शासकीय सेवेतले यश

By Admin | Updated: July 26, 2014 12:36 IST2014-07-26T12:36:24+5:302014-07-26T12:36:24+5:30

शासकीय सेवेत असाल, तर फक्त स्वत:च्याच उन्नतीचा नव्हे, तर एकंदर समाजाच्याच उन्नतीचा विचार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. फक्त स्वत:चाच विचार करणे कमी करून आपले काम आणि वर्तन हे सर्वांच्याच फायद्याचे कसे होईल, याचा विचार करण्यावर भर द्यावा

Success in government service | शासकीय सेवेतले यश

शासकीय सेवेतले यश

- भीष्मराज बाम 

 
मी शासकीय सेवेत आहे. काही महिन्यांपूर्वी माझ्या वरिष्ठांची बदली झाली. नवे अधिकारी विचित्र स्वभावाचे आहेत. तोंडपूज्या लोकांच्या सल्ल्याने वागतात. त्यामुळे फार त्रास होतो. मला अलीकडे राग फार लवकर येतो आणि काहीही बोलले जाते. त्यामुळे संबंध दुरावले आहेत. त्यातून माझ्या एका प्रिय व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला. मन निराश राहते. पूर्वी असे नव्हते. काय करावे?
 
- शासकीय सेवेत आपली स्वत:चीच बदली आपल्या हातात नसते, तर वरिष्ठ कोण असावा ते आपल्याला कसे ठरवता येईल? आपले सहकारी, नेमणुकीची जागा, हाताखालचे लोक हेसुद्धा कोण आणि कसे असावेत ते आपण ठरवू शकत नाही. त्यांनी कसे वागावे, हेही आपल्या नियंत्रणाखाली नसते. आपला प्रतिसाद आपण नियंत्रित करायला हवा. तोच फक्त आपल्या हातात असतो. आपला मूड आपणच सांभाळायला हवा. तुमचा स्वत:वरचा ताबा सुटत चालला आहे, असे दिसते. स्वभाव चिडखोर होणे, हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. पूर्वी असे नव्हते, हे तुम्हीच नमूद केलेले आहे. म्हणजे आपले मूड इतरांवर अवलंबून राहायला नकोत, हे शहाणपण तुमच्यामध्ये आहे. मात्र, बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे तुम्हाला अवघड जात आहे.
संबंध दुरावण्याइतके तुमचे स्वत:वरचे नियंत्रण गेलेले आहे. ही तर धोक्याची घंटा आहे. काहीही बोलले जाते म्हणजे बोलून झाल्यावर आपण असे बोलायला नको होते, याची तुम्हाला जाणीव होत आहे. चांगले आयुष्य जगण्यासाठी इतरांशी संबंध नीट सांभाळता यायला हवेत. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या बाबीला जास्त महत्त्व दिले गेले पाहिजे. मुळात तुमचे अवधान कशावर असायला हवे ते ठरवण्याची तुमची शक्तीच नाहीशी झाली आहे. तुम्ही जे बोलणार असाल, ते देहबोलीसारखेच आपला आतला भाव प्रकट करायला लागते. आपल्या बोलण्यावर नियंत्रण नसणे म्हणजे नंग्या तलवारी फिरवत गर्दीतून चालण्यासारखे आहे. जिभेचे घाव हे तर तलवारीच्या घावापेक्षाही जास्त खोल जातात. ज्यांना ते झाले असतील, ते लोक तुम्हाला सहजासहजी क्षमा करणार नाहीत. मग ते दुरावणारच.
