विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलाय

By Admin | Updated: June 7, 2014 18:53 IST2014-06-07T18:53:24+5:302014-06-07T18:53:24+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. हा निकाल मंडळाच्या इतिहासात विक्रमी ठरला आहे. या उच्चांकी निकालाची नेमकी कारणे काय? काय आहे त्याचे रहस्य, याचा उहापोह.

The students' confidence has increased | विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलाय

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलाय

 नरेंद्र पाठक

 
दोन वर्षांपूर्वी शिक्षण मंडळाने बारावी अभ्यासक्रमात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार परीक्षेचा ८0 : २0 फॉर्म्युला लागू झाला आहे. ८0 गुणांची परीक्षा आणि २0 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात येत आहे. अभ्यासक्रमात बदल झाल्याने गणित, इंग्रजी विषयांची विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती कमी झाली आहे. या विषयांमध्ये अधिक विद्यार्थी नापास होत. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडे. यातून विद्यार्थी आत्महत्या करायचे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी भयभीत झालेले पाहण्यास मिळायचे. 
आपल्याला परीक्षा जमणार नाही, नापास होऊ, अशी भीती अनेक विद्यार्थ्यांमध्ये असे. परंतु, आता सुधारित अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्‍वास मिळालाय. अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांचे वाचन, श्रवणकौशल्य वाढणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली न्यूनगंडाची भावना कमी होऊ लागली आहे. नवीन बदलाचा परिणाम यंदाच्या निकालात पाहण्यास मिळाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना या अभ्यासक्रमाचा अधिक फायदा होतोय. ग्रामीण भागातील अधिक मुले गणित आणि इंग्रजी विषयात नापास होत. पण, सुधारित अभ्यासक्रमाचा फायदा ग्रामीण भागासह शहरी विद्यार्थ्यांनाही झाला नाही. काही मंडळींकडून नवीन परीक्षा पद्धतीवर टीका होतेय. पण, शिक्षकांनी या पद्धतीला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. त्याची योग्य अंमलबजावणी करत शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आवश्यक तयारी करून घेतली पाहिजे.
राज्याचा निकाल ९0.0३ टक्के लागला आहे. मंडळाची ही मोठी कामगिरी आहे. पण, मुंबई विभागाचा निकाल कमी लागला आहे, याला कारणही तसेच आहे. मुंबई मंडळाचे क्षेत्र मुंबई, ठाणे, रायगड असे व्यापक आहे. या क्षेत्रात सर्व भाषिक विद्यार्थी आहेत. त्यामुळे मंडळावर कामाचा व्याप असल्याने मंडळाचे शाळांवर असलेले नियंत्रण कमी झाले आहे. राज्यामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनींसाठी ही चांगली गोष्ट आहे. शिक्षणाचा हक्क त्यांना मिळालाय. मुली करिअर ओरिएंटली, ध्येयाने अभ्यास करतात. त्यामुळे त्यांची गुणवत्ता परीक्षांमध्ये सिद्ध होते. त्या मुलांच्या तुलनेत उजव्या ठरतात. मंडळाने गुणदानामध्ये पारदर्शकता आणण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पूर्वी निकाल असमाधानकारक लागल्यास गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्याने अर्ज केल्यास त्याला नो -चेंज असे उत्तर मंडळाकडून देण्यात येई. पण, आता मंडळाने उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत देण्याचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्याने लिहिलेला आणि शिक्षकाने तपासलेला पेपर विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे निकालात अन्याय झाल्याचे वाटत असल्यास विद्यार्थ्याला मंडळाकडे दाद मागता येत आहे.
राज्य शिक्षण मंडळापेक्षा कित्येक पटीने मुंबई विद्यापीठ लहान आहे. मुंबई विद्यापीठात दर वर्षी पेपरफुटी, चुकीचे पेपर देणे असा गोंधळ असतोच. पण, विद्यापीठापेक्षा कित्येक पटीने मोठय़ा असलेल्या शिक्षण मंडळात असा गोंधळ होत नाही. परीक्षेसह निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया मंडळ खूप चांगल्या पद्धतीने पार पडते. देशपातळीवर घेण्यात येणार्‍या इंजिनिअरिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठीही मंडळाने अभ्यासक्रमाला चांगले वेटेज दिले आहे. यामध्ये मंडळाचे विद्यार्थीही चांगले यश मिळवत आहेत. 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दहावी-बारावीचा अभ्यासक्रम देशपातळीवर एकच असावा, असा निर्णय घेतला आहे. यामध्ये गणित, विज्ञान हे विषय देशपातळीवर समान असावेत, असाही निर्णय झाला आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची देशभरातील विद्यार्थ्यांंशी स्पर्धा निर्माण झाली आहे. राज्यातील मुले राज्याबाहेर जाऊन देशस्तरावर स्पर्धेत उतरली आहेत. त्यामुळे राज्याने गुणवत्तेशी तडजोड करून चालणार नाही.
राज्याचे शिक्षण खेड्यांपर्यंत आहे. त्यामुळे सर्वांंना शिक्षण देणे आणि त्यानंतर गुणवत्ता असे मंडळाचे धोरण होते. परंतु, सुधारित अभ्यासक्रमात मंडळाने चांगले बदल केले आहेत. विज्ञान, गणित, बायोलॉजी, वाणिज्य या अभ्यासक्रमांत सुधारणा झाल्याने मंडळाचा विद्यार्थी देशपातळीवर चांगली स्पर्धा करू लागलाय. मंडळाने  सुधारित अभ्यासक्रम आणून देशभरातील अभ्यासक्रमात समानता आणली आहे. मंडळाने सुधारित अभ्यासक्रम राबविताना शिक्षकांसाठी प्रशिक्षणे राबविली. याचाही परिणाम निकालात दिसून आला आहे. २0१0-११ या शैक्षणिक वर्षापर्यंंत बारावीला मंडळाची पाठय़पुस्तके नव्हती. त्यामुळे उपलब्ध लेखकांची पुस्तके विद्यार्थ्यांंना वाचावी लागत. मंडळाने सुधारित अभ्यासक्रमासह क्रमिक पाठय़पुस्तके आणली. यामुळेच विद्यार्थ्यांंमध्ये गुणवत्ता आल्याने राज्याचा निकाल उंचावला आहे. सुधारित अभ्यासक्रमामुळे यापूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांंवर अन्याय झाला, असे म्हणता येत नाही. व्यवस्था परिवर्तन काळानुरूप होत असते. त्याप्रमाणे शासन व्यवस्थेत बदल होत आहे. शिक्षणाची कोणतीही पद्धत दीर्घ काळ चालत नाही. काळानुसार सर्व क्षेत्रांत बदल अपेक्षित असतात. नवीन शोधानुसार व्यवस्थेत बदल होतात. त्यामुळे शिक्षणातील कोणतीही पद्धत दीर्घ काळासाठी ठेवू नये. आताच्या आव्हानांनुसार मंडळाचा अभ्यासक्रम योग्य आहे; परंतु काळाच्या ओघात नवीन पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. 
(लेखक एस. के. सोमय्या विनय मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.)
(शब्दांकन : तेजस वाघमारे)

Web Title: The students' confidence has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.