बिनचाकी जगण्याची लक्षपावली.

By Admin | Updated: August 8, 2015 13:31 IST2015-08-08T13:31:16+5:302015-08-08T13:31:16+5:30

काही गर्भार, काही लेकुरवाळ्या बाया, 20-25 माणसांचं कुटुंब. पल्ला कोसांचा. अनवाणी पायांतळीचे दगडगोटे वाटेची ओळख पटवत होते. नजर दूरच्या गवतातली जीवघेणी ‘चट्टेरीपट्टेरी’ हालचाल टिपत होती. दृष्टीपल्याडच्या वणव्याची नाकाला खबर होती. चालता-चालताच फळं-मुळं-पानं खाताना विषारी चव पारखायला जीभ समर्थ होती. ऋतू बदलला, एका ठिकाणची सुगी सरली की फिरतीचा तळ पुन्हा बदलायचा.

Targeting of uninterrupted living. | बिनचाकी जगण्याची लक्षपावली.

बिनचाकी जगण्याची लक्षपावली.

>किमान सव्वा लाख वर्षापासून माणूस फिरतोच आहे. आधी अन्नासाठी, मग उत्सुकतेसाठी आणि मग कशाकशासाठी अखंड चालू असलेल्या माणसाच्या या वणवण प्रवासाचा माग काढणा:या पाक्षिक लेखमालेतला तिसरा लेख.
 
