रात्री रस्त्यावर

By Admin | Updated: March 1, 2015 15:51 IST2015-03-01T15:51:43+5:302015-03-01T15:51:43+5:30

युरोप आणि व्हिएतनाममधल्या सिनेमाच्या पडद्यावर दिसणारं तरुण रात्रींचं ‘ताजं’ आणि अस्वस्थ जग

On the street at night | रात्री रस्त्यावर

रात्री रस्त्यावर

 अशोक राणे

 
युरोप आणि व्हिएतनाममधल्या सिनेमाच्या पडद्यावर दिसणारं तरुण रात्रींचं ‘ताजं’ आणि अस्वस्थ जग
----------------
दिवसाउजेडी लोक असलेलं- नसलेलं शहाणपण, भान सोडून वागतात, वावरतात, गैरव्यवहार करतात अशा मुंबई नामक महानगरात ‘नाइटलाइफ’ अर्थात रात्रजीवनाला कायद्याने परवानगी देण्याचा प्रस्ताव या महानगरातल्या युवा नेत्याने ठेवला, तेव्हा मी समुद्रापारच्या बर्लिनमध्ये याच विषयावरचे सिनेमे पाहत होतो, हा एक भलताच ‘रंगीन’ योग म्हणायचा! 
बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘अँज वुई वेअर ड्रीमिंग’, ‘व्हिक्टोरिया’ आणि ‘बीग फादर, स्मॉल फादर अँड अदर स्टोरीज’ - हे तीन सिनेमे पाहताना मनाशी एकच विचार येत राहिला. नाइटलाइफची मागणी करणार्‍यांना ना यातलं गांभीर्य कळलं, ना त्याला विरोध करणार्‍यांना..! तिकडे पश्‍चिमेकडे जे जे काही घडतं त्याचं अनुकरण (फक्त अनुकरणच) करणार्‍यांना आणि ते तसं का करताहेत याचं नीट आकलन करून न घेता नुसती आदळआपट करणार्‍यांना शंतनुराव किलरेस्करांच्या एका वाक्याची आठवण करून द्यायला हवी. ते म्हणाले होते, ‘आपण युरोपकडून औद्योगिक क्रांतीने दिलेली यंत्रे घेतली, यंत्रसंस्कृती मात्र घेतली नाही.’
याच बर्लिनवारीत एका र्जमन मित्राच्या घरी मला जेवायला बोलावलं होतं. तीन तरुण जोडपी, त्यांची पाच-सहा वर्षांची मुलं आणि माझ्यासोबत प्रथमच युरोपात आलेला माझा तरुण मराठी मित्र. यावेळच्या गप्पा, त्यातले विषय आणि मोकळेपणाने चर्चा करण्याची त्यांची पद्धत या गोष्टी तर माझ्या या मित्राने नोंदल्याच, परंतु त्याचं एक निरीक्षण मला अतिशय महत्त्वाचं वाटलं. तो म्हणाला,
‘मोठय़ा माणसांच्या छान गप्पा चालल्या असताना, अवतीभवती मुलं हवा तसा दंगा करीत होती. आपापल्या आईवडिलांशी मध्येच येऊन काहीबाही मोठमोठय़ाने बोलत होती. परंतु एकाही पालकाने त्या पोरांना, ‘जा  खेळा तिकडे, आम्हाला नका त्रास देऊ’ असं दमात घेऊन सुनावलं नाही. कमाल आहे!’
मी हसलो. त्याला म्हणालो, ‘याच युरोपात एक महान दिग्दर्शक होऊन गेला. त्याचं नाव फ्रान्स्वा त्रुफो. तो म्हणाला होता, सगळी वडीलधारी माणसं आपल्या बालपणाबद्दल खोटं बोलतात.’
