मला खूप आश्‍चर्य वाटलं. मनात आलं, की विशुद्ध आपुलकीला आणि प्रेमाच्या स्पर्शाला मुकी जनावरं किती छान प्रतिसाद देतात! दोघांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं प्रेम व्यक्त केलं. माझ्या अंगावर उड्या मारल्या. हात चाटले. पाय चाटले. त्यांच्या वजनाने मी थोडा धडपडलो. पण, तरीही मी त्या दोघांना हे सगळं करू दिलं. माझ्याशी मनसोक्तखेळू दिलं. अगदी त्यांचं पूर्ण समाधान होईपयर्ंत!! जरा वेळाने प्रेमाचा आवेग ओसरल्यानंतर जशी आली होती तशीच ती दोघं उड्या मारत निघूनही गेली. खरं तर, माणूसही अशाच विशुद्ध प्रेमाचा भुकेला असतो. मला वाटलं, आपल्या अंत:करणात सर्व अस्तित्वाविषयी ‘विशुद्ध प्रेम’ जागृत झालं तर किती छान होईल! आपले त्या अस्तित्वाबरोबर वेगळ्या पातळीवरचे आंतरिक संबंध प्रस्थापित होतील आणि त्यातून त्या ‘अस्तित्वगत परमात्म्या’ची आपल्या हातून खूप चांगल्या प्रकारे सेवा होऊ शकेल.  
हे सगळे विचार माझ्या मनात येत असतानाच शुभ प्रभात असं म्हणत हेलेन ज्ॉकलीन माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली. ती एक अतिशय गंभीर चेहर्‍याची, कपाळावर मोट्ठी उभी आठी असलेली; पण मनापासून योगाचा अभ्यास करणारी व्यक्ती आहे. मला नेहमी ह्या गोष्टीचं आश्‍चर्य वाटतं, की साधना करणार्‍या लोकांचे चेहरे एवढे गंभीर का असतात? मान्य आहे की योगाभ्यास थोडा सूक्ष्म असतो. जरा कठीणही असतो. त्याला खूप वेळदेखील द्यावा लागतो. पण, त्याचा एवढा ताण कशाला घ्यायचा? आणि योगाभ्यास करूनही जर आपण एवढे तणावग्रस्त राहणार असू, तर असा योगाभ्यास तरी कशाला करायचा? हेलेनला उत्तम योगशिक्षिका व्हायचंय. योगाला वाहून घ्यायचंय. भारतातही मला तिच्यासारखे लोक नेहमी भेटतात. त्यांना लगेच शिक्षक व्हायचं असतं. पण, त्यासाठी प्रथम उत्तम विद्यार्थी व्हावं लागतं याचा त्यांना विसर पडलेला असतो. कारण, शिक्षक होऊन योगाचा व्यवसाय किंवा धंदा करण्याची त्यांची इच्छा असते. आणि व्यवसाय म्हटलं की कुठेही आपण कमी पडता कामा नये, अशी त्यांची भावना असते. अशी भावना असण्यातही काही गैर नाही. पण, योग हा खूप वेगळा विषय आहे. तो काही इतर विषयांसारखा भौतिक स्वरूपाचा विषय नाही. त्यामुळे, इतर विषयांसारखा त्याचा अभ्यास करता येत नाही, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. परिणामी, सगळीकडे जाऊन ते योगाविषयी सर्व प्रकारची माहिती गोळा करीत राहतात. सगळं आपल्याला समजलं नाही तरी चालेल; पण माहिती असलं पाहिजे असं त्यांना वाटतं. योग ही त्यांची पॅशन असते. काही वेळा ती फॅशनही असते. पण, योगविद्या ही पॅशनही नाही आणि फॅशनही नाही. ती एक जीवनपद्धती आहे; पण या लोकांना हे समजत नाही. त्यामुळे ते सतत माहिती गोळा करण्याच्या मागे लागतात. ती माहिती त्यांनी पचवलेली असतेच असं नाही. लोकांना प्रभावित करून आपल्याकडे आकर्षित करण्याचं एक साधन म्हणून ते या माहितीकडे किंवा ज्ञानाकडे पाहतात. मला त्यांची दृष्टी शॉपिंग करायला गेलेल्या ग्राहकांसारखी वाटते. मॉलमध्ये जे काही उपलब्ध असेल, त्यातलं देखील जे स्वस्त असेल ते गोळा करून ठेवण्यावर त्यांचा भर असतो. कुठे सेल लागलाय असं कळलं, की ही मंडळी तिकडे धाव घेतात. असं बरीच वर्षे केलं, की बरंच काही सामान त्यांच्याजवळ आपोआप गोळा होतं. त्या सामानालाच ते ज्ञान किंवा संपत्ती समजून चालतात आणि या संपत्तीचं प्रदर्शन करण्यावरच कायम भर देतात. कारण, त्यावरच त्यांचा व्यवसाय अवलंबून असतो. पण, हा गोळा केलेला माल म्हणजे