 डॉ. उज्ज्वला दळवी
 
पायांवर पोट
दिवस सुगीचे संपुनि गेले,
अन्न पुरेना, पुढे चला रे ॥
तळावर धामधूम चालली होती. भोवतालच्या परिसरातला मोसमी सुकाळ संपला होता. आता लवकरात लवकर बाडबिस्तरा आवरून पुढच्या सुकाळी मुक्कामाला जाऊन पोचायचं होतं. धुरी देऊन टिकवलेलं उरलंसुरलं अन्न वाटेत निकडीपुरती शिदोरी म्हणून पुरलं असतं. तशी निकड बहुधा लागणार नव्हती. रोजच्या कामाची मोठी हत्त्यारं, कष्टाने घडवलेली धाकटी धारदार आयुधं आणि चंची-बटव्यातल्या दुर्मीळ वनौषधी यांच्यातलं मात्र काहीही मागे राहून चालणार नव्हतं. वडीलधा:यांच्या देखरेखीखाली कत्र्या तरु णांनी सामान बांधलं, गुहा साफसूफ केली. लहानथोर-प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणो बोजा डोक्यावर घेतला. जाणत्या आणि कत्र्याच्या मागून सरासर चालणारी मुलं, तीन गर्भार बाया आणि कडेवर तान्हं घेतलेल्या दोघी लेकुरवाळ्या असं ते वीस-पंचवीस माणसांचं कुटुंब झपाझप मार्गी लागलं.  
पल्ला कोसांचा होता. थोडय़ा अंतरानंतर पायवाटा विरल्या. जाणत्यांच्या आठवणीतला नकाशा, झाडा-झुडपा-दगडांतून हेरलेल्या खुणा आणि सूर्याने दिलेला दिशेचा अंदाज इतक्यावरून कर्ते मार्ग ठरवत होते. कुठल्याही एका ज्ञानेंद्रियावर अवलंबून राहणं शक्य नव्हतं. अनवाणी पायांतळीचे दगडगोटे वाटेची ओळख पटवत होते. नजर दूरच्या सोनसळी गवतातली जीवघेणी चट्टेरीपट्टेरी हालचाल टिपत होती. माकडांनी दिलेला ‘किचकिच’ इशारा कानांना सावध करत होता. दृष्टीपल्याडच्या रानातल्या वणव्याची नाकाला खबर होती. चालता-चालताच दोन्ही हात फळं-मुळं-पानं तोडत-उपटत-खुडत होते. त्यांच्यातला विषारी माल चवीवरून पारखायला जीभ समर्थ होती. उपयोगाचा निवडक ऐवज कडोसरीच्या कातडी कशांत साठत होता. कुठल्याही क्षणी झडप घालायला काळ टपून बसलेला असताना, कोणत्याही कामाची भिस्त एकाच माणसावर ठेवणं रास्त नव्हतं. प्रत्येकाला सगळी कामं येत होती. तरीही प्रवासात जाणत्या वडीलधा:यांचा सल्ला मोलाचा होताच.
वाट बिनधोक नव्हती पण अनोळखीही नव्हती. मळलेली नसली तरी ठरलेली होती. ऋतू बदलला, एका ठिकाणची सुगी सरली की अनेक कोस चालून दुस:या ठरलेल्या सुकाळी भागात वस्तीला जाणं, वर्षभरात तशा दोन-तीन ठिकाणी फिरतीचे तळ ठोकत पुन्हा मूळ मुक्कामी सुकाळ-स्वागताला हजर होणं ही त्यांच्या बिनचाकी जगण्याची चाकोरी होती. 
दीड लाख वर्षांपूर्वी मानवजात जन्माला आली. तेव्हापासून दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या, सव्वा लाख वर्षांहून मोठय़ा कालपर्वात पारधी-शोधी वृत्तीच्या समस्त मानवजातीने, स्थलांतर करणा:या पक्ष्यांप्रमाणो, मोसमांनुसार मुक्काम बदलत कित्येक कोसांच्या वार्षिक येरझा:या घातल्या. त्यांचा मागोवा घेताना पुरातत्व शास्त्रज्ञांना गुहांमध्ये भित्तीचित्रं, आयुधं आणि अश्मीभूत (fossilized) देह सापडले. त्यांचं नेमकं ऐतिहासिक वय वैज्ञानिक तंत्रंनी ठरवलं. जेनेटिक्सने नात्यागोत्यांचे तपशील भरले. मानस शास्त्रज्ञांनी माकडांचा आणि समाज शास्त्रज्ञांनी सध्या अस्तित्त्वात असलेल्या पारधी-शोधी जमातींचा अभ्यास केला. सा:याचं तुकडी कोडं जुळवल्यावर संशोधकांना त्या पुरातन लक्षपावलीबद्दल आडाखे बांधता आले.
प्रवासाला निघालेल्या त्या कुटुंबात अगदी जवळच्या नात्याची वीस-पंचवीस माणसंच होती. पण त्यांच्याशी जरा दूरचं नातं असलेल्या अनेक कुटुंबांची मिळून एक जमात होती. तिच्यातली कुटुंबं लाखो एकरांच्या प्रदेशात विखुरलेली होती. त्या सा:यांची भाषा जवळजवळ एकसारखीच होती. अधूनमधून त्यांचा एकत्र मेळावा भरे. त्याला प्रत्येक कुटुंबातून काही प्रतिनिधी हजेरी लावत. त्यासाठी त्यांना अधिक दूरचा, अनोळखी प्रदेशातला खडतर प्रवास करावा लागे. मेळाव्यात लग्नं ठरत, वेगवेगळ्या प्रदेशांतल्या आयुधांची, अनुभवांची आणि काही कुटुंबांच्या गरजेसाठी कसबी तरुण पुरुषांचीही देवाणघेवाण होई. 