त्याचा थोडासा गोंधळ उडाला. मी थोडं स्पष्ट केलं. दंगा करणार्‍या मुलांना वेगळं न पाडता, गप्प न बसवता समजावण्याची, सामावून घेण्याची आणि एका ‘संस्कृती’शी त्यांचा परिचय घडवण्याची जबाबदारी मोठय़ा माणसांनी घ्यावी, ही युरोपातली रीत आहे.
..आंद्रेआस द्रेसन या पुरस्कारविजेत्या र्जमन दिग्दर्शकाच्या ‘अँज वुई वेअर ड्रीमिंग’ या ताज्या चित्रपटातील नाइटलाइफ एन्जॉय करणार्‍या तरुण पोरांविषयी म्हटलंय. दे टर्न नाईट इन्टू डे अँड द स्ट्रीट्स इन्टू अँन अँडव्हेन्चर प्लेग्राऊंड..
 कुणी रोखलं म्हणून तरुण पोरं घरच्या मंडळींबरोबर रात्री साडेआठ, नऊला जेवून दहा वाजता पांघरुणात गुडूप होणार नाहीत. बाहेरच्या अंधारसावल्या त्यांना खुणावणारच! मात्र तिथे वावरताना स्वत:चं भान ठेवण्याचं, सर्व प्रकारे स्वत:चं संरक्षण करण्याचं काही शिक्षण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिलं जायला हवं. त्यासाठी मुळात नीट सारं समजून घ्यायची क्षमता लागते. विचार लागतो..  ही तर अवघड गोष्ट! त्यापेक्षा काहीही न कळून घेता आरडाओरडा करणं केव्हाही सोप्पंच, नाही का?
- आपण तेच तर करतो आहोत.
‘अँज वुई वेअर ड्रीमिंग’, ‘व्हिक्टोरिया ‘आणि’ बीग फादर अँड अदर स्टोरीज’ या तीन चित्रपटांतून नाइटलाइफचं वास्तव समोर येतं आणि मुख्य म्हणजे चूक-बरोबर, चांगलं-वाईट किंवा नैतिक-अनैतिक असली किंचितही टिपणी न करता! यातले पहिले दोन सिनेमे युरोपातले, तर तिसरा व्हिएतनामचा म्हणजेच आशियातला! तिघात एक समान सूत्र म्हणजे रात्र जागवायला बाहेर पडलेली तरुण पोरं आणि पोरीसुद्धा! बारकाईने पाहिलं तर ही पोरं या रस्त्यावरच्या जगात स्वत:ला मुक्तपणे उधळून देताना कुठे तरी स्वत:चं एक जग शोधताहेत. त्यांचं जग. काहीसं उमगलेलं, काहीसं न उमगलेलं असं! हा शोध नीटसा जाणतेपणीचा आहे असंही नाही. परंतु आहे खरा..! रानोमाळ बेभान होऊन धावणार्‍या वार्‍यासारखं रात्र रात्र जागवत त्यांचं हे बेभान भटकणं!
 या तीनही चित्रपटात बरोबर-चूक, चांगलं-वाईट, नैतिक-अनैतिक अशा वाटेने न जाता तरुणांचं विश्‍व आहे तसं दाखविण्याचा थेट प्रयत्न आहे. नाइटलाइफ, त्याहीपेक्षा घराबाहेरचं जग आणि त्याविषयी असलेली ओढ याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. काही तरी नेमकं जाणवून देण्याचा प्रयत्न आहे. एकदा निर्मळपणे आणि अर्थातच निर्भीडपणे वास्तव नीट पाहता आलं तर सर्वच गोष्टींचा नीट उलगडा होतो. मग त्या कुणाला पटोत, न पटोत. आवडोत, न आवडोत!
 