काही योगाचं खरं ज्ञान नव्हे, हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा येतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. जीवनाचा बहुमूल्य वेळ वाया गेलेला असतो आणि पदरात फारसं काही पडलेलं नसतं. जी माहिती जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला जात नाही, अशी माहिती नुसती गोळा करून काय होणार? पण, त्यांना हे कोण सांगणार? कारण, सगळ्या समाजाप्रमाणेच या व्यक्तीदेखील उपयुक्ततावादाचा बळी ठरलेल्या असतात. उपयुक्तता हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. पूर्वी तो नव्हता असं नाही. कुठल्याही काळात उपयुक्ततेचा विचार करूनच माणूस कृती करतो; पण आता त्याचं महत्त्व प्रमाणाबाहेर वाढल्यासारखं वाटतंय. प्रत्येक गोष्टीचा मला त्याचा भौतिक उपयोग किंवा भौतिक फायदा काय? या दृष्टीनेच हल्ली प्राधान्याने विचार केला जातो असं दिसतं. याचं मुख्य कारण आहे- उपभोगवाद. उपभोग नेहमीच माणसाला उपभोग्य वस्तूंच्या अधीन करतो. मग, त्या वस्तूंखेरीज त्याचं चालेनासं होतं. याचाच फायदा बाजारातील शक्ती (ें१‘ी३ ा१ूी२) घेऊ लागतात. माणूस त्या वस्तूंमध्ये आणखी कसा अडकेल याची व्यवस्था या शक्ती करतात. त्याच्या अडकलेपणावरच त्यांचा धंदा व फायदा अवलंबून असतो. असंच काहीसं हेलेन जॅकलीनचं झालंय, असं मला वाटलं. त्यामुळे तिच्याशी खूप विस्ताराने बोलावं लागलं. तिला समजावून सांगितलं, की तुला उत्तम शिक्षक व्हायचंय ही फार चांगली गोष्ट आहे. पण, त्यासाठी तुला प्रथम उत्तम विद्यार्थी व्हावं लागेल. तू जसजशी उत्तम विद्यार्थी होत जाशील, तसतसे तुझ्यात उत्तम शिक्षक होण्यासाठी लागणारे गुण आपोआप निर्माण होत जातील. मी तर असं म्हणेन, की खरा शिक्षक हा कायम विद्यार्थी राहणंच अधिक पसंत करतो. योगाचा उत्तम विद्यार्थी व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते अनुभवजन्य ज्ञान. ते मिळवण्यासाठी जे वाचलंय ते नीट समजून घ्यायला हवं. त्यावर सखोल मनन, चिंतन व्हायला हवं. त्याचं र्मम समजून घेण्यावर भर द्यायला हवा. त्यासाठी वृत्तीत प्रयोगशीलता हवी - म्हणजे करून पाहण्याची तयारी हवी. शिकण्याची तळमळ हवी. मन मोकळं हवं- असं मन ज्याच्यात कुठलेही पूर्वग्रह नाहीत- निर्मळ भावनेने जे माहितीच्या मागे दडलेल्या सत्याचा शोध घेऊ शकतं. त्यासाठी खूप धीर धरण्याची तयारी ठेवावी लागते. वस्तूचं अंतरंग समजून घ्यायचं असेल तर त्या वस्तूच्या बाह्यरूपात अडकून न पडण्याची क्षमता अंगी यावी लागते. जे सत्य समोर येईल ते पाहण्याची आणि त्याच्याशी सदैव प्रामाणिक राहण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. विशेषत:, आपल्याशी आणि आपल्याला येणार्‍या अनुभवांविषयी नितांत प्रामाणिक राहावं लागतं. आपण कुठल्याही भ्रमात तर सापडत नाही ना, याबाबत सदैव जागरूक राहावं लागतं. अतिशय विनम्र भावनेने हे सगळं करावं लागतं. आपण जे अनुभवलंय तेवढंच बोलायची सवय ठेवावी लागते. असं केल्याने तुझं अंतरंग आपोआप विशुद्ध ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघेल. या ज्ञानाचा प्रकाश तुझ्या वागण्याबोलण्यातून आपोआप प्रकट होऊ लागेल. आजूबाजूच्या लोकांना तुझं वेगळेपण सहजच लक्षात यायला लागेल. त्यांना तुझ्याशी बोलावंसं वाटू लागेल. संवाद साधावासा वाटेल. त्यातूनच तुझ्या अनुभूतिजन्य ज्ञानाचा इतरांबरोबरचा सहयोग सुरू होईल. असं होणं म्हणजे उत्तम शिक्षक होणं आहे. असं शिक्षक होण्यावरच तू भर द्यावास, अशी माझी तुला विनंती आहे.