जमातीतल्या प्रत्येक कुटुंबाचा ‘स्वत:चा’ म्हणता येईल असा हजारो एकरांचा सवता सुभा होता. तेवढय़ा विस्तीर्ण प्रदेशात मिळणारं सारं गरजेनुसार वापरायची त्यांना पूर्ण मुभा होती. पण चुंबळीवरच्या बि:हाडात चंगळीला, हावरट हक्काला वाव नव्हता. त्यांच्या गरजा ‘दो कराने घेण्या’पुरत्याच मर्यादित होत्या. निसर्गाच्या अमाप समृद्धीवर सार्वभौम हक्क गाजवू शकणारी ती अल्पसंतुष्ट माणसं ख:या अर्थाने सुखी होती.
प्रत्येक नव्या मुक्कामाच्या सुरुवातीला अन्नाची सुबत्ता असे. बिया-ससे-मासे भाजून खायला उसंत मिळे. शिळोप्याची, वेळखाऊ पण अत्यावश्यक कामं करायला थोडी फुरसत मिळे. पुरु ष दगडा-हाडांना धार काढून नवी हत्त्यारं घडवत. तीच ओबडधोबड हत्त्यारं वापरून बायका कातडी साफ करत आणि त्यांच्या पोतडय़ा-पखाली-पिशव्या बनवत. तरी तिथेही ‘खाटल्यावरी देणारा हरी’ नव्हताच. ‘चालत्याला घास लाभे’ हाच मूलमंत्र होता. चालता-चालता चरण्याच्या सवयीमुळे प्रत्येक घास वेगळ्या प्रकारचा, नव्या चवीचा होता. 
मोठय़ा शिकारीच्या मर्दुमकीची हौस भागवणंही तेव्हाच जमे. तिथेही पळण्याला पर्याय नव्हता. भर दुपारच्या टळटळीत उन्हात रान उठवून जनावराला कळपापासून अलग करायचं आणि मग त्याला वीस-पंचवीस मैल सतत पळतं ठेवायचं असा त्यांच्या शिकारीचा खाक्या होता. सतत चालत-पळत असल्यामुळे पारधी-शोधी माणसांच्या पायांचे स्नायू ऑलिम्पिक धावपटूंसारखे कमावलेले, तयार होते. त्यांचं चवडय़ावर जोर देत धावायचं तंत्र श्रम वाचवायला किफायतशीर होतं. शिवाय पाण्याने भरलेला, शहामृगाच्या अंडय़ाचा किंवा कातडी बुधला जवळ बाळगून, मधूनमधून पाणी पीत आणि तोंडावर मारत शिकारी धावपटू फारसा तगमगत नसे. सर्वांग घामेजण्याचा त्याचा गुण त्याचं अंग फार तापू देत नसे. त्या सगळ्याच्या अभावी ते जनावर मात्र उष्म्याने आणि श्रमांनी क्लांत होऊन कोसळे. मग त्याला मारणं सोपं होई. शिकार सगळ्यांमध्ये सारखी पुरवून खाल्ली जाई. त्यात ‘तुझं-माझं’ होत नसे.
सतत झपाझप चालणं ही त्यांच्या जगण्याची मूलभूत गरज होती. लेकुरवाळ्या बाईला एका वेळी दोन मुलं कडेवर घेऊन भरभर चालणं शक्य नाही. म्हणून मूल चांगलं चार-पाच वर्षांचं होईतोवर त्याला अंगावर पाजून पाळणा लांबवायची प्रथा होती. कधी आडाखे चुकले आणि कुटुंबनियोजन बिनसलंच तर कुटुंबाच्या हितापुढे अर्भकहत्त्येचं पापही पत्करत असावं!
नियमित व्यायाम आणि  बहुरस आहार असल्यामुळे त्यांची उंची सध्याच्या माणसापेक्षा थोडी अधिकच होती. सतत दोन पायांवर चालणा:या त्या माणसांनी कुठलेही चार पायांचे प्राणी पाळले नव्हते. नंतर, गाय-घोडा-शेळ्यांसोबतच आलेले साथीचे रोग अजून ‘माणसाळले’ नव्हते. त्यामुळे पारधी-शोधी कुटुंब रोगमुक्त, निकोप प्रकृतीचं होतं. जगण्यासाठी जरु रीच्या असलेल्या प्रत्येक कामात पारंगत असणं त्यांना अत्यावश्यक होतं. शिवाय कुटुंबाच्या सवत्या सुभ्याचा काटेकोर नकाशा आणि त्यातल्या कातळा-झाडा-झुडपांच्या खुणा त्यांच्या मनात सदैव स्वच्छ असत. पूर, वणवे वगैरे नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यायलाही ते सज्ज असत. क्षणोक्षणी हिंस्त्र श्वापदांचा कानोसा घ्यायला, विषारी वनस्पती पारखायला पाची ज्ञानेंद्रियं आणि अतींद्रिय जाणिवाही तल्लख ठेवल्यामुळे त्यांचा मेंदू आधुनिक माणसापेक्षा अधिक मोठा होता. 
त्या सुदृढ, समर्थ माणसांच्या सव्वा लाख वर्षांच्या निर्भर भ्रमंतीची थोडीतरी एपिजेनेटिक नोंद आधुनिक माणसाच्या जनुकांपर्यंत पोचलेली असणारच. एकविसाव्या शतकातल्या प्रवासप्रेमाचा उगम त्या अनुवांशिक स्मरणवहीतूनच झाला असावा.
 
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये 
वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ 
आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ 
ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 
‘मानवाचा प्रवास’ हा गेली 
दोन दशके त्यांच्या वाचनाचा, 
संशोधनाचा विषय आहे.)
ujjwalahd9@gmail.com

Web Title: Targeting of uninterrupted living.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.