फक्त शासकीय सेवेतच नव्हे, तर कोणत्याही व्यवसायात असलात, तरी तुम्हाला अशा प्रसंगांना तोंड द्यावेच लागणार. मलाही माणुसकी जागी ठेवून काम करणारे फार थोडे अधिकारी भेटले. त्यांच्यापैकी एकाने दिलेला सल्ला मला माझ्या आयुष्यात खूप उपयोगी पडला. तोच कदाचित तुम्हालाही उपयोगी पडेल, असे वाटते. त्यांनी मला सांगितले होते, जगात माणसे अशीच असतात. सर्व जग सुधारेल तेव्हाच मीही चांगले काम करून दाखवीन, हा अत्यंत चुकीचा दृष्टिकोन आहे. इतर सारे कसेही असले, तरी मी कसे असावे आणि कसे व्हावे ते मीच ठरवायचे आहे. आपल्या वाट्याला आलेले काम उत्तम कसे करता येईल, आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात सुधारणा कशी होत जाईल, आपण समाजाच्या जास्तीत जास्त उपयोगी कसे पडू या सर्व मुद्दय़ांचा विचार होत राहायला हवा. आपली जबाबदारी आपणच संभाळायला हवी. आपले काम चोखपणे करीत राहिले, तर आपल्याविरुद्ध असलेले लोकही आपल्याला अनुकूल व्हायला लागतात असा माझा तरी अनुभव आहे.
मन निराश आणि उद्विग्न राहू दिले, तर अडचणी सहन करण्याची आपली शक्ती कमी होत जाते. प्रिय व्यक्तींच्या मृत्यूसारखे आघात होतच राहणार आहेत. ते सहन करण्यापलीकडे आपल्याला दुसरे काय शक्य आहे? आपला दृष्टिकोन नकारात्मक झाल्यास आपल्याच व्यक्तिमत्त्वात खोट येते. तसे होऊ देता कामा नये. आपले शरीर आणि मन कणखर असावे, हे पाहण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. जेवढा वेळ मिळेल, तेवढा योगासाठी, व्यायामासाठी काढावा. मित्र जोडावेत, आपले छंद जोपासावेत. अध्यात्म हाही एक उत्तम छंद आहे. वाचावे, लिहावे, ज्ञानाची आणि अनुभवाची देवाणघेवाण हा मनुष्यजातीला मिळालेला सर्वांत उत्कृष्ट ठेवा आहे.
आठवड्यातून काही वेळ तरी डायरी लिहिण्यासाठी दिला पाहिजे. आपले चांगले अनुभव स्मरणातून निसटून जातात. ते लिहून काढण्यावर कटाक्ष ठेवावा. आपल्या संपर्कात येणार्‍या व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि वागणूक यांचा अलिप्तपणे अभ्यास करण्याचा छंद लावून घ्यावा. तुमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा विचित्र स्वभाव आणि त्यांच्या जवळ असणार्‍या लोकांचा तोंडपुजेपणा तुमच्या लक्षात आला आहे; पण त्यासाठी त्यांना कंडम करून टाकून त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे तुमच्यासाठीच नुकसानीचे ठरेल. प्रत्येक माणसामध्ये गुण आणि दोष हे दोन्ही असतातच. इतरांच्या गुणांवर अवधान ठेवता येणे हे संबंध चांगले ठेवण्याच्या दृष्टीने फार गरजेचे आहे. मला आठवते, बर्‍याच वरिष्ठ अधिकार्‍यांशी माझे मुळीच पटले नाही; पण मी प्रयत्नाने गुणांवर अवधान ठेवण्याची सवय लावून घेतली होती. त्यामुळे त्या बहुतेकांकडून मला बरेच काही शिकता आले.
तुम्ही शासकीय सेवेत आहात. फक्त स्वत:च्याच उन्नतीचा नव्हे, तर एकंदर समाजाच्याच उन्नतीचा विचार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. ती साधण्यासाठी आपले चित्त उद्विग्न होऊ न देता उत्तम कार्य करण्याचा उत्साह तुमच्यामध्ये असायला हवा. तो जर नसला, तर तुम्ही चांगले शासकीय अधिकारी होण्याची शक्यता कमीच असेल. फक्त स्वत:चाच विचार करणे कमी करून आपले काम आणि वर्तन हे सर्वांच्याच फायद्याचे कसे होईल, याचा विचार करण्यावर भर द्यावा. 
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Success in government service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.