सुदैवाने, तू नर्स आहेस. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेस. स्वत:च्या पायांवर उभी आहेस. त्यामुळे तुला योगाकडे एक चरितार्थाचं साधन म्हणून न पाहता एक साधना म्हणून पाहणं सहजशक्य आहे. शिवाय, तू जर तुझ्या कामाकडे नुसतं काम म्हणून न पाहता रुग्णसेवेद्वारे रुग्णांमधल्या परमेश्‍वराची सेवा करण्याचं साधन म्हणून पाहिलंस, तर त्यातून तुला खूप समाधान मिळेल. तुझा कामातला आनंद शतपटीने वाढेल. काम अधिकाधिक चांगलं होत जाईल. त्यातून तुझा भौतिक अभ्युदय आपोआप होत राहील. विशुद्ध सेवाभावनेचा सहज परिणाम म्हणून तुझी चित्तशुद्धीही होत राहील. तुझं कामच तुझी योगसाधना होईल. शब्दांच्या मागे दडलेलं रहस्य समजून घेण्याची क्षमता तुझ्यामध्ये हळूहळू जागृत होत जाईल. अशी क्षमता योगाचं रहस्य समजून घेण्यासाठी फार आवश्यक असते. त्यातूनच तुझी खरीखुरी आध्यात्मिक प्रगती होईल आणि लोकांबरोबर तू विशुद्ध अध्यात्म, विशुद्ध योग ‘शेअर’ करू शकशील. त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकशील. दुसर्‍यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केल्याने आपला आनंद शेकडो, हजारो पटीने वाढत जातो. तुझं देणं वाया जाणार नाही. उलट, ते सार्थक ठरेल.
मी हे सर्व तिला अतिशय तळमळीने आणि मनापासून सांगितलं. तिनेही ते मन लावून ऐकलं. शेवटी, तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुरू झाल्या. ती म्हणाली, की इतकं चांगल्या प्रकारे मला हे कोणीच आत्तापयर्ंत समजावून सांगितलं नव्हतं. तिच्या अंत:करणात विशुद्ध अध्यात्माचं बीज पेरलं गेल्याचं समाधान मला मिळालं. हे घडून येण्यास मी निमित्त ठरलो. 
 
‘योगकथा’ हे सदर जुलैमध्ये सुरू झालं आणि म्हणता म्हणता सहा महिने संपून गेले. कथारूपाने अगदी सोप्या भाषेत योगविद्येच्या मूलगामी, जीवनस्पश्री आणि जीवनव्यापी स्वरूपाची जनसामान्यांना ओळख करून द्यावी हा त्यामागचा विनम्र हेतू होता. योग हे फक्त आरोग्यप्राप्तीचं आणि उपचाराचं साधन नाही, तर ती एक परिपूर्ण अशी जीवनशैली आहे, असा महत्त्वाचा संदेश या निमित्ताने लोकांपयर्ंत पोचवता आला. माझ्या दृष्टीने हे समाधान फार मोठं आहे. वाचकांनी देखील या लेखमालेला भरभरून प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या सर्व भागांतून फोन करून, ई-मेलद्वारा, व्हॉट्सअँपमधून, व्यक्तिगत भेट घेऊन लोकांनी लेख खूप आवडत असल्याचं सांगितलं. काही कथांमधून समाजाला भेडसावणार्‍या प्रश्नांना वाचा फोडता आली. ‘अभिजात योगसाधना’ हा सर्व प्रकारच्या मानवी समस्यांवरील एक अत्यंत प्रभावी आणि मूलभूत उपाय आहे, हे सत्य लोकांपयर्ंत ‘लोकमत’च्या माध्यमातून पोचवता आलं. ही संधी दिल्याबद्दल ‘लोकमत’ समूहाचा मी अत्यंत ऋणी आहे. ‘लोकमत’च्या असंख्य वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांनाही मन:पूर्वक धन्यवाद !!
(लेखक महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे योगगुरू आहेत.) 
(समाप्त)

Web Title: The teacher who became the best 'student'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.