‘अँज वुई वेअर ड्रीमिंग’ 
 
रिको, डॅनियल, पोल आणि मार्कला स्वत:चा बँड काढायचा आहे. त्यांच्यात जी तरुणाईची रग आहे तिला वाट मोकळी करून देण्यासाठी, स्वत:च्या आतल्या आवाजात बेभान होऊन गाण्यासाठी आणि आम्हीही काही तरी ‘महत्त्वाचं’ करतोय हे सभोवतालच्या जगात दाखविण्यासाठी! त्यासाठी आवश्यक तो तारुण्यसुलभ जोश त्यांच्यात आहे. या जोशाला बर्‍यावाईटाची फारशी तमा नाही. कर के दिखाना हा..करना है, हाच मंत्र. हाच श्‍वास आणि ध्यासही! त्यासाठी रात्र त्यांना प्रिय वाटते. जवळची. अंधार्‍या रस्त्यावरचं यथेच्छ जगणं त्यांना आश्‍वासित करतं.
.या स्वैर भटकंतीत मग गाड्या चोरणं, व्यसनं करणं, पबमध्ये बेभान होऊन नाचणं अशी सारी अँडव्हेन्चर्स स्वाभाविकपणे त्यांच्या आयुष्यात येतात. पण ते सगळं  गंमत म्हणून, धमाल करायची म्हणून! त्या नादापायी मनाशी बाळगलेलं ध्येय सुटत नाही. बँड उभा राहतो. त्यांची ऊर्जा नेमकी कामी येते. परंतु नवनाझींच्या हल्ल्यात सारं होत्याचं नव्हतं होतं. हा काळ आहे बार्लिनमधली कुप्रसिद्ध भिंत जमीनदोस्त होण्याचा. आणि नवनाझींनी डोकं वर काढण्याचा!
 
‘व्हिक्टोरिया’ 
सेबेस्टिन शिपर दिग्दर्शित चित्रपटातही बर्लिनचं नाइटलाइफ आहे. चार दिशाहीन तरुण रात्रभर या पबमधून त्या पबमध्ये असं भटकत असताना पहाटे त्यांना एक स्पॅनिश तरुणी भेटते. ते तिला आपल्या कोंडाळ्यात सामावूनच घेतात. तीही सहज त्यांच्यात मिसळते. ती नोकरी करते त्या रेस्तराँमध्ये थोडी झोप काढून तिला सकाळी सातला ते उघडायचं आहे. परंतु घडतं काही तरी वेगळंच! सहजपणे या पोरांमध्ये सामील झालेली ती पोर तिच्या ध्यानीमनी नसताना त्या चौघांबरोबर एकेक अनपेक्षित वळणं घेत अडकत जाते.  सर्जकाच्या अबोध मनात एक बीज पडतं आणि मग त्याने काही न करता ते बीज ज्याला पुढे पुढे नेत त्याच्याकरवी एक उत्तम कलाकृती जन्माला घालतं. ‘व्हिक्टोरिया’ ही अशीच कलाकृती आहे. प्रेक्षकांना तर कसला अंदाज येत नाहीच, परंतु पुढच्या सार्‍या वळणांविषयी व्यक्तिरेखाही अनभिज्ञ असतात असा हा विलक्षण प्रकार आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाला संकलक नाही, कारण हा वन शॉट म्हणजे एकाच शॉटमध्ये सलग चित्रित केलेला चित्रपट आहे.
 
‘बीग फादर, स्मॉल फादर अँड अदर स्टोरीज’
फोटोग्राफी हा केवळ छंदच नाही तर ज्याचं पॅशन आहे अशा वूला त्याचे वडील कॅमेरा आणून देतात. वडील त्याच्याशी सतत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो कायम त्याच्या दोस्तांच्या गराड्यात. त्यातही एकेकाच्या नाना तर्‍हा. कुणी रात्र रात्र जागून कष्ट करणारं, कुणी मस्त मनमौजी तर कुणी गुन्हेगारीच्या वाटेवर असलेलं. मुलगा मार्गी लागावा म्हणून प्रयत्नशील असलेला हा जगावेगळा बाप. पोराने त्याच्या टोळक्यात वावरणार्‍या पोरीच्या प्रेमात पडावं, तिच्याशी लग्न करावं अशा खटपटीत आहे, तर पोरगा समलिंगी संबंधात अडकलेला!
 
(लेखक ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत.)
 

Web Title: On the